पदरीं काही नाही आणि कुटुंब भारीं. अन्नाचा मजकूर येऊन पडिला. ते वेळेस हि तुलबाजी नाईक मरळ जिवाजी नाईक मरळ याचे बाप तो हि तेथे होता. त्याचा भाऊ रामाजी नाईक कल्याण प्रा। भिवडी नि॥ सोनाल तपियात पहिलाच नांदत होता. त्याणे काही आमच्या वडिलाचा परामृष थोडा बहुत केला. ह्मणून जावजी सेडकर पाटील दापोडे व सोनजी कोढीतकर पाटिल हरपोडी याणी मधेस्ती करून, तुलबाजी नाईक व रामाजी नाईक मरळ यासी लासीरगाव देविला. त्याचे खरेदीखत करून द्यावे त्यास सेरणी पडेल, ह्मणून आपले आजे कानोजी जुंझारराऊ यासी जावजी सेडकर व सोनजी कोढीतकर याणी कितेक विचारें समजाऊन, याची सरपोसी करणे ह्मणून बोली करून, तुलबाजी नाईक यासी लासीरगावचा कागद करून दिल्हा. त्यामधे लेहविले जे, तुझा आजा बाजी नाईक व आपले आजे कानोजी जुंझारराऊ ऐसे साक्षात भाऊ ह्मणून लेहून दिल्हा आहे. अजीतागाईत त्याची फुटी पडो दिल्ही नाही. लासीरगाव जिवाजी मरळ याच्या वडिलास दिल्हे, परंतु काही त्याच्या वडिलास खरेदीखत करून दिल्हे नाही. गाव त्या तागाईत खात आहेत. त्यास जिवाजी नाईक त्याच्या वडिलानीं रास्ती टका देऊन, गावचे खरेदीखत करून आमच्या वडिलापासून घेतले नाही. ऐसे असोन त्याने गांव खादला आहे इतकेहि त्याचे चालविले. परंतु तो कजिया करावयास उठिला. आह्मी काही आपल्यापासून अंतर पडो दिल्हे नाही. आता निदानची गोष्टी तो काही आपले वंसीचा नव्हे. त्याणे काही अजीतागाईत नागवण अगर वतनावरी टका पडिला त्याची तक्षीम दिल्ही असेल, त्याचा कागदपत्र त्याजपासी दिवाणचा अगर आमच्या वडिलाचा असेल, तो त्याणी काढावा. त्यासी नागवणा व खंड पडले. सदरहू पहिले व त्या अलिकडे शामलाने आपले आजे व आपणास कबला देखील धरून राजपुरीस गेले होते, त्याची खंड खुद जातीचा व जमानगती व खर्च अंतस्त देखील रुपये ७००० सात हजार पडले. व हाबसी याचे वरातदार व स्वारीया येऊन बैसत होत्या. त्यास पोटखर्च गला कैली खठडी ४० चाळीस खंडी लागला. कानोजी जुंझारराऊ राजपुरीस बंदांत सा महिने होते. त्याणीं सा महिने बंद वोढिले. ते तेथेच मरावे, परंतु वतनावरी जीव सांडावा हा हेत त्याचा; ह्मणून निकड करून केवळ मढें ऐसेच ह्मणून उचलून आणिलें. धानेबीं आलियावरी ते मेले. तिसरा दिवस गेला नाहीं. जे दिवशी वतनावरी आले त्याचे दुसरे दिवसी मेले. व शंकरराऊ आपले वडील चुलते क॥ खेड ता॥ खेडेबारे येथे मोगलाच्या बंदांत मेले. ऐसे कितेक खून खराबी व पैका टका पडिला सिंहासनपटी व मागे टका पडला. तेव्हा गोडसे ह्मणून सावकार होते त्याजपासून दोन हजार घेऊन दिल्हे होते. ते अजीपावेतो आपण व्याज देखील फेडिले. ऐसी बहुत खराबी जाली आहे. टका उदंड पडिला. त्यास जिवाजी नाईक याणे अगर त्याच्या वडिलानीं अजी तागाईत एक गाव खात आहेत. याजवरी तक्षीम पडली. त्यामधे एक रुपया अथवा एक पैसा तोहि दिल्हा नाही, आणि वृत्ती खात आहेत. आपल्या वडिला त॥ टका पैका पडला व आपले खून जाले आहेत. ऐसी खराबी या वतनाकरिता जाली. ऐसी हकीकत असोन, आपणासी जिवाजी मरळ याचे वडील पूर्वज बाजी नाईक मरळ कामाकाजास आला ह्मणून भाऊ मानिला होता. त्याजला आपले वडिल बाबाजीराऊ याचे पुत्र थोरले कानोजी जुंझार बाजी काका ऐसे जिवाजी नाईकाच्या वडिलास ह्मणत होते. ऐसे त्याचे दाखले आहेत. कानोजी जुंझारराऊ याणीहि मालुमातीचा कागद लासीरगावचा लेहून दिल्हा आहे. त्यामधे साक्षात भाऊ आपले आजीयाचे भाऊ ह्मणोन लिहिले आहे. परंतु बाजी नाईक मरळ काही आपले वंसीचा नव्हे, हे गोष्टी खरी असे. त्याच्या वडिलास आपल्या वडिलानी प्रगणियांत मातबर गाव सरस होता तो दिल्हा असे. हे गोष्टी दाखलियानसी खरी करून देऊन. अवघे गोष्टीची गोष्टी जिवाजी नाईक मरळ हा काही आमचा नव्हे. आपली वंशावळी सदरहू लिहिली असे. त्यामध्यें जिवाजी नाईक मरळ याचे वडील बाजी नाईक मरळ याचा दाखला आपले वंशावळींत नाही. सार गोष्टीची गोष्टी जिवाजी नाईक मरळ आपणासी कथला वृत्तीविभागाचा करितो. परंतु तो आपले वंसीचा नव्हे, हे खरे लिहिलें. सही.''