राजवाडे यांचा जीवन परिचय

१०० वर्षं जगून खूप कामे करण्याची राजवाडे यांची इच्छा होती. विद्यार्थिदशेतील व्यायामाने प्रकृतीही निकोप होती. पण सततची भ्रमंती व अखंड मनन-चिंतनाचा मनावरील ताण यामुळे त्यांना हाय ब्लड प्रेशरच्या विकाराने ग्रासले तरी तशाही स्थितीत त्यांचे काम चालूच होते. सन १९२६ च्या मार्च महिन्यात टाचणांच्या ट्रंका व स्वयंपाकाची भांडी घेऊन ते धुळे येथे गेले. या गावाशी त्यांचा फार निकटचा व जिव्हाळ्याचा संबंध होता. तेथे गेल्यावरही धातुकोश नीटपणे पुरा करण्याची खटपट चालूच होती. पण जिद्दी मनाला दुबळ्या शरीरापुढे वाकावे लागले व दुर्वासाप्रमाणे कोपिष्ट पण अखंड ज्ञानसाधना करणा-या या ऋषितुल्य संशोधकाचा, वैय्याकरणाचा, समाजशास्त्रज्ञाचा ३१ डिसेंबर १९२६ रोजी अंत झाला.

राजवाडे आणखी जगते तर आर्यांच्या विजयाचा मोठा ग्रंथ निर्माण झाला असता. मराठ्यांच्या इतिहासाचा शोध घेत असताना सा-या आर्य संस्कृतीचा इतिहास शोधण्याची जी ईर्षा त्यांच्यात निर्माण झाली होती तिचा परिपाक या ग्रंथरूपाने मिळू शकला असता. त्याची रूपरेषाही त्यांनी आखली होती. धातुकोश व विवाहसंस्थेचा इतिहास पूर्ण होऊ शकले असते, पण मृत्यूने त्यांचे हे विशाल मनोरथ मध्येच अडविले.

इतिहासाचार्यांचे अपुरे राहिलेले हे कार्य पुरे करण्याची ईर्षा नव्या पिढीत निर्माण झाली तर तीच त्यांना मिळालेली खरीखुरी स्मृति-सुमनांजली ठरेल.