प्रस्तावना

१. पूर्वजांच्या इतिहासाची आस्था महाराष्ट्रांत अलीकडील तीस पस्तीस वर्षांत नव्यानें झाली आहे.

(अ) युनिव्हर्सिटी स्थापन होण्याच्यापूर्वी दादोबा पांडुरगादि जी मंडळी झाली त्यांचा काल शालोपयोगी लहानमोठी पुस्तके रचण्यांत गेला. इतिहासाचीं साधने शोधून काढण्याच्या कामीं हळहळ दाखविण्यापलीकडे त्यांच्या हातून विशेष कांहीं झालें नाहीं. तरी पूर्वजांचा इतिहास असावा अशी इच्छा त्यावेळी त्या लोकांना झाली हें ह्या हळहळीवरून अनुमानतां येतें.

(ब) डॉक्टर भाऊ दाजी, विश्वनाथ नारायण मंडलीक, उमियाशंकर याज्ञिक, कृष्ण शास्त्री गोडबोले इत्यादि मंडळींनी त्या कालीं हिंदुस्थानच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाविषयीं बरेंच लिहिले आहे; परंतु, महाराष्ट्राच्या अलीकडील इतिहासाकडे, फार तर राहूं द्याच पण थोडें देखील, लक्ष्य देण्यास ह्या मंडळीला फुरसत झाली नाही.

(क) युनिव्हर्सिटी स्थापन झाल्यानंतर, यूरोपखंडांतील देशांचे प्राचीन व अर्वाचीन इतिहास वाचून इतिहासाविषयी स्पष्ट व उदात्त कल्पना नव्या विद्वानांना याव्या हे साहजिक होतें. (१) ह्या नवीन कल्पनांचें प्रथम फल म्हटलें म्हणजे नीळकंठराव कीर्तने यांची ग्रांट डफ् वरील टीका होय. कीर्तन्यांना अस्सल कागदपत्र न मिळाल्यामुळें यद्यपि त्यांनीं केलेली टीका तांत्रिक आहे तत्रापि ग्रांट डफ् च्या ग्रंथांत दोष व न्यूनें आहेत हें दाखविण्यास तिचा उपयोग झाला आहे. हिंदु लोकांच्या भित्रेपणाविषयीं व हिंदुस्थानांतील निरनिराळ्या राष्ट्रांच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयीं ह्या टीकाकाराचें म्हणणें सयुक्तिक व सशास्त्र आहे. इतकेंच कीं, ही टीका अत्यंत त्रोटक आहे. १८६७ पासून पुढें डेक्कन कॉलेजात व कदाचित् एल्फिन्स्टन कॉलेजांत मराठ्यांच्या इतिहासाची आस्था बाळगणारी काहीं मंडळी निपजत चालली होती असें दिसतें. (२) कीर्तन्यांच्या टीकेनंतर विविध ज्ञानविस्तारांतून एक बखर, एक राजनीति व एक काशीराजाचें भाषांतर अशी तीन जुनीं बाडें बाहेर पडलीं. (३) त्यानंतर रा. साने, मोडक, चिपळोणकर व ओक ह्यांच्या अवाढव्य (काव्य) इतिहाससंग्रहाला सुरुवात झाली. (४) पुढें लवकरच प्रभू लोकांच्या इतिहासाचीं साधनें थोडींबहुत जगापुढें आली. (५) नंतर कांहीं कालानें बडोदें येथें शिवराजाच्या दोन बखरीं छापल्या गेल्या. (६) पुढें भारतवर्षाला प्रारंभ झाला व (७) अलीकडे वासुदेवशास्त्री खरे ह्यांनी ऐतिहासिक लेखसंग्रहाला सुरुवात केली आहे. येणेंप्रमाणें साठपासष्टांत इतिहासाच्या आस्थेची जी एक लाट उसळली ती अजून म्हणजे १८९८ तहि चढत्या प्रमाणावर आहे व पुढेंहि अशीच चढती राहील असा तर्क आहे. कारण, आतांपर्यंत जो साधनसंग्रह छापला गेला आहे तो जो अजून छापावयाचा राहिला आहे त्याच्या मानानें अगदींच थोडा व तुटपुंजा आहे.