उपनामव्युत्पत्तिकोश

ही १४ गोत्रें ऊर्फ कुळें परशुरामानें प्रथम कोंकणांत बसविलीं. परशुराम दाशरथि रामाचा समकालीन होता असें पुराणें व इतिहास सांगतात. तें मान्य केल्यास रामाच्या वेळेपासून चितपावनांची वस्ती कोंकणांत आहे, असें होतें. तें कांहीं हि असो, कोंकणस्थांचीं प्रथम १४ गोत्रें होतीं. तीं वाढत वाढत कालान्तरानें ६० झाली. साठय्ये हें ६१ वें कुळ आहे, असें कित्येक म्हणतात. परंतु, तें साधार आहे, असें म्हणण्याला जितका पुरावा मिळावा तितका मिळालेला नाहीं. साठे म्हणजे साठ व साठय्ये म्हणजे ६१ वा, असा अर्थ करून कित्येक लोक आपली स्वतःची फसवणूक करून घेतात इतकेंच. साठे या शब्दाचा अर्थ साठ नसून, हा शब्द सार्ष्टि या ऋषिनामापासून निष्पन्न झालेला आहे, हें मागें दाखविलेंच आहे, असो. हीं मूळचीं साठ कुळे येणेंप्रमाणें:--

१ काश्यप-१ लेले, २ गानू, ३ जोग, ४ लवाटे, ५ गोखले 
२. शांडिल्य-१ सोमण, २ गांगल, ३ भाटे, ४ गणपुले,
५ दामले, ६ जोशी, ७ परचुरे 
३ वासिष्ठ - १ साठे, २ बोडस, ३ वोक, ४ बापट, ५ बागुल, ६ धारू, ७ गोगटे, ८ भाभे, ९ पोंगशे, १० विंझे, ११ साठय्ये, १२ गोंवंड्ये
४ विष्णुवर्धन-१ किडमिडे, २ नेने, ३ परांजप्ये, ४ मेहेंदळे 
५ कौंडिन्य - १ पटवर्धन, २ फणशे 
६ नितुंदन - १ वैशंपायन, २ भाडभोके 
७ भारद्वाज - १ आचवल, २ टेणे, ३ दर्वे, ४ गांधारे, ५ घांघुरडे, ६ रानड्ये 
८ गार्ग्य - १ कर्वे, २ गाडगीळ, ३ लोंढे, ४ माटे, ५ दाबके, 
९ कपि - १ लिमये, २ खांबेटे, ३ जाईल, ४ माईल 
१० जामदग्नि--१ पेंडसे, २ कुंटे 
११. वत्स् - १ मालशे 
१२ बाभ्रव्य-१ बाळ, २ वेहरे 
१३ कौशिक - १ गद्रे, २ बाम, ३ भाव्ये, ४ वाड ५ आपटे 
१४ अत्रि- १ चितळे, २ आठवेले, ३ भाडभोळे, एकूण उपनांवें ६०
म. धा. ३०

ह्या साठ आडनांवांपैकीं बापट, धारू, किडमिडे, नेने, लिमये, माईल व भाडभोळे हीं आडनांवें ज्या गोत्रांपासून निघालीं तीं गोत्रे मजजवळील पांच हजार गोत्रांच्या यादींत नाहींत किंवा त्यांचा पत्ता मला लावतां आला नाहीं. बाकींच्या ५३ आडनांवांचा पत्ता लागला आहे. त्यावरून असें म्हणतां येईल कीं, ज्या कालीं गोत्रनामें प्रचारांत होतीं, परंतु तीं प्राकृत होत होतीं त्या कालीं हीं ५३ आडनांवें ऊर्फ गोत्रनामें सुरू झालीं. प्राकृत भाषा सुरू झाल्यानंतरचीं हीं साठ आडनांवें ऊर्फ गोत्रनामें आहेत. म्हणजे आजपासून अडीच हजार वर्षांपलीकडील ही साठ आडनांवें नाहींत. मूळचीं चौदा गोत्रें संस्कृत आहेत, प्राकृत नाहींत. अर्थात् तीं अडीच हजार वर्षांपूर्वीचीं आहेत. चौदा गोत्रांचा एकेक पुरुष परशुरामानें कोंकणांत वसविला ह्या दंतकथेशीं वरील निगमन चांगलें जुळतें. ह्या साठ आडनांवांचीं पुढे सुमारें, अडीचशें आणीक आडनांवें कोंकणस्थांत झालीं. तीं सर्व सापेक्ष दृष्टीनें कमजास्त अर्वाचीन आहेत.