Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

८. ह्या दूषित इंग्लिश लक्षणापेक्षां आपल्या आर्य पूर्वजांनीं हजारों वर्षांपूर्वी इतिहासाचें जें लक्षण ठरविलें आहे, तें अगदी निर्दोष आहे. तटस्थ्यवृत्तीनें दोषरहित लक्षणें करण्यांत त्यांचा हातखंड़ाच असे. इति ह आस, असें झालें, असें होतें, हें इतिहासाचें लक्षण आर्यांचें होय. मानवसमाजाच्या गतचरित्रांतला अमुक भाग इतिहास नाहीं, व अमुक भाग इतिहास आहे, असें हे लक्षण सांगत नाहीं. तर जें जें कांहीं झालें, तें तें सर्व इतिहास होय, असें साध्या तीन शब्दांनीं तें जाहीर करीत आहे. ह्या लक्षणांत समाजांतील सर्व हालचालींचा अंतर्भाव होतो. इतिहासाचें हें आपलें वडिलोपार्जित लक्षण दोषरहित असल्यामुळें, शिरसा मान्य करण्यांत मोठा अभिमान वाटतो.

९. इति ह आस, ह्या लक्षणांत समाजाच्या गतचरित्राचाच तेवढा समावेश केलेला आहे, वर्तमान चरित्राचा केलेला नाहीं, अशी शंका आणितां येईल. परंतु, किंचित् सूक्ष्म विचार करून, शास्त्रीयरीत्या पाहतां वर्तमान म्हणून ज्याला म्हणतां येईल असें या जगतांत काय आहे? ज्या क्षणाला वर्तमान म्हणावें, तो क्षण बोलतांबोलतांच गत होऊन इति-ह-आस-पदवीला जाऊन पोहोंचतो. तेव्हां वर्तमान इतिहास, वर्तमान जग, वगैरे जे शब्दसमूह आपण योजितों, ते सर्व परस्परविरोधी आहेत, हें उघड आहे. आपल्या डोळ्यांसमोर नुकत्याच होऊन गेलेल्या ज्या गोष्टी, त्यांच्या वर्णनाला आपण वर्तमान इतिहास म्हणून परस्परविरोधी नांव देतों इतकेंच वस्तुत: तें वर्णन गतगोष्टींचेंच असतें. एवढेंच कीं, ह्या गतगोष्टी इतर दूरच्या गतगोष्टींहून कमीजास्त अलीकडच्या असतात. तात्पर्य,Present history, present politics, हे जे शब्द युरोपियन लेखक योजतात, ते सर्व भ्रामंक व अशास्त्र होत. त्यांच्या लेखांतील Present ह्या शब्दाचा अर्थ 'नुकतेंच होऊन गेलेलें, 'असा वस्तुत: असतो. Present ह्या शब्दाच्या ऐवजीं Immediate past, recent past, हे शब्द जर यूरोपियन इतिहासकार योजतील, तर योग्य अर्थाच्या उद्धोधनार्थ योग्य शब्दाची योजना केली, असें होईल आणि Politics is present history, वगैरे विरोधात्मक वाक्यरचना होणार नाहीं.

१०. एवंच, समाजाच्या चरित्रांतील गत गोष्टींची जी हकीकत ती इतिहास होय; मग ती गोष्ट होऊन एक दिवस झालेला असो किंवा हजार वर्षे झालेलीं असोत. गतकाल हाच तेवढा इतिहासाचा सशास्त्र प्रांत असून, वर्तमानकाल केवळ क्षणमात्रावस्थायी असल्यामुळें, वर्णनाचा किंवा हकीकतीचा विषयच होऊं शकत नाहीं. हा असा विभाग यथास्थित न केल्यामुळें वर्तमानकाळचा इतिहास लिहिणें धोक्याचें, नाजूक व अतएव अशक्य, निदान अहितकारक आहे, असें विधान पाश्चात्य इतिहासकार वारंवार करतांना दृष्टीस पडतात. वस्तुत: पाहतां ज्याला ते वर्तमानकाळ म्हणतात, तो भूतकाळ होऊन गेलेला असतो, व त्याच्यावर हजारों लेख व विचार येऊन गेलेले असतात व येत असतात. हे विचार व हे लेख ज्याला ते वर्तमानकाळ म्हणतात, त्यांचेच अपूर्ण इतिहास असतात. मात्र, इतिहास म्हणून संभावित नांव त्यांना दिलेलें नसतें. इतिहासलेखनाचा राजरोस धंदा करणारे जे आहेत, ते मनांत मांडे खात असतात कीं, वर्तमानकाळचा इतिहास अद्याप लिहिला गेला नाहीं, व लिहिला जाणारहि नाहीं परंतु, हा त्यांचा केवळ भ्रम असतो. अनंतहिंतकाळांतील ज्या मोठमोठ्या व्यक्ती हयात असतात, त्यांचा उपमर्द होईल, त्यांची गुह्यें फुटतील व त्यांचा रोष होईल, या भावनेनें संभावित इतिहासकार ह्या वर्तमान म्हणून समजलेल्या काळाचा इतिहास लिहित नाहींत. वस्तुत: पाहतां दूरच्या भूतकालीन इतिहासांशी ज्यांचा गाढ परिचय झाला, त्यांना जवळच्या भूतकालीन इतिहासावर विचार प्रकट करण्याचा सर्वतोपरी अधिकार आलेला असतो. त्या अधिकाराचा त्यांनी योग्य कालीं उपयोग न करतां स्तब्ध बसावें, ही गोष्ट निव्वळ, त्यांच्या हट्टाची व अज्ञानाची दर्शक होईल. त्यांनीं इतिहास लिहिला नाहीं म्हणून इतर लोक तो लिहावयाचा थोडाच सोडतील !