मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

हीं साधनें अश्रांत परिश्रमानें कधीं उकिरड्यांतून तर कधीं उकिरडेवजी झालेल्या जुन्या वाड्यांतील तळघरांतून अथवा कधींही वापरांत नसणा-या तिस-या, चवथ्या मजल्याच्या माळ्यावरून-उन्हाळ्यांतील कडक ऊन, पावसाळ्यांतील पाऊस व हिवाळ्यातील थंडीचे कडके खाऊन कडकून, भिजून आणि फिरून आकर्षून- केरकचरा व वाळवी यांच्या अखंड मैत्रींत ‘कालोह्ययं निरवधिर्विपुलाचपृथ्वी ' ह्या भवभूतीच्या उक्तीवर विश्वास टाकून बसलेलीं अशीं रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे बी. ए. ह्यासारखे पदवीधर उजेडांत आणींत आहेत; त्यांनां अभ्यंगस्नानें घालीत आहेत; त्यांचे रोगग्रस्त भाग प्रसंगीं कळकळीच्या मवाळीनें सुसह्य होणा-या शस्त्रधारांनीं कापून काढून निराळे करीत आहेत; कित्येक ठिकाणीं । मलमें लावीत आहेत; तर कित्येक ठिकाणीं नवे अवयवही कृत्रिम त-हेनें बनवून चिकटवीत आहेत व जुन्यांस रजा देत आहेत. ह्या सर्व गोष्टी केवळ कविकल्पना वाटण्याचा पुष्कळ संभव आहे. परंतु ज्यांनी रा. राजवाड्यासारख्यांस सांपडलेले पत्रांचे गठ्ठे स्वतां पाहिले आहेत त्यांस तसें वाटण्याचे कांहीं एक कारण नाहीं. आह्मीं सध्या येथें जीं कांहीं दहा पांच पुस्तकें आणिलीं आहेत त्यांतील तीन चार पुस्तकें वाळवीनें इतकीं खाल्लीं आहेत, कीं त्या वाळवीच्या किड्यांच्या मृत शरीराची माती त्या पुस्तकांत भिनून एकंदर पुस्तकांची माती–कां? दगडी पाटीच बनली आहे. अशा स्थितींत असलेलीं हीं पुस्तकें फिरून बोलकीं करावयास प्रथम त्यांस युक्तीनें वाफारा द्यावा लागतो. हा वाफारा देतांच त्या प्रस्तराचे पापुदरे कांहीसें सुटे होतात. ते तसे सुटे झाल्यावर लगेंच गर्भाशयांतील शस्त्रक्रियेच्या प्रसंगीं जितक्या हलक्या हातानें आणि कळजीपूर्वक काम करावे लागतें त्यापेक्षांही अधिक हलक्या हातानें आणि कळकळीनें त्या प्रस्तरप्राय पुस्तकाचें एक एक पृष्ठ सोडवावें लागतें.