राजवाडे यांचा जीवन परिचय

अशा त-हेने सुरू झालेली राजवाडे यांची इतिहासाची साधने जमा करण्याची साधना अखंड चालू राहिली. यासाठी यात्रिकाच्या चिकाटीने उभा महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातला. ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या. त्या वास्तू बोलत्या झाल्या. अमूल्य माहिती गोळा झाली. तेथील जनजीवन, त्यांची भाषा, चालीरीती, वाङ्मय यांचा समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करून निष्कर्ष काढले.धोतर, लांब काळा कोट, डोक्याला पागोटे, स्वतःचे अन्न शिजवून खाण्यासाठी मोजक्या भांड्यांची पडशी टाकून एखाद्या ठिकाणी जुनी दप्तरे मिळण्यासारखी आहेत असा सुगावा लागला, की ते ती मिळवण्यासाठी जिवाचे रान करीत एरवीचे फटकळ विसूभाऊ नम्र होत आणि अशा

त-हेने मिनतवा-या करून कागद हस्तगत केले की त्यावर तुटून पडत. अहोरात्र परिश्रम करून त्यांचा संदर्भ लावीत व पदरमोड करून ते प्रसिद्ध करण्याचा खटाटोप करीत. एकाद्या सरदार घराण्यातील किंवा संस्थानिकांकडील वारस असे कागदपत्र देण्यास खळखळ करू लागले की राजवाडे संतापून म्हणत "ज्यांच्या पराक्रमावर आज ऐश्वर्य भोगत आहेत ते संस्थानिक झोपले आहेत, जहागिरदार डुलक्या खात आहेत म्हणून हा खटाटोप आम्हाला करावा लागतो आहे."

धुळीची पुटे बसलेली, भिजून चिखल झालेली ही दप्तरे हस्तगत करण्यात आलेल्या कुठल्याही त-हेच्या अडचणींनी राजवाडे यांच्या तपश्चर्यंत कधीही खंड पडला नाही. थकवा जाण्यापुरती थोडी झोप व स्वतःचे अन्न शिजवून खाण्यापुरती सवड याशिवाय सर्व वेळ वाचन, लेखन, मनन-चिंतनात जाई.
या सर्व तपाचे फळ म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे प्रसिद्ध केलेले २२ खंड होत. याशिवाय मृत्युसमयी त्याहून अधिक असा अप्रकाशित संग्रह राजवाडे यांच्यापाशी होता. या भ्रमंतीतच त्यांना एकनाथपूर्वंकालीन ज्ञानेश्वरीची प्रत मिळाली. ती त्यांनी संपादित करून प्रसिद्ध तर केलीच, शिवाय " ज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण" हा भाषाशास्त्रीय दृष्ट्या मौलिक ग्रंथ लिहून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना नवे मार्गदर्शन केले. "राधामाधवविलासचंपू" हा जयराम पिंड्येकृत शहाजी-चरित्रावरील काव्यग्रंथ व "महिकावतीची बखर" हे राजवाडे यांनी संपादित केलेले आणखी दोन ग्रंथ. या दोन्ही ग्रंथांच्या प्रस्तावना म्हणजे महाराष्ट्राची वसाहत, त्याचे समाजजीवन यासंबंधी राजवाडे यांनी जो अभ्यास केला, जे निष्कर्ष काढले त्याचे प्रतिबिंबच होय. तुटपुंजे संशोधन, अपुरी साधने, संशोधक वृत्तीचा अभाव अशा परिस्थितीत राजवाडे यांनी या प्रस्तावनांत महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी केलेले विवेचन विशेषच महत्त्वाचे ठरते. (पुढील पानावर पहा )