कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

जाता जाता असाही येथे उल्लेख करावासा वाटतो की काही महाशय संस्कृत भाषा सर्वांना शिकवून आपल्या देशातील काही प्रकारच्या, विशेषतः भाषा-भेदोद्भव, भेदभावांना काढून टाकून राष्ट्रीय ऐक्य साधू इच्छितात. त्यासाठी रेडियोवर काही संस्कृतसम "आवाजी " अथवा वाचन करतात. या महाभागांच्या एवढेही लक्षात येत नाही की भाषा ही व्यवहारातून निघत रेडियोमधून नाही. संस्कृत क्रियापदाला लिंग नाही आणि आपल्या हल्लीच्या अनेक भाषांत तीं तीनतीन आहेत. तसेच संस्कृताच्या द्विवचनाला आपण कधीच निकालात काढले आहे. ज्ञानेश्वरीत जुन्या मराठीचे एक द्विवचनाचे उदाहरण जुना अवशेष म्हणून सापडल्यावर राजवाड्यांना केवढे भाष्य लिहावे लागले. एवढेच नव्हे तर द्विवचन, त्रिवचन-म्हणजे अनेकवचनच-का व चार वचनाला काय म्हणतात असा प्रश्न शाळेत मास्तरांना विचारल्यामुळे मास्तरांचा जो थोबाडीत फटका बसला तसले "शंकासमाधान" पाहून राजवाडे या प्रश्नाच्या मागे लागले. त्यातूनच "संस्कृत भाषेचा उलगडा" हा अत्यंत मौलिक शास्त्रीय ग्रंथ उत्पन्न झाला. पण त्याचा मागमूसही न घेता आमचे राज्यकर्ते व गांवढळ विद्वान डॉ. भांडारकरी व्याकरणाची शालोपयोगी पुस्तके शिकवून व रेडियोवर अज्ञेय असे संस्कृतसम निरनिराळे आवाज काढून हिंदुस्थानची एकी घडवू पहात आहेत.

भारतीय समाजाची किंवा त्यापूर्वीच्याही समाजाची घडण कुठून कशी निघाली याचा अभ्यास संबंध मानवजातीच्या एकात्मतेच्या ध्येयाला अत्यंत जरूरीचा आहे. त्याबाबत आम्हा मार्क्सवादी किंवा कम्युनिस्ट शास्त्राचे मूलभूत सिद्धान्तही आहेत. त्यांची व्याख्या मी इथे। करू इच्छीत नाही. ती व्याख्या राजवाड्यांच्या वाचनात आली नाही. ते हेगेल व कॉम्टपर्यंत पोचले; पण हेगेलच्या निर्गुण परमतत्त्व-वादावरच राजवाडे थांबले. त्याच्यापुढे जाऊन फायरबॉख व नंतर मार्क्स-एंगल्स यांच्यापर्यंत जाण्याला त्यांना संधी मिळाली नाही म्हणा किंवा हेगेलियन परब्रह्माचे डायलेक्टिक्स व त्यातून निघणारें विरोधविकासशास्त्र पुरेसे समजून त्यांना पुढे सरकणे जमले नाही. म्हणून ते अद्वैत वेदान्तावर थांबले हे खरे. त्यांच्या 'विकार-विचार साधनांची उत्क्रांति ' या लेखामध्ये त्यांचे मन द्विधा झाले होते व अद्वैत वेदान्ताच्या जोडीला त्यांनी भौतिक शास्त्रालाही जागा देऊन टेवली. ईश्वरकल्पनेच्या भ्रांतामधून सत्याकडे येण्यासाठी अद्वैत वेदांताच्या जोडीला अद्वैत प्रकृती अथवा गीतेमध्ये ज्याला ‘परा प्रकृती' म्हटले आहे तेथपर्यंत राजवाडे आले व तिथेच थांबले. मनुष्यसमाजाच्या प्राकृतिक व ऐतिहासिक द्वंद्वाची गती त्यांना सापडली नाही.

या एकमेवाद्वितीयं परमाणुमय पण अत्यंत शक्तिमान अशा पराप्रकृतीपासून राजवाड्यांनी ब्रह्मांडरचनेचा व तज्जन्य समाजरचनेचा, भाषारचनेचा, वर्ण व जातिरचनेचा एवढा इतिहास-प्रपंच उभा केला आहे की त्याची अद्याप नीट पहाणीसुद्धा कोणी केलेली नाही. हिंदूंच्या परंपरागत व प्रचलित समजुती व भावना यांना कशाला हात लावा असा संधिसाधु विचार करून किंवा राजवाडे हाच इतका कोण मोठा शहाणा की ज्याने पाणिनीला काही ठिकाणी समाज-इतिहास अवगत नसल्याने भाषाशास्त्रोद्भव अशी अष्टाघ्यायी अशास्त्रीय पद्धती अवलंबाव्या लागल्या असे म्हणण्याचे धाडस करावे असे विचारणारे काही विद्वानही आपल्यात निघाले.