मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक २

श्री
श्रीजटाशंकर कुळकथा

कराहाडचे देसाई जगदेराऊ राजगर्दल देसमुख त्याच्या बायका दोघी जणी त्याचे लेक चौघे जण वडील वाइलेचा लेक बाबाजीराऊ धागटीचे तिघे जण, वडील रामोजीराऊ, मधला विठोजीराऊ, धागटा दयाजीराऊ ऐसे चौघे जण होते तो बाप माहातारा जाहाला आणिगे झगडू लागले बाप ह्मणउन लागला की तुह्मी झगडू नका तुमचे तुह्मास वाटणी करून देतो ह्मणउन बोलिले मग वडील बाबाजीराऊ यासी मसूरीची पटेलगी व देसमुखी व गाव त्याखाले ऐसे त्यास दिल्हे मग रामोजीराऊ यासी कराड वा आउद व आणखी दोन गाव कराडाखाले ऐसे चार गाव त्यास दिल्हे मग रामोजीराऊ यानी कारभार करावयासी दोघो नाहवी आउदचे मुतालीक कराहडामधें ठेविले व कारकून दोघे रघुनाथपत व आणखी एक ऐसे ठेविले व मोकासा हि दयाजी थोरातास जाहाला होता आणि दिवाणीची रस्त व्होन च्यारसे भरले ते पैकेस दकात घालून ठेविले ते पैके मुतालीक नाहवी यानी दिवाणीच्या रस्ता चोरिल्या ते वेळेस नाहवी व कारकून व मोकासी ऐसे तिघे जण एक जाहले होते मग हे तिघे जण मिळोन रामोजीराऊ व विठोजीराऊ व दयाजीराऊ या तिघा भावास मारावे ऐसे केले मग दोघे भाऊ रामोजी व दयाजीराऊ यासि घरामधे कोडून मारिले मग एक भाऊ विठोजीराऊ मसुरास पळोन आला मग ते वेळेस बाबाजीराऊ बोलिले की तेथील गमाविलेस आणि येथील हि गमावयासि आलास ह्मणऊन बोलिला मग तेव्हा विठोजीराऊ ते वेळेस बेदरच्या पादछाकडे लाऊन दिल्हा, तो तेथे च चाकरीस लागला मग पेडगावीची पटेलकी व मोकासा घेतला तो कारकून कराहापडची मुतालकी करीत होते ते मारून काढली हणमततटीस मुशारपण करून पोटे भरू लागले मग तेव्हा तारगावीची पटेलकी ते हि आमची च आहे मग तेथे मुतालीक ब्राह्मण ठेविले मग त्या ब्राह्मणानी चाकर ठेविले, काळीगडे आणि खोचरे हे दोघे जण ठेविले, आणि ते बापलेक काशीस दोघे चालिले. मग हे वाटेस कोळीगडा व खोचरे यानी मारिले मग हे दोघे जण पटेलकीसाठी भाडू लागले तेव्हा खोचर्‍याने घोरपडे पाटिलासी मिळविले मग हे दोघे जण खाऊ लागले कुडलचे पाटिलाच्या दोघी लेकी होत्या, कमळज्या व कुष्णा ऐशा होत्या. मग बाबाजीराऊ यासी दिल्हे कुष्णास आणि दुसरी जानोसी पिसळा यासी कमळजा दिल्ही मग जानोजी पिसळ्या हे शार बेदरी पादछापासी चाकरीस होते तेव्हा त्यानी शिर्क्यावरी नामजात रवाना केली ते रडतोडच्या घाटापावेतो गेले मग त्यामधे एक मुसलमान होता त्याने तफावती केली मग तेथून च माघारे मुरडून पादछायापासी गेले तो हक्कमुनसाबेने जानोजी पिसळ्या मारावयासी उठला मग जानोजी पिसळ्याने कटार व तरवार उपसोन एका च कचक्याने तुरकास मारिले ते वेळेस पादछाव धावून आले सोनियाचे काठीने वारावारी केली पादछाव बोलिले कीं ऐसे कैसे केले मग जानोजी पिसळा बोलिला की, हक्कमुनसाबीने मारिला, मी हि मुसलमान होईन मग ते वेळेस पादछाने विचारिले की खरे च की काय ? ऐसे विचारिले मग ते वेळेस जानोजी पिसळा बोलिला की खरे च मग तेव्हा पादछानी कदरीस बैसविले आणि सुनता केली आणि तश्रिफा व हत्ती घोडा व पालखी दिल्ही मग जानोजी पिसळा बोलिला की मी शिर्का कापून काढितो .