मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना 

शकावलीच्या ३८ व्या पृष्ठावर 'बेहे येथें स्वारी करून' इतकाच अपूर्ण उल्लेख आहे. शकावलीकर्त्याला मिळालेलीं दफातीं अपूर्ती होतीं ह्याला दुसरा पुरावा तिस-या खंडांतील १३५ व्या लेखांकाचा आहे. ह्या लेखांकांत १७१९ त सुमंत पदावर महादाजी गदाधर व न्यायाधिकारी सखो विठ्ठल होते असा उल्लेख आहे. प्रधानमंडळांत वेळोवेळीं झालेल्या फेरबदलाचा निर्देश शकावलींत तर केला नाहींच; इतकेंच नव्हे तर विशेषनामांचाहि नीट निर्देश केला नाहीं. शकावलीच्या २१ व्या पृष्ठावर महादाजी गदाधर ह्या नांवाबद्दल महादाजी गंगाधर व सखो विठ्ठल ह्या नांवाबद्दल शिवो विठ्ठल असें लिहिलें आहे व तें अर्थात् चुकलें आहे. दफात्यांच्या अपूर्णतेची तिसरी साक्ष तिस-या खंडांतील लेखांकाची आहे. ह्या लेखांकांत “ फत्तेसिंग बाबा भोंसले तुळजापूराजवळ भारी फौजेनिशीं ” १७१७ त ” होते ” म्हणून लिहिलें आहे. १७१७ त फत्तेसिंग भोंसले लहान पोर असावा अशी शकावलीकर्त्याची, इतर सर्व लेखकांप्रमाणें समजूत असल्यामुळें, त्याचा उल्लेख त्यानें १७२६ तील कर्नाटकच्या स्वारीच्या आधीं केव्हांही केला नाहीं. परंतु लेखांक ४५३ वरून १७१७ त फत्तेसिंग भारी फौजेचें सेनापतित्व करण्यास योग्य होता असें स्पष्ट दिसत असल्यामुळें, त्याच्या नांवाचा अनुल्लेख शकावलीकर्त्याला मिळालेल्या साधनांच्या अपूर्तेपणाचाच परिणाम होय, असें म्हणावें लागतें. सारांश, बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीसंबंधीं शकावलीकर्त्याची माहिती बरीच अपूर्ती आहे ह्यांत संशय नाहीं. ग्रांट्डफच्या माहितीपेक्षां ती जास्त आहे. परंतु आधुनिक जिज्ञासूला जितकी विस्तृत माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे तितकी ती नाहीं हें स्पष्ट आहे. 

४ शकावलींतील अपूर्णता केवळ दफात्यांच्या अभावाचा किंवा अपूर्तेपणाचाच परिणाम आहे असें नाहीं. तत्कालीन कर्त्या पुरुषांच्या वरिष्ठकनिष्ठतेसंबंधींही ह्या लेखकांची कल्पना कोती होती असें दिसतें. तिस-या खंडांतील ४५३ व्या लेखांकावरून १७०७ पासून १७२० पर्यंत शाहूमहाराजांनीं स्वत: ब-याच मोहिमा कोल्हापूरच्या संभाजीवर केलेल्या असाव्या असें स्पष्ट सिद्ध होतें; परंतु शाहूचें नांव शकावलीकर्त्यानें मोहिमेसंबंधीं कोठेंहि काढिलेलें नाहीं. संभाजीवर शाहूनें स्वत: स्वा-या केल्या; परंतु मोंगलावरती शाहू स्वत: कां गेला नाहीं, ह्याचाही उल्लेख त्यानें केला नाहीं. शाहू पातशहाचा व पातशहाच्या अंमलदारांचा मिंधा होता व त्यामुळें मोंगलावर स्वत: जाण्यापेक्षां सरदारांना पाठविणें त्याला योग्य दिसलें, वगैरे संबंध शकावलांच्या लेखकाला समजलेले नव्हते. तसेंच, इतिहासाची व्याप्ति मोहिमांच्या पलीकडे नाहीं अशीही ह्या लेखकाची समजूत असावी असें वाटतें. प्रत्येक मोहिमेंतील निरनिराळ्या प्रसंगांच्या मित्या ह्या लेखकानें दिल्या असल्या तरीदेखील त्याच्या उद्योगाचें चीज झालें असतें; परंतु आकुंचित अशा दृष्टीनें इतिहासाचें अवलोकन करण्याचें त्याच्या नशीबीं आल्यामुळें प्रस्तुत शकावली नानाप्रकारें अपूर्ण उतरली आहे.