मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

विशेषतः ह्या अंकांतील व पुढेंही मधून मधून येणा-या फारसी पत्रांचें लिप्यंतर आणि मराठी भाषानुवाद करण्याचे कामीं रा. रा. कृष्णलाल मोहनलाल जव्हेरी एम्. ए. एल्. एल. बी. ह्या गृहस्थांचें जर संपादकांस साहाय्य मिळालें नसतें तर फारसी भाग सध्यां तरी तसाच ठेऊन पुढें जावें लागतें. कारण जशी सध्याच्या मराठी जाणणारांस जुनी पत्रव्यवहाराची भाषा अगदी अपरिचितत्वामुळें दुर्बोध होते त्याचप्रमाणें जुनी फारसी पत्रेंही दुसरी भाषा फारसी घेऊन बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यासही फारच दुर्बोध होते असा आमच्याच मित्रमंडळींतील कांहीं फारशी पदवीधरांना आह्मीं तीं पत्रें दाखविलीं तेव्हां - आह्मांस अनुभव आला. सारांश रा. रा. जव्हेरी यांचें साहाय्य फारच मोलाचें झाले आहे, आणि तें त्यांनीं केवळ निरपेक्षबुद्धीनें व अत्यंत उत्सुकतेनें केलें आणि पुढेंही ते तसेंच वेळोवेळीं करणार आहेत ह्याबद्दल त्यांचे संपादकांवर अति उपकार होत आहेत. ह्या शिवायही संपादकांस नामदार दाजी आबाजी खरे बी. ए. एल् एल्. बी. रा. रा. सदाशिव रामचंद्र बखले बी. ए. एल. एल्. बी. इत्यादि बरेच विद्याव्यासंगी गृहस्थ कोणत्याही प्रसंगीं साहाय्य करण्यास उत्सुक आहेत ह्यामुळें संपादकांस उत्तेजन येत आहे. सारांश महाराष्ट्र इतिहास मासिक पुस्तकासंबंधीं संपादकीय कर्तव्य शक्य तितकें उत्तम होण्याची व्यवस्था कशी आहे हें वाचकांस आतां जास्त स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाहीं.

महाराष्ट्र इतिहासाच्या प्रत्येक अंकांत ४८ पानें पत्रें इत्यादिकांस दिलीं जातील; व उरलेल्या आठ पानांत मराठी पुस्तकांची पोंच व अभिप्राय. विशेषतः ऐतिहासिक पुस्तकांचें साधार व सोपपत्तिक परीक्षण करण्याचें योजलें आहे. प्रसंगविशेषीं आपल्या इतिहासाचें विवेचन करणा-या आंग्लादि परभाषेंतीलही पुस्तकांची चांचणी घेऊन त्यांची वाचकांस ओळख करून द्यावयाचे कामही यथावकाश करावें असें मनांत आहे. आश्रय चांगला मिळाल्यास ऐतिहासिक स्थलांचेंही सचित्र वर्णन करण्यास ठीक पडेल.