कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

मुसलमान रियासतीबद्दल वाटेल त्या कल्पना पसरवून आपण आपल्या लोकांच्या राष्ट्रीयत्वाच्या व एकीच्या वाढील; संकुचित कुंपणे घालीत आहोत व हिंदुस्थानातील सर्व जनतेच्या एकात्मतेला अडथळे निर्माण करीत आहोत. एका दैवी संदेशाचा आधार घेऊन वाळवंटमय प्रदेशातून हा मुसलमानी लोंढा जगभर कसा पसरला; जे अलेक्झांडर, अशोक किंवा नेपोलियन यांना जमले नाही ते या केवळ टोळीबद्ध समाजाला कसे जमले, याचे धड शास्त्रही सांगणे ज्यांना जमत नाही ते इतिहास काय लिहिणार किंवा शिकवणार व तो कसा ? तशी टोळधाड म्हणाल तर त्यापूर्वी ग्रीक व रोमन, अलेक्झांडर व सीझर यांनीही घालण्याचा प्रयत्न केला होता आणि अटिलाच्या श्वेत व ताम्र हुणांच्या स्वायांचा उल्लेख. ही आपल्या इतिहासात आहे. नंतर मराठ्यांच्या टोळधाडी उत्तर हिंदुस्थानात शिरून त्यांनी काय केले त्याचे संस्थानी अवशेष व दप्तरे अजूनही आहेत. महादजी शिंद्यांची अमोल दप्तरे ग्वाल्हेर दरबारात धूळ खात आहेत. पण या सगळ्यांची इतिहाससंगती कशी लावायची ?

हे प्रश्न आपल्या देशातील इतिहासकारापुढे आहेत. पण त्यांची संगति लावण्याचे शास्त्र काय हाच मुख्य प्रश्न सुटलेला नाही आणि नुसत्या राष्ट्रवादाची व एकीची पोकळ गर्जना करून तो सुटणार नाही.

महाराष्ट्रामध्ये तर राष्ट्रवाद, प्रादेशिक वाद व जातिवाद, शुगर-सत्तावाद, मंत्रिगणांचे परस्पर वाद व प्रतिसंवाद, तसेच त्या सर्वांवर पांघरूण घालून एकीची व राष्ट्रवादाची सोनेरी शाल चढवून वर्गविग्रहावर पांघरूण घालण्याचे धुरंधर प्रयत्न चालू आहेत; पण या सर्वांचे मूळ तत्त्व व त्याचा विकास कुठून व कुठच्या साधनिकेवरून काढायचा याची सर्वच विचारवंतांना व राज्यकर्त्यांना, तसेच सामान्य कष्टकरी जनतेला काळजी पडली आहे यात शंका नाही.

त्यासाठी मनुष्यप्राणी प्राथमिक रानटी अवस्थेपासून इथपर्यंत कसा पोचला याचा एखादा सर्वंकष सिद्धान्त सापडतो का असा प्रश्न आहे. त्यासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक साधने व इलाजही शोधण्यात अनेक विद्वान व सामान्य लोक गुंतलेले आहेत.