कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

हे मतभेदाचे मुद्दे ग्रंथ संपूर्ण झाल्यावर मी लिहिणार होतो. तेव्हा किती भाग भाषांतरित केले ते आज सांगता येत नाही व आठवतही नाही. चौथ्या प्रकरणाची राजवाड्यांची हस्तलिखित प्रत तशीच पडून राहिली व पुढच्या दंगलीत सगळेच गहाळ झाले. पण राजवाडे आपल्या लिखाणाची एक प्रत स्वतःकडे ठेवीत असत. शिवाय मी पाठवलेले छापील फॉर्म होतेच. ती प्रत पुढे धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभा व राजवाडे संशोधन मंदिर यांच्या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. त्या सर्वांना धन्यवाद द्यावयास पाहिजेत. श्री.भट यांनी मी कैदेत असताना राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर पत्राने चौकशी केली होती, की त्यांना जी चार प्रकरणांची हस्तलिखिते राजवाडे यांच्या दप्तरांत मिळाली त्यापेक्षा आणखी हस्तलिखिते माझ्याकडे पाठविली होती का ? व ती आहेत का ? अर्थात् मी नकाराथीं उत्तर दिले.

राजवाडे यांनी आपली प्रतिज्ञा पूर्णपणे पाळली होती. मी जेव्हा एक फॉर्म छापून पाठवीत असे तेव्हाच ते दुसरा लिहीत. चौथ्या प्रकरणाचा भाग छापण्यापूर्वीच मी मार्च १९२४ मध्ये कैदेत गेल्यामुळे व माझ्या सहका-यांकडून त्यांना त्या प्रकरणांची छापील प्रत न मिळाल्यामुळे यांनी पुढचा भाग लिहिण्याचे सोडून दिले. मी १९२७ साली सुटून आलो तोपर्यंत ते दिवंगत झाले होते. राजवाडे यांच्या चौथ्या प्रकरणाच्या भागात ते स्त्री-पुरुषांच्या सांघिक अशा लैंगिक समागमातून एकपतिपत्नीक पद्धतीचा (मोनोगामीचा ) ऐतिहासिक विकास कसा दाखवतात याची मला नितान्त जरूर होती; कारण त्या घटनेचा खाजगी मालमत्तेच्या वे राज्ययंत्राच्या उदयाशीं निकट संबंध आहे. तो अत्यंत महत्त्वाचा तसाच गुंतागुंतीचा प्रश्न चौथ्या किंवा पाचव्या प्रकरणानंतर येणे अपरिहार्य होते. त्याच वेळी मी त्यांना एंगल्सच्या पुस्तकाची प्रत देणार होतो. ते जर मी करू शकलो असतो तर माझी खात्री आहे की राजवाडे यांनी आमचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धान्त मान्य केला असता. हे विधान करण्याचे धाष्टर्य मी करतो याचे कारण असे की त्यांच्या विवेचनात व विचारसरणीत हिंदु धर्म भावनेला धर्म नात्याने कुठेच स्थान नव्हते. वैदिक इतिहासावर लिहिताना ते नेहमी "आमचे रानटी ऋषिपूर्वज" असाच उल्लेख करीत. धर्मभावनेबद्दल त्यांची ऐतिहासिक वृत्ती काय होती याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांचा “ विकार आणि विचार प्रदर्शनांच्या साधनांची उत्क्रांती " हा लेख पाहावा. सध्या आपली घटना व समाजधारणा सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे असे जाहीर झाले आहे; पण हा केवळ जाहीरनामा आहे, सत्यनामा नाही. तो सत्य करावयाचा असेल तर सर्व शाळा-कॉलेजांतून, विशेषतः सर्व मंत्रिमंडळे, विद्वान शिक्षक आणि नोकरवर्ग यांना, या लेखाचे वाचन व मनन सक्तीचे करावे असे मला वाटते. या लेखातील एकच वाक्य नमुन्यादाखल उद्धृत करतो.

राजवाडे लिहितात : " स्थूलमूर्तीवरचा चित्रावरचा, वृक्षपशुपक्षादिकांच्या प्रतिमांवरचा तरी भ्रांत विश्वास अद्याप लुप्त कुठे झाला आहे ? आणि अद्यापि कुठे कुठे क्वचित् क्वचित् झाला. तथापि स्वर्ग, नरक, देव, देवदूत, जीव्होवा, गॉड, अल्ला या अमूर्त भ्रांत कल्पना अद्याप सर्वत्र विराजमान आहेतच. फक्त अद्वैती वेन्दाती म्हणून ज्यांना म्हणतात व भौतिक शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना म्हणतात त्याच्यातून काहींशा या कल्पना नष्ट झाल्या आहेत. परंतु या थोड्या काहींची संख्या पृथ्वीवरील लोकसंख्येच्या कितवा लक्षांश आहे ? अद्यापि जग बाल्यावस्थेत कसले शैशवावस्थेतच आहे " ( राजवाडे लेखसंग्रह पा. २६ प्रकाशन : साहित्य अकॅडमीतर्फे संपादक लक्ष्मणशास्त्री जोशी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. ). या लेखाची व वरील विधानांची बौद्धिक व शास्त्रीय झेप आमच्या अनेक विद्वानाना झेपायचीसुद्धा नाही.