कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

याच्या पुढची पायरी काय हे राजवाडे यांच्यासारख्या विचारवंताला सांगणे हे मी माझे महत्त्वाचे कर्तव्य समजत होतो. पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आणि माझ्या तुरुंगवासामुळे ते करण्याची संधी मला साधता आली नाही याबद्दल दुःख वाटते. अर्थात् हा विचार अत्यंत धाडसीपणाचा किंवा उर्मटपणाचा दिसेल. पण राजवाडे विचाराने फारच प्रगतिमान व बेछूट झेप घेणारे असल्यामुळे मला त्यांची धास्ती किंवा माझी वरील आशा फोल आहे असे वाटत नव्हते. पण हे कल्पनातरंग चालविण्यात काय अर्थ आहे असे कुणीही म्हणू शकतो.
इतिहासाचार्य राजवाडे यांचा हा अपूर्व ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासूंना पुस्तकरूपाने प्राप्त करून दिल्याबद्दल प्रागतिक पुस्तक प्रकाशनाचे आभार मानणे आवश्यक आहे. याच अपूर्व ग्रंथाबरोबर राजवाडे यांचा अत्यंत मूलभूत विचारसरणीचा दुसरा तात्त्विक निबंध म्हणजे "विकार-विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती" याच पुस्तकात घातला आहे हेही युक्तच झाले.

पुढचा टप्पा

आता यापुढे काय असा प्रश्न उभा राहातो. ‘प्रागतिक पुस्तक प्रकाशन' आणि अशाच प्रवाहाचे विद्वान यांच्यापुढे काय कामगि-या उभ्या राहतात याचा थोडासा विचार या प्रसंगानुसार मांडल्यास वावगे दिसणार नाही असे वाटते.

आपल्या देशाचा आणि समाजाचा, ऐतिहासिक भौतिकवादाची मूलतत्त्वे लक्षात घेऊन लिहिलेला, असा इतिहास किंवा त्याची आखणी अद्याप झालेली नाही. ती करणे आवश्यक झाले आहे. असा संपूर्ण इतिहास रचणारी सामग्री किंवा तज्ज्ञ मंडळी आजमितीला फारशी नाहीत. तरीपण हे काम आराखडा किंवा पायाभरणीच्या रूपाने उपयोगी सामग्री घेऊन तिचा उपयोग करणारे विद्वान अगदीच नाहीत असे नाही. यासंबंधी माझे काही कच्चे विचार येथे नमूद करण्याचे मी धाडस करू इच्छितो.

अशा ग्रंथाचा आराखडा करण्यासाठी तीन-चार संग्रहांचा प्रथम वापर करावा. पहिला संग्रह म्हणजे राजवाडे यांचे संपूर्ण लिखाण. दुसरा संग्रह म्हणजे डी. डी. कोसांबी यांचा हिंदुस्तानच्या इतिहासाची प्रस्तावना व इतर लेख. तिसरा संग्रह के. पी. जायस्वाल यांनी लिहिलेला ' हिंदू पॉलिटी' आणि चौथा माझ्या ' आदि भारत' या पुस्तकात केलेली यज्ञसंस्थेची विवेचना.