कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

हे काम शक्य आहे का याचे उत्तर देणे कठीण आहे. सरकार आणि धनाढय कारखानदारांच्या देणग्यावर ज्या संस्था अथवा व्यक्ती आज या क्षेत्रात कार्य करीत आहेत त्यांच्यापासून ग्रंथनिर्मिती होते, पण त्यामुळे प्रगतीचे पाऊल फारसे पुढे पडण्याची आशा नाही. अशा संस्था अथवा विद्वानांची येथे नावे घेणे योग्य नाही. पण हे विधान सत्य आहे हे खरे.

नाही तर शिक्षणक्रमात अथवा विद्वानांच्या चर्चेत अथवा रोज गाजणा-या सेमिनारचक्रात अथवा विद्वज्जनसभांमध्ये राजवाडे, कोसांबी, जायस्वाल यांचा नाममात्र सुद्धा उल्लेख न होण्याचे कारण कुणी सांगेल का ?

या कार्यासाठी पैसा कसा उभारायचा याचा विचार नंतर करावा. प्रथम वैचारिक सामग्री जमा करायला सुरुवात करावी.

ही योजना आखीत असताना प्रथम राजवाडे यांच्या लिखाणाचा, त्यांच्या भाषाशास्त्र, इतिहासशास्त्र, विचार विकारप्रदर्शनशास्त्र इत्यादींचा पूर्ण व एकसंघ सारांश तरी तयार व्हायला पाहिजे.

मोगल काळाचा योग्य इतिहास नाही. आहे तो जातीय अपप्रवृत्तींनी भरलेला आहे. हा कालखंड तर अत्यंत महत्त्वाचा, जवळचा व अद्याप हिंदुस्थानच्या समाजजीवनात व विचारसाधनिकेमधे खूप जीव धरून बसलेला आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा शेवटचा कालखंड म्हणजे मराठी राज्य व मराठ्यांचा राष्ट्रसमगुणी भावनांचा प्रबंध. त्याचा विचार राजवाडे सोडून इतरांनी नीटसा व फारसा केलेला नाही; कारण महाराष्ट्रधर्म, रामदास व इतर संतमंडळी यांच्या ऐतिहासिक कामगिरीबाबतच्या मतभेदात तो भाग बुडाला आहे.

मराठे समजायला मोगल समजले पाहिजेत व इंग्रज समजायला मराठे समजले पाहिजेत. नुसत्या मशिदी, देवळे, चर्च आणि त्यांची दानपत्रे किंवा भग्नखंड पाहून किंवा भूदान व गोदानाच्या सनदा पाहून इतिहास लिहिणा-यांनी बराच गोंधळ केला आहे. म्हणून आपल्या नव्या राष्ट्राच्या व नव्या समाजाच्या निर्मितीसाठी शास्त्रशुद्ध नवा इतिहास रचणे हे विचारवंतांचे काम आहे.

त्यासाठी प्रथम राजवाडे-वाङ्मयाचा नीट अभ्यास झाला पाहिजे. राजवाड्यांच्या ऐतिहासिक प्रस्तावना व मराठ्यांच्या इतिहासाची साधने शास्त्रशुद्ध आसंदीवर बसविली पाहिजेत.