मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

व प्रत्येक तीन रुपयास एक प्रमाणें त्याची इच्छा असेल तर मासिक पुस्तकाच्या प्रती त्याला पाठवूं. अशा आश्रयदात्यांच्या उदारपणानें ऐतिहासिक पुरुषांचे हस्तलेखही प्रकाशलेखनद्वारा आह्मी वाचकांस देऊं. आमच्याजवळ श्रीशिवाजी, संभाजी, शाहू, नानाफडणवीस, बापू गोखले, परशुरामभाऊ पटवर्धन, महादजी, मल्हारबा इत्यादि अनेक जवळ जवळ दीडदोनशें निरनिराळ्या ऐतिहासिक पुरुषांचे हस्तलेख आहेत.

असो. काव्येतिहाससंग्रहाच्या मागें जवळ जवळ वीस वर्षांनीं हा स्वेतिहाससाधनप्रकाशनाचा उद्योग होत आहे. काव्येतिहाससंग्रहानेंच प्रथम आमचा इतिहास विदेशियांनीं लिहिलेल्या स्वरूपांत सत्यापासून किती दूर आहे याची थोडीशी कल्पना करून दिली. त्यावर आजपर्यंत मूळ कागदपत्रांचें यथाकालप्राप्तसाधन घेऊन कित्येकांनीं नाना फडणवीस, महादजी सिंदे, मल्हारराव होळकर अशांची चरित्रें लिहिलीं आहेत. त्या चरित्रलेखांनींही आमचा इतिहास अजून केवळ किती अंधुक आणि अपुरा आहे हें। अधिक स्पष्टपणें प्रत्ययास आणलें. सारांश, स्वेतिहासाचीं साधनें त्यांच्या मूळ स्वरुपांत उजेडांत येण्याची अवश्यकता मराठी वाचकांपैकी प्रत्येक प्रौढ व विचारी गृहस्थाच्या अंतःकरणांत आतां चांगलीच बिंबली आहे. तेव्हां काव्येतिहाससंग्रहाप्रमाणें सध्याच्या वाढत्या प्रमाणावर असणा-या आमच्या वाचनाभिरुचींत ग्राहकांच्या अभावामुळें हा आमचा प्रयत्न अर्धवट राहण्याची पाळी न येईल अशी बरीच उमेद आहे. ती ईश्वराच्या प्रेरणेनें महाराष्ट्र वाचक सफल करोत हेंच त्या दयावनाजवळ मागणें आहे.

संपादकीय कर्तव्यास मुख्यतः रा. रा. जगन्नाथ रघुनाथ घारपुरे, वामन रामचंद्र जोशी, आणि नारायण कृष्ण गद्रे, ह्या तिघांनींच जरी बांधून घेतलें आहे तरी रा. रा. पद्मनाभ भास्कर शिंगणे बी. ए. एल्. एल्. बी. आणि कृष्णलाल मोहनलाल जव्हेरी एम् ए. एल्. एल्. बी. ह्या गृहस्थांचें ह्या पहिल्या अंकापासूनच त्रिवर्गसंपादकांस पूर्ण साहाय्य आहे.