कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

या सर्व खटाटोपांचा पाया एंगल्स यांचा "कुटुंबसंस्था, खाजगी मालमत्ता आणि शासनसंस्था यांचा उगम " हा ग्रंथ धरायलाच पाहिजे हे सांगायला नको.

पण त्या कामात हात घालण्यापूर्वी राजवाडे यांच्या संपूर्ण वाङ्मयाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.

हिंदुस्तानच्या या नव्या इतिहासाची रचना करणे हे अवघड काम आहे. त्यासाठी एक कमिटी नेमून तिने कोणकोणाचा सल्ला घेऊन काम करावे असाही प्रश्न आहेच. काही नावे मला परिचित आहेत. त्यात सर्वश्री आर. एस. शर्मा, 'शूद्र' या ग्रंथाचे लेखक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रो. मिराशी, प्रो. नूर-उल-हसन, सोवियट इतिहासशास्त्रज्ञ बोनगार्द लेव्हिन इत्यादींचा सल्ला व सहाय्य घेणे जरूरीचे वाटते. आणखी विद्वान मंडळी आहेत पण त्या सर्वांची नावे घेऊ गेल्यास यादी फारच मोठी दिसेल. ( अभ्यंकरशास्त्री आज हयात असते तर किती तरी बरे झाले असते. त्यांच्या मारेक-यांनी संस्कृत व्याकरणशास्त्रावरच एक जीवघेणा वार केला आहे हे त्या मारेक-यानाही दिसले नसेल.) आपल्या देशात जे विकृत विचार इतिहासलेखनद्वारा पसरविले जात आहेत त्यासाठी हा खटाटोप जरूरीचा आहे.

या इतिहासग्रंथाचा पसारा ज्ञानकोशाएवढा नको. तसेच जुन्या भिकार इंग्रजी चाकोरीतलाही नको. म्हणूनच राजवाडे, कोसांबी व जायस्वाल यांच्या ग्रंथांचा प्रथम उल्लेख केला आहे. डॉ. भांडारकर आणि इतर पंडितांचेही लेखन मदतीला घ्यावे.

एंगल्सचा ग्रंथ मूलभूत धरल्याने कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करणे असा या सूचनेत उद्देश नाही. प्रत्यक्ष राजवाडे, कोसांबी, जायस्वाल यानी जी सामग्री काढून ठेवली आहे तिचा आराखडा दिला तरी प्राथमिक गरज भागण्यासारखी आहे. शिवाय कोसांबी यांना मार्क्स-एंगल्स मान्य होते हे सर्वश्रुत आहे.

या खटाटोपाचा उद्देश हा की हल्लीचे इंग्रज व तत्सम विद्वान यांचे भिकार खंड व विकृत विचार बाजूला सारून आपल्या नव्या तरुण पिढीला आपल्या देशाचे, समाजाचे, विचारांचे सत्यदर्शन देणे व त्यांचा अपप्रवृत्तीपासून बचाव करणे हा आहे.