मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

तेव्हा त्या शिरास घेऊन कोपर्डेयासी आली. तो तेथे च पीर जाहाला मग तेथून मसुरास आणिला मग त्याचे बाईलेने त्याबराबर समाती घेतली मग ते वेळेस बाबाजीराऊ यानी बहुत च सुखसोहळे केले आणि बेदरचे सुतार आणिले आणि खनवडच्या माळावरी साव होता तो तोडून त्याचा गुमट बाधला आणि मुजावर तिघे जण चाकरीस ठेविले तो ते वेळेस कराहाडामधे तुरकाचे राज्य होते त्याने बहुत मुजावर बळावले आणि बाबाजीराऊ बहुत माहातारा जाहाला. त्याचे पोटी लेक दोघे जण, वडील विठोजी, धाकटा कुमाजी, ऐसे दोघे होते त्याचे चाकरीस माळी होते रोज पाच मण फुल बाबाजीराऊ याच्या पलगावरी भोगवट्यास पडे मग त्याचे बहुत च माहातारपण जाहाले आणि गावामधे मुजावर बळावले आणि माहातारपणचे लेक एक चौवरसाचा आणि एक डिडवरसाचा ह्मणऊन घरच्या कारभारास माळी ठेविले आणि धणगर मेढरे राखत होता तो सेताच्या कारभारास ठेविला आणि त्याची आई मगी धणगरीण ऐसी होती मग मुजावर व माळी व धनगरीण ऐसे एक होऊन सूत केले की बाबाजीराऊ मारावा आणि मुले हि मारावी ऐसे सूत केले मग मगी धणगरीण ईस पैके मुजावर यानी दिल्हे की, हे काम करणे मग मगी धणगरीण त्याचे पाळतीस लागली, आणि कुसवास कोपी बाधिली की लेकास निजावयासी बाधिली आणि मग आतोन सुरुग कामाविला आणि मगी धणगरीण घरास आली की, लेकाचा विडा घातले काही खर्चास देणे मग बाबाजीराऊ बोलिले की काही देतो ह्मणऊन बोलिले जे वेळेस धणगरीण पाळतीस गेली होती ते वेळेस बाबाजीराऊ पलगावरी निद्रा केली होती आणि थोरला लेक पाळण्यात निजला होता आणि धाकटा लेक बाइलेचे पुढे होता ऐसे पाळून माघारी घरास गेली तो मगी धणगरीण ईस कोकणामधे पळविले आणिगे मग मारेकरी आले. तो धाकटा लेक पासोडीमधे गुडाळून पलगाखाली टाकिला आणि बाबाजीराऊ पलगावरी च मारिला मग थोरला लेक बोलिला की, म्या तुह्मास वळखिले आहे, तुह्मी मुजावर गावातील आहा, तुह्मी माझ्या बपास मारिले. ह्मणऊन बोलिला मग त्यानी त्यासी मारिले मग त्याची बाईल एके कमोनी लपाली होती ती मग धागटा मूल कुमाजीराव घेऊन चितळीस पळोन गेली मग तेथे मूल दहा बारा वरसाचा जाहाला मग त्याने धणगरास धरून गेले तेव्हे तो धणगर बोलिला की, मुजावराने मारिला ह्मणऊन बोलिला तेव्हा कुमाजीराऊ यानी मागते पन्नास माणूस घेऊन परटिकीत आला आणि सुताराची थळी आणिली आणि तिघा जणाच्या माना तोडिल्या मग कराहाडच्या मुजावरानी पाळत लाऊन कुमाजीराऊ यासी धरुन घेऊन गेले आणि परकोटात नेऊन चिणला तो तीन वरसे होता मग त्यास सोइरीक माहादजी पाटील चरेगावकर याची बहीण केली होती त्यास माहादजी पाटील सोडवावयासी आला होता मग त्याने आपले हाती घेतला त्यास नागवाण बाधली व्होन साडे तीन हजार त्याबद्दल देसमुखी अमानत ठेविली की, पैके द्यावे आणि वतन खावे, पैके न दे तरी देसमुखी व पटेलकी लेहून द्यावी ऐसे जाहाले मग त्यामागते रस्त उचलावयासी इसाबखान देऊन बाहेर घालविले ते कृष्णेचे काठास आले आणि कुमाजीराऊ बोलिला की, पैके कोठून द्यावे आणि वतन कोण्हाचे घ्यावे ऐसे बोलिला मग माहादजी पाटील बोलिला की, कैसे करावे ?