राजवाडे यांचा जीवन परिचय

मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या खंडांना त्यांनी ज्या प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या, त्यांत इतिहासविषयक अनेक प्रश्नांचा ऊहापोह राजवाडे यांनी केला आहे. मराठ्यांचा इतिहास शास्त्रीय पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे हा त्यांचा आग्रह त्यांत दिसतो. तसेच परिस्थिती व मानव यांच्या झगड्यातून इतिहास घडतो; दैवी संकेत, एकाद्याच व्यक्तीचे कर्तृत्व या गोष्टी ते महत्त्वाच्या मानीत नाहीत तर सामान्य व असामान्य व्यक्तींची चरित्रे मिळून इतिहास घडतो असे राजवाडे मांडतात. इतिहास म्हणजे तत्कालीन समाजाचे भौतिक व आत्मिक चरित्र अशी इतिहासाची व्यापक व्याख्या ते करतात.

कै. राजवाडे यांची कामगिरी निव्वळ इतिहासविषयकच नसून मराठी भाषाशास्त्राच्या दृष्टीनेही त्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. 'राजवाडे धातुकोश' व 'राजवाडे नामादिशब्दव्युत्पत्ती कोष' हे दोन ग्रंथ त्यांच्या सूक्ष्म व मूलगामी बुद्धिमत्तेचे निदर्शक होत. त्याचप्रमाणे ‘सुबन्त विचार' व ' तिङ्कत विचार ' या दामले यांच्या व्याकरणावरील टीका-लेख व 'संस्कृत भाषेचा उलगडा' हा स्वतंत्र ग्रंथ त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचे निदर्शक होत. या ग्रंथात व्युत्पत्तींतून मानवाच्या इतिहासाचा अर्थ लावण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न निःसंशयपणे मौलिक स्वरूपाचा आहे.!

महानुभवांच्या ग्रंथांच्या सांकेतिक भाषेचा राजवाडे यांनी केलेला उलगडा ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. भाषाभ्यासाला या उगड्याने नवेच दालन खुले झाले. याशिवाय वेळोवेळी विविध विषयांवर निरनिराळ्या मासिकांतून जे लेख व निबंध प्रकाशित केले त्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्या सर्वस्पशी प्रतिमेने अनेक विषयांवर काही नवीन विचार व सिद्धान्त पुढे मांडले. ते सर्वच अविवाद्य व अचूकच होते असे जरी नसले तरी ते मांडताना प्रमाणे देऊन ते सिद्ध करण्याची अवलंबिलेली पद्धती निर्विवादपणे शास्त्रीयच होती.

विचार, मनन, चिंतन, यांना शब्दरूप देऊन ते लेखांच्या, ग्रंथाच्या रूपाने वारंवार प्रसिद्ध करण्याची तत्परता कै. राजवाडे यांनी दाखविली. हा त्यांच्या चरित्रातील विशेष होय. त्यामुळे त्यांचे विचारधन विपुल ग्रंथसंपत्तीच्या द्वारा भावी पिढ्यांना मिळू शकले. (पुढील पानावर पहा )