१, ७, ८, १०, २५ व २७ ह्या नोंदीं पैकीं आठव्या नोंदीत तीथ व वार दिले नसल्या कारणानें तिज संबंधानें विचक्षणा करण्याचें कारण च रहात नाहीं, बाकी राहिलेल्या पांच नोंदीं पैकीं (१) सत्ताविसाव्या नोंदींतील शक १७४१ च्या वैशाखशुद्धप्रतिपदेस मोडकांच्या जंत्री प्रमाणें राववार पडतो व दीक्षितांच्या जंत्री प्रमाणें शनिवार पडतो. अशी एकदोन दिवसांची तफावत मोडकांच्या व दीक्षितांच्या जंत्र्यांतून वारंवार आढळते. मोडकांनीं आपली जंत्री जुन्या पंचांगां वरून रचिली व जुन्या पंचांगांतील गणित प्रायः स्थूल असे, त्या मुळें जुन्या पंचांगांच्या हून किंचित् सूक्ष्म गणित करणा-या दीक्षितांच्या जंत्रींत तिथींचे वार वारंवार निराळे आढळतात. गणितदृष्ट्या दीक्षित यद्यपि बरोबर असले, तत्रापि साक्षात् जुन्या पंचांगांतून दिलेले तिथींचे वार इतिहासदृष्ट्या ज्यास्त प्रमाणिक समजणें इष्ट असतें. कारण इतिहासलेखक किंवा इतिहासलेखांच्या नकला करणारे सामान्य कारकून स्थूल पंचांगांचा च उपयोग करून काम भागवितात, सूक्ष्म गणित करीत बसत नाहींत आणि सूक्ष्म गणित करण्याची त्यांची लायकी हि नसते. सबब, सत्ताविसाव्या नोंदींतील वैशाखशुद्धप्रतिपदेला जो रविवार सांगितला आहे तो रास्त धरून, ह्या नोंदींतील कालगणनेचा तपशिल विश्वसनीय मानण्यास कोणती च हरकत नाहीं. (२) पंचविसाव्या नोंदींतील संवत् १५३५ ऊर्फ शक १४०० च्या चैत्रशुद्ध प्रतिपदेस गुरुवार दीक्षितांच्या जंत्रींत दिला आहे; तेव्हां ही नोंद विश्वसनीय आहे हें सांगावयाला नको. (३) दहाव्या नोंदींतील संवत् ५७४ ऊर्फ शक ४३९ च्या म. प्र, २,
फाल्गुनशुद्ध नवमीस रविवार पडतो, सबब ही हि नोंद प्रमाणिक आहे. (४) सातव्या नोंदीतील संवत् १२९८, शक ११६३ च्या माघशुद्ध सप्तमीस मंगळवार येत नाहीं, परंतु पंचमीस येतो. करतां, ह्या नोंदींतील “ माघशुद्ध ७ भौमे' ह्या अक्षरांबद्दल “ माघशुद्ध ५ भौमे " असा पाठ घ्यावा लागतो. माघशुद्धपंचमीला भौमवार ऊर्फ मंगळवार पडतो. येथें नक्कलकारानें ५ बद्दल ७ वाचला हें उघड आहे. जुन्या ५ च्या आंकड्याच्या गांठीचें टोंक लेखणीच्या फटका-यानें किंचित् खालीं ओढलें न गेल्यामुळें चिन्ह साताच्या आंकड्या सारखें दिसूं लागलें आणि तें नक्कलकारानें सहजच सात म्हणून वांचलें. तात्पर्य, ह्या नोंदींत पांचाचा आंकडा सात म्हणून वांचला गेला. शक ११६३ माघशुद्ध ५ भौमे हा तीथवारांचा आंकडा विश्वसनीय आहे ह्यांत संशय नाहीं. (५) पहिल्या नोंदीत “ शक १०६० माघशुद्ध ५ सोमवासरे '' अशीं अक्षरें आहेत. अक्षरांच्या व आंकड्याच्या चुक्या नकलकारानें ह्या नोंदींत ज्या केल्या आहेत त्यांची दुरुस्ती दोन त-हांनीं करतां येते. नोदींत जितकी पदें असतात तितक्या पदांतील अक्षरां ऐवजीं किंवा आंकड्या ऐवजी निराळीं व अक्षरें किंवा आंकडे, जुनाट, पुसट वगैरे लेख नीट वाचतां येण्यास प्रतिबंध झाल्यामुळें, नक्कलकार गाळीत किंवा बदलीत असतांना वारंवार आढळतात. असा बदल प्रस्तुत नोंदींत दोन त-हांनीं झाला असल्याचा संशय सिद्ध करतां येतो. १०६० शकाच्या माघशुद्ध ५ स दीक्षितांच्या जंत्रींत सोमवार नाहीं, शनिवार आहे. त्या मुळें नकलकारानें ५ हा आंकडा दुस-या कोणत्या तरी आंवड्या करितां लिहिला असावा हा एक संशय; किंवा सोमवासरे हीं अक्षरें दुस-या कोणत्या तरी वाराच्या बद्दल लिहिलीं गेली असावीं, हा दुसरा संशय, माघशुद्ध ७ स सोमवार आहे. करतां, ७ च्या बद्दल नकलकारानें ५ हा आंकडा लिहिला असण्याचा संभव आहे.