Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या थोरवीसंबंधी मी लिहिण्याची जरुरी नाही. ते काम इतिहासतज्ज्ञ करतीलच. राजवाडे यांनी हिंदुस्तानच्या इतिहासशास्त्राची, भाषाशास्त्राची, समाजरचनाशास्त्राची जी अपूर्व व मूलभूत क्रांतिगर्भ रचना करून ठेवली तिचे नीट ज्ञान व अभ्यास अद्याप योग्यपणे झालेले नाही. हे खरे की खोटे हे अजमावयाचे असल्यास महाराष्ट्रातील किंवा हिंदुस्थानातील अत्यंत उच्च विद्यापीठात अत्यंत उच्चस्थानीय पाठक किंवा आचार्य जे काय शिकवतात ते पाहिल्यास कळून येईल. इंग्रजी राज्यात तसे होत होते तेव्हा त्याला इलाज नव्हता; पण आता ?

एक आठवण सांगतो. एका इंग्रजी मिशन-यांच्या शाळेत काही दिवस मी मास्तरकी केली होती. त्या वेळी मॅट्रिकच्या इतिहासवर्गात शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेचा इतिहाससारांश राजवाडे यांच्या प्रतिपादनानुरूपाने मी सांगितला. टेक्स्ट बुक बाजूला सारले. ते सर्व प्रिन्सिपलबाईंनी शेजारच्या वर्गातून आडून ऐकले. ती इंग्रज होती. तिचा तिळपापड झाला. मला ताबडतोब बोलावून माझी मास्तरकी पगार न देता तत्काळ बरखास्त करण्यात आली. हा प्रकार १९२० साली घडला.

आता तोच धडा मी परत सांगितला तर नोकरी जाणार नाही. राजवाडे यांचे इतिहासचित्रण आमच्या शिक्षणतज्ज्ञांना कितपत माहीत आहे किंवा मान्य आहे याची मला शंका वाटते. राजवाडे यांचे सर्वच सिद्धान्त किंवा मांडणी आहे तशीच मान्य करून इतिहासशिक्षण करावे असे माझे म्हणणे नाही. माझा स्वतःचाही मार्क्सवादी भूमिकेवरून त्यांच्याशी सैद्धान्तिक मतभेद आहे हे खरे; तरीपण इतिहास आध्यात्मिक द्वन्द्व विरोधानुसार मांडावा की विशिष्ट इतिहासजनित भौतिक द्वन्द्वातून मांडवा या बाबतीतील मुख्य शास्त्रांबद्दलचे मतभेद सोडले तर राजवाडे यांच्या पद्धतीने व त्यांची सामग्री घेऊनच इतिहास लिहावा लागेल असे माझे मत आहे. हिंदुस्थानविषयक इतिहासाची मार्क्सवादी शास्त्रशुद्ध मांडणी करणा-याला तर राजवाडेकृत लिखाणाचा भरपूर आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच कदाचिन् बुझर्वामान्य विद्वानांना राजवाडेअनुसारित इतिहासाची शिकवणी करण्याची भीती वाटत असावी. इतिहास-विकास सिद्धान्ताच्या मांडणीला भरपूर मालमसाला मिळू शकतो.

आणखी एक उल्लेख करणे आवश्यक आहे. राजवाडे यांच्या पहिल्या प्रकरणाचे इंग्रजी भाषांतर मी केले. त्याचा काही भाग माझ्या 'सोशॅलिस्ट' पत्राच्या मासिक आवृत्तीमध्ये जून १९२३ पासून छापण्यास सुरुवात केली होती. त्यात फक्त दोन पाने येऊ शकली ( पान ४१०-४११). नंतर आणखी एक हप्ता जुलै १९२३ च्या अंकात पान ४२३-४२४ वर आला आहे व पुढे चालू म्हणून लिहिले आहे. याच अंकात कव्हर पेजवर Marriages in Ancient India By V. K. Rajwade price four annas अशी इंग्रजीत जाहिरात दिली आहे. यानंतरचे अंक सापडत नाहीत. श्री. राजवाडे यांच्या इंग्रजी भाषांतराचा पहिला लेख छापताना मी एक अगदी त्रोटक नोट इंग्रजीत लिहिली आहे. ती येथे द्यावी असे मला वाटते. या प्रस्तावनेत माझा राजवाडे यांच्या काही निष्कर्षांबाबत मतभेद आहे असे त्याच वेळी मी नमूद करून ठेवले आहे. त्या ओळी येथे देणे कदाचित् अप्रस्तुत दिसेल हे खरे; पण मे-जून १९२३ ची ही माझी नोंद पुढच्या इतिहासाला उपयोगी पडेल असे वाटते. नोट : The veteran researcher Mr. Rajwade is known to every student of history. Those who would take every existing moral rule as descending directly from heavens eternal and true for all eternity to come and who would consider a violation of a moral value as criminalism would find that morality is an 'article' as much subject to the creative and evolutionary will of man as any dead thing as a chisel or a knife. Our deductions from the findings of Mr. Rajwade with whom we differ on many points we reserve. Ed. S.