मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

अशीं हीं सोडविलेलीं पृष्ठें फिरून चिकटूं नयेत म्हणून त्यांच्यामध्यें एक एक टिपकागदाचें किंवा साध्याही कागदाचें पृष्ठ घालून ठेवावें लागतें. इतकें करूनही हीं पृष्ठें आपलें सर्व हृद्रत बोलून दाखविण्यास समर्थं होत नाहींत, इतकेंच नव्हें, तर कित्येक अगदीं निरक्षर म्हणजे मुकीं झालेलींच जेव्हां ओढळून येतें तेव्हां मनाला किती उदासवाणें वाटत असेल याची कल्पनाच करणें बरे ! कारण ह्या पृष्ठांचें सर्व तोंड मुख्यत्वें जिव्हा ह्मणजे अक्षरवटिका वाळवीनें साफ आमूलाग्र खाऊन टाकलेली असते. आह्मीं सध्यां छापण्यास आरंभ केलेल्या पत्रव्यवहारांतील शके १७१४ किंवा इ स. १७९२ सालच्या पुस्तकाची वरील सारखीच दशा आहे. तें कांहींच बोलूं शकत नाहीं. आणि ह्मणूनच आह्मांस शके १७१५ च्या वैशाखापासून आरंभ करावा लागत आहे. वास्तविक खर्ड्यांच्या लढाईला झालेलें मूळ कारण शके १७१५ च्या पूर्व कालांतील असल्यामुळें त्याचा वास्तविक बोध करून देणें हें काम ह्या मुक्या झालेल्या पुस्तकाकडे होतें. परंतु आज तरी त्याला बोलकें करण्याचे आमचे सर्व उपाय खुंटले आहेत. तथापि निराश न होतां आम्हीं आपलें काम अजून चालूंच ठेविलें आहे. ईश्वरेच्छेनें यश येतांच तें जें काय बोलेल तें महाराष्ट्रबांधवास आह्मी ऐकवूंच.

आमच्याजवळ असलेले सर्व कागद, रा. गोविंदराव कृष्ण काळे यांच्या बारनिशीचे होत. हे गोविंदराव कृष्ण काळे निजामाच्या दरबारीं पेशव्यांचे वकील असत. हे एक उत्तमांपैकीं मुत्सद्धी राज्यकार्यधुरंधर पुरुष होते. ह्याची खात्री वाचकांस त्यांच्या छापल्या जाणा-या पत्रांवरून सहजच होईल. रा. गोविंदराव भगवंत हे रा. गोविंदराव कष्ण यांचे पुण्यास सरकारी फडांत असले विश्वासपात्र कारकून होत. रा. गोविंदराव कृष्ण यांचा आमच्याजवळ असलेला पत्रव्यवहार तीन मुखांचा आहे.