१२. शक १००० पासून शक १०६५ पर्यंतच्या काळांत गुजराथ, महाराष्ट्र व कोंकण या प्रांतांत जे मुख्य राजे व उपराजे झाले व ज्यांचा संबंध प्रकृत इतिहास भागाशीं प्राधान्यानें येतो त्यांच्या राजांच्या नकाशाची स्थूल रूपरेषा खालील रेखाटणी - तल्या प्रमाणें होती.
चौलुक्य ऊर्फ सोळंकी ह्यांचें राज्य सरस्वतीनंदी पासून लाटदेशापर्यंत पसरलेले होते. चालुक्यांचें बडें साम्राज्य नर्मदे पासून कुमारी पर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश व्यापून राहिलेलें होतें. शिलाहारांचें मांडलिक राज्य क-हाड-कोल्हापुर व उत्तर कोंकण ह्या दोन टापूं वर दोन शाखांनीं मंडित झालेलें होतें. आणि हाळशीचे कदंब दक्षिण कोंकणांतील शिलाहारांच्या गोवेप्रांता वर आपला अंमल नुकताच बसवून उत्तरकोंकणा कडे दृष्टि फेंकीत होते. शक १००० च्या सुमारास अशी राजकीय स्थिति गुजराथ, महाराष्ट्र व कोंकण या प्रांतांत होती. ही राजकीय स्थिति कशी बनत आली तें पाहिल्या शिवाय शक १०६० त प्रतापबिंबानें उत्तरकोंकणा वर स्वारी करण्याचा घाट कां घातला तें नीट उलगडणार नाहीं. मालखेडच्या राष्ट्रकूटांचें राज्य शक ८९६ त जेव्हां चालुक्यचक्रवर्ती नुर्माडितैलानें आक्रमण केलं, तेव्हां राष्ट्रकूटांच्या साम्राज्यांतील बहुतेक सर्व प्रांत यद्यपि त्याच्या अंकित झाले तत्रापि गुजराथेंतील लाट देश त्याच्या पंजा खालीं आला नाहीं. राष्ट्रकूटांच्या अंमला खालील लाट देश अणहिलवाडच्या चौलुक्यांनीं ऊर्फ सोळंकींनीं राष्ट्रकूटांच्या हलाकीच्या दिवसांत आपल्या घशांत जो एकदा घातला तो नुर्माडि-तैलाच्या कारकीर्दीत हि सोडला नाहीं. चौलुक्यांचें व चालुक्यांचें वैर उत्पन्न होण्यास व ते अक्षय्य टिकण्यास लाटदेश कायमचा कारण होऊन बसला होता. चौलुक्यांच्या हातांत राहो कीं चालुक्यांच्या हातीं जावो, कोणत्या तरी एका पक्षाच्या असंतोषाला त्याचें अस्तित्व सदा भरती आणी. ह्या सहज शत्रूं पैकीं चालुक्यांच्या बाजूला क-हाड, उत्तरकोंकण व दक्षिणकोंकण ह्या तीन प्रांतांतील शिलाहार राजे असत. राष्ट्रकूटांचें राज्य नुर्माडितैलानें जें पादाक्रांत केलें त्यांत त्याला क-हाडच्या शिलाहारांचें साहाय्य झालेलें होतें. तशांत उत्तर कोंकणांतील शिलाहारांजा प्रांत तर लाट देशाला अगदीं भिडून होता. सबब, प्रातिवेशिकधर्मानें ठाण्याच्या शिलाहारांचें व अणहिलवाडच्या चौलुक्यांचें सहज वैर बनून गेलें होतें. असा बनाव बनून गेला असतां, अणहिलवाडच्या चौलुक्यांनीं कल्याणच्या चालुक्यांची व शिलाहारांची जूट फोडण्याचा प्रयत्न केला. क-हाड, उत्तरकोंकण व दक्षिणकोंकण, अशीं शिलाहारांचीं तीन संस्थानें होतीं. पैकीं क-हाडकर शिलाहार चालुक्यांच्या मैत्रीला सोडून जाणा-या पैकीं नव्हते. ठाणेकर शिलाहार शेजारपणा मुळें चौलुक्यांच्या स्नेहाची अपेक्षा कधीं करतील हा संभव च नव्हता. राहिले चंद्रपूरचे दक्षिणकोंकणांतील शिलाहार. त्यांना अणहिलवाडकरांनीं जुटींतून फोडिलें व आपल्या भाऊबंदांच्या व चालुक्यांच्या कुशींत एक पीडा उत्पन्न करून ठेविली. चंद्रपूरकर ऊर्फ गोवेंकर शिलाहारांना ह्या दुष्कर्माचें लवकरच प्रायश्चित्त मिळालें. शक ९३९ च्या सुमारास ठाण्याच्या केशिदेव अरिकेसरी नांवाच्या शिलाहारानें गोव्याच्या रट्टराज शिलाहाराला जिंकून त्याचें राज्य कायमचें खालसा केलें. ह्या कृत्यानें उत्तरकोंकण व दक्षिणकोंकण अशीं दोन्हीं कोंकणें शक ९३९ च्या सुमारास उत्तरकोंकणीय शिलाहारांच्या राज्यांत समाविष्ट झालीं व अणहिलपट्टणच्या चौलुक्यांचा एक स्नेही अजीबात नष्ट होऊन त्यांचें पारडें हलकें पडलें. दक्षिण कोंकण ठाण्याच्या शिलाहारांच्या ताब्यांत शक ९३९ च्या पुढें चाळीस पंचेळीस वर्षे राहिलें. त्या अवधींत अणहिलवाडच्या चौलुक्यांनीं हाळशीच्या कदंबाचीं उठावणी केली व त्यांच्या कडून दक्षिण कोंकणावर चाल करविली. हाळशीच्या कदंबांत जयकेशी कदंब या नाभें करून एक मोठा शूर व साहसी पुरुष निर्माण झाला. त्याची मुलगी मयाणल्लदेवी अणहिलवाडच्या कर्ण चौलुक्यानें वरिली आणि कदंब व चौलुक्य ह्या दोन घराण्यांचा शरीरसंबंधानें दृढतर स्नेह जुळवून आणिला. मुख्यतः ह्या स्नेहाच्या पाठिंब्या वर व गौणतः स्वत:च्या जोरावर जयकेशी कदंबानें केवळ दक्षिण कोंकण च तेवढें जिंकलें असें नव्हें, तर उत्तरकोंकण ऊर्फ कवडीद्वीप चुरडून तेथील राजा जो माम्वाणी शिलाहार त्याचा जीव घेतला.