राजवाडे यांचा जीवन परिचय

कै. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म २४ जून १८६३ रोजी वरसई येथे झाला! धाकटा विश्वनाथ ३ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचा अंत झाला. म्हणून त्याची आई मोटा वैजनाथ व धाकटा विश्वनाथ यांना घेऊन वरसईस आपल्या वडिलांच्या घरी परत आली. या दोन्ही भावांचे शिक्षण मात्र पुण्यासच झाले विश्वनाथचे प्राथमिक शिक्षण शनिवार पेठेतील तीन नंबरच्या शाळेत झाले. दुय्यम शिक्षणासाठी त्यांनी बाबा गोखले यांच्या शाळेत प्रवेश घेतला. नंतर काही काळ वामनराव भावे व काशीनाथपंत नातू यांच्या शाळेत, त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व काही काळ मिशन स्कूल असे करीत आपले दुय्यम शिक्षण संपवून श्री. राजवाडे १८८२ साली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.

पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात नाव दाखल केले; पण घरच्या गरिबीने जेमतेम एक सहामाहीच ते कॉलेजमध्ये जाऊ शकले. त्यानंतर द्रव्यार्जनाचे साधन म्हणून त्यांनी पुण्यास पब्लिक सर्व्हिस सेकंडग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग सुरू केला. त्यात थोडी प्राप्ती झाल्यावर पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये नाव घातले. त्यांचे वडील बंधू वैजनाथ यांनाही तेथे फेलोशिप मिळाली होती, त्याचाही फायदा शिक्षण पुढे सुरू करण्यास मिळाला.

शालेय किंवा कॉलेजमधील अभ्यासक्रमातील नेमलेल्या पुस्तकांकडे त्यांनी कधीच फारसे लक्ष पुरवले नाही. शालेय शिक्षक, कॉलेजमधील प्राध्यापक त्यांच्या कुशाग्र व विशाल बुद्धीला पुरेसे खाद्य पुरवण्यास असमर्थ होते. मात्र डॉ. रा. गो. भांडारकर, न्यायकोशकतें म. म. झळकीकर यांच्यासारख्या काही विद्वान, भारतीय कीर्तीच्या प्राध्यापकांच्या शिकवणीचा लाभ त्यांना मिळाला. ग्रंथांनाच आपले गुरु समजून त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, समाजशास्त्र, वनस्पतिशास्त्र अशा विविध शास्त्रांतील अनेक ग्रंथांच्या अभ्यासानंतर १८९१ साली बी. ए. ची परीक्षा दिली व पदवी संपादन केली. "केवळ विद्यार्जन करण्याचा हेतू बाळगणारा मी, नोकर तयार करण्याच्या गिरणीत जाऊन पडलो '' अशा कडक शब्दात त्यांनी तत्कालीन शिक्षणसंस्थांसंबंधी आपली मते व्यक्त केलेली आहेत. प्राथमिक शिक्षणापासून ते कॉलेजमधील उच्च शिक्षणासंबंधीचे आपले अनुभव त्यांनी "कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव" या निबंधाद्वारे ग्रंथमाला मासिकातून समाजापुढे ठेवले. या निबंधात श्री. राजवाडे लिहितात, “ मला एकही पंतोजी शास्त्रीयरीत्या शिक्षण देणारा भेटला नाही. येथून तेथून सर्व पंतोजी पोटभरू, इकडची पाटी तिकडे उचलून टाकणा-यांपैकी. माझ्या आयुष्यातील अडीच वर्षे नूतन ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने अगदी फुकट गेली. शिवाय नैतिक व धार्मिक दृष्ट्या माझा किती तोटा झाला तो तर सांगवतच नाही." त्याच निबंधात ते पुढे म्हणतात, "बारान् बारा वर्षे शिक्षण द्यायचे नोकरीचे व युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभाच्या वेळी परीक्षा पास झालेल्या सेवार्थी उमेदवारांना उपदेश करायचा स्वतंत्र धंदा करण्याचा किंवा सरस्वतीच्या एकान्त उपासनेचा. ह्या मानभावीपणाचाही मला बहुत तिटकारा आला. वाजवीच आहे की ह्या भाडोत्री शिक्षकांच्या गुलामगिरीच्या नोक-यांच्या कंटाळवाण्या परीक्षांच्यापासून मी पराङ्मुख झालो व पुस्तकालयातील ग्रंथाकडे एक दिलाने वळलो.'' अशा त-हेने विद्यार्थि दशेपासून सुरू झालेली ज्ञानसाधना आयुष्याच्या अंतापर्यंत चालूच राहिली. (पुढील पानावर पहा )