मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

प्रस्तावना

१. आठवा खंड १९०३ सालीं संपला. पुढें दोन वर्षांनीं हा सहावा खंड संपत आहे. विलंबाचें कारण असे कीं, ह्या खंडांत इतर कोणत्याहि खंडांतल्यापेक्षां मजकूर जास्त आहे. शिवाय, तंजावर वगैरे स्थलीं प्रवास करण्यांत फार वेळ गेल्यामुळें, मजकूर देण्याला वेळोवेळीं दिरंगाई झाली. वांई, सातारा व नासिक येथील दोघा तिघा गृहस्थांनीं मजकूर तयार करण्याचें जर मनावर घेतलें नसतें, तर इतर कामें संभाळून, तो देतां आला असतां किंवा कसें, याचीच शंका आहे. खरें पाहिलें तर, काम वेळच्या वेळीं उठण्यास, दोन चार स्वतंत्र मनुष्यांची योजना पाहिजे आहे. तशांत मनुष्यें नुसतीं स्वतंत्र असून उपयोगीं नाहीं, तर तीं तज्ज्ञ असलीं पाहिजेत. म्हणजे मूळ शुद्ध व विश्वसनीय लिहून निघून, मजकूरहि वेळेवर तयार होत जाईल. परंतु, असला सुदिन उगवे तोंपर्यंत जसें लिहून निघेल तसें घेतलें पाहिजे; आवडनिवड करण्याची सोय नाहीं.

२. आवडनिवड करावयाची म्हटली म्हणजे तज्ज्ञ माणसें व भरपूर पैसा पाहिजे. मूळ कागद वाचून तो नीट बाळबोधींत लिहून काढावयाचें काम वरवर पहाणा-याला वाटतें तितकें सोपें नाहीं. शक १६२२ पासून शक १७६० पर्यंतच्या ऐतिहासिक पत्राचें मोडी अक्षर वस्तुत: प्रत्येक सुशिक्षित महाराष्ट्रीयाला वाचतां यावें. परंतु, अनुभवाची गोष्ट आहे कीं, हें आधुनिक मोडीहि बहुतेकांना नीट वाचतां येत नाहीं. याचें मुख्य कारण स्वदेशाच्या इतिहासाचें व भाषेचें जितपत सशास्त्र ज्ञान असावें, तितपत सध्यांच्या इंग्रजी व मराठी शिकलेल्या एतद्देशीय लोकांना असत नाहीं. मुसलमानी नांवें, जुनीं मराठी नांवें, जुने मराठी शब्द, स्थलनामें, वगैरे कधींहि कानावरून गेलीं नसल्यामुळें, संशयित व असंशयित अशा दोन्ही ठिकाणी ह्या लोकांच्या चुका होतात; व ह्यांना नकला करावयाला सांगण्यापेक्षां आपण स्वतःच लिहून काढणें जास्त सोयस्कर वाटूं लागतें. ही कथा १६२२ पासून १७६० पर्यंतच्या लेखांची झाली. शक १६२२ च्या पलीकडील तीन चारशें वर्षांचे जे लेख आहेत, ते तर ह्या लोकांना मुळीं वाचतांच येत नाहींत. जुने ताम्रपट व शिलालेख वाचणें, ह्या लोकांना जितकें कठिण जाईल तितकेंच हे लेख वाचणेंहि कठीण जातें. ही अडचण इंग्रजी शिकलेल्या नवीन लोकांनाच भासते असें नाहीं. तर मोठमोठ्या जुन्या फर्ड्या कारकुनांचीहि ह्या जुन्या लिखितांपुढें बोबडी वळलेली मीं पाहिली आहे. श्रीमंत बावडेकर यांचें दफ्तर तपासतांना अशा एका जुनाट कलमबहादराची व माझी गांठ पडली. पत्रें शिवाजी महाराजांच्या वेळचीं होतीं. त्यांतील एखाददुसरें अक्षर हे गृहस्थ अधूनमधून लावूं शकत. कोणतेंहि एक वाक्य सबंद लावण्याची ह्यांना मुष्कील पडे. शब्द, प्रयोग, रूपें वगैरे सर्वच प्रकार जुना पडल्यामुळें ह्या कारकुनाला वाचण्याची अडचण पडे, असा तर प्रकार होताच. परंतु त्याला मुख्य अडचण जी पडे ती तत्कालीन मोडी अक्षरें ओळखण्याची पडे. तशांत, मराठी बनलेले फारशी शब्द ह्या पत्रांतून फार असल्यानें अशा अनभ्यस्त वाचकाला मोठी पंचाईत पडते. सबब स्वेतिहासाच्या प्रेमानें जुना किंवा नवा कोणीहि अनभ्यस्त मनुष्य ह्या पत्त्रांच्या नकला करून देण्याला सिद्ध झाला, तर त्याला तुझे उपकार करून घेण्याची सोय नाहीं, असें निरूपायानें सांगावें लागतें. आतां सर्व लेख स्वतःच लिहूं जावें, तर तेंहि अशक्य आहे. कितीही उत्साह असला, तरी मानवी बोटांनी काम करण्याची कांहींतरी मर्यादा आहेच आहे.