Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना


७. अवरंगझेब बादशहा हा १७०७ च्या फेब्रुवारीच्या २० व्या तारखेस वारला ह्यावेळीं परसाजी भोसले नागपुराकडे, चिमणाजी दामोदर दक्षिणव-हाडांत, कठसिंग कदमराव खानदेशांत, खंडेराव दाभाडे गुजराथेंत, कान्होजी आंग्रे कोकणांत, उदाजी चव्हाण मिरजेकडे, हिंदुराव घोरपडे कर्नाटकांत, दमाजी थोरात बार्शीपानगांवकडे, धनाजी जाधव, हैबतराव निंबाळकर व मानसिंग मोरे उत्तर व दक्षिण पाईन घाटांत व स्वराज्यांत, ताराबाईच्या म्हणजे मराठ्यांच्या वतीनें मोंगलाच्या म्हणजे अवरंगझेबाच्या विरुद्ध लढत होते. ह्याखेरीज प्रांतोप्रांतीचे बहुतेक सर्व मराठे एकजुटीनें मोंगलाची सत्ता हाणून पाडण्यास जिवापाड मेहनत करीत होते. ही जूट इतकी कांहीं बेमालूम जमली होती कीं, तिनें अवरंगझेबासारख्याहि मुत्सद्यांस हताश करून सोडिलें. तीस वर्षे सारखी मेहनत करून दक्षिण जिंकण्याचे अवरंगझेबाचे विचार जागच्या जागीं जिरून गेले; आणि दु:खानें, पराभवानें व चिंतेने करपून जाऊन तो दुर्दैंवी पातशाहा समाप्त झाला. समाप्तीच्या सुमारास मराठ्यांना जास्तच जोर आला व त्यांनीं पातशाही प्रांतांत आपला अंमल बसविण्याचा जास्तच हुरूप धरला. हा हुरूप विझविण्यास मराठ्यांची एकजूट फोडणें एवढाच एक उपाय राहिला होता. तो तोडगा अवरंगझेबानें मरतां मरतां करून ठेविला. त्यानें शाहूला स्वराज्यांत जाण्यास परवानगी द्यावी असा बूट काढिला; व तो बूट त्याच्या मरणोत्तर अमलांत आला. शाहूच्या सुटकेनें मराठ्यांची एकजूट फुटली व त्यांच्या घरांत कलीनें प्रवेश केला.

८. १७०७ च्या मार्चांत शाहु माळव्यांतील अजमशहाच्या लष्करांतून निघाला व मे च्या सुमारास खेडाजवल आला. ताराबाईकडील मराठ्यांचा व शाहूचा त्या स्थळीं युद्धासारखा कांहीं प्रसंग झाला व त्यांत ताराबाईकडील बरेंच सैन्य शाहूला येऊन मिळालें. उत्तरेकडील परसोजी भोसले, चिमणाजी दामोदर व खंडेराव दाभाडे व दक्षिणेकडील धनाजी जाधव, हैबतराव निंबाळकर व मानसिंग मोरे असे प्रमुख प्रमुख सरदार खेडाजवळ एकत्र झाले. मोगलांची कांहीं कालपर्यंत मराठ्यांच्या उपद्व्यापी पराक्रमापासून सुटका झाली. महाराष्ट्राच्या उत्तरेस, पश्चिमेस व दक्षिणेस मराठ्यांनीं मोंगली प्रांत काबीज करण्याचा जो प्रयत्न चालविला होता, तो कांहीं वेळ थंडा पडला व आपसाआपसांत यादवी करण्यास त्यांनीं आपली सर्व मेहनत खर्ची घातली. अप्पाजी थोरात, दमाजी थोरात, शहाजी निंबाळकर, संताजी पांढरे, रामचंद्र नीळकंठ अमात्य, खेम सावंत, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, शंक्राजी नारायण सचिव व परशरामपंत प्रतिनिधि ताराबाईच्या पक्षाला मिळाले; आणि परसोजी भोसले व धनाजी जाधव वगैरे सरदारांनीं शाहूचा पक्ष स्वीकारिला. ही मराठ्यांची यादवी १७३१ पर्यंत चालली व तोंपर्यंत त्यांना मोंगलांच्या प्रांताकडे दृष्टि फेकण्यास फारशी फुरसत सांपडली नाहीं.