Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

उपनामव्युत्पत्तिकोश

ह्या अर्वांचीनांत हि जीं आडनांवें गोत्रनामांपासून निघालेलीं दाखविलीं आहेत, तीं अर्वाचीनांतील अत्यन्त प्राचीन व प्राचीनांतील अत्यंत शेवटलीं होत. ह्या अर्वाचीनांतील प्राचीन आडनांवांचा काल शक ७०० पासून शक १३०० पर्यंतचा धरण्यास कांहीं हरकत नाही. धैसास, गोळे, गोरे, वगैरे गोत्रोत्पन्न आडनांवें ह्या अर्वाचीनांतील प्राचीन आडनांवांपैकीं होत. गांवांवरून पडलेलीं नांवें गोत्रांवरून पडलेल्या आडनांवांनंतरचीं होत. फारशी नांवें अलीकडील दोनशें वर्षांतील आहेत. सध्यां इंग्रेजी आडनांवें पडण्याचा संभव आहे. मूळ चौदा गोत्रनामांपासून उत्पन्न झालेलें एक हि आडनांव कोकणस्थांत नाहीं. गोत्रनामांपासून उत्पन्न झालेलीं आड़नांवें देशस्थांत अति आहेत. मूळ चोवीस गोत्रनामांपासून निघालेलीं आडनांवें कर्‍हाड्यांत हि नाहींत. उदाहरणार्थ, आत्रे हें आडनांव देशस्थांत आहे. कोंकणस्थांत व कर्‍हाड्यांत हें अत्रिगोत्र आहे, परंतु उपनाम नाही. आत्रेय ऊर्फ आत्रे हें आडनांव बरींच शतकें चालू झाल्यावर तें घेऊन देशावर ब्राह्मण आले. तें घेऊन कोंकणांत किंवा कर्‍हाडप्रांतांत ब्राह्मण आले नाहीत. अर्थात् कोकणस्थांची व कर्‍हाड्य़ांची वस्ती कोंकणांत व कर्‍हाडप्रांतांत देशस्थांची वस्ती देशावर होण्याच्या पूर्वीची आहे, हें उघड आहे. आर्यानीं सध्यांच्या महाराष्ट्रांत म्हणजे पूर्वीच्या दंडकारण्यांत वस्ती कोंकण व कर्‍हाडप्रांत ह्यांत वस्ती केल्यानंतर केली, हें कित्येक वर्षापूर्वी इतर आधारांनीं मीं सिद्ध केलें आहे. त्या सिद्धीला ह्या गोत्राविवरणानें हि पुष्टि मिळते. 

करवीर, कोकणे व भुसकुटे हीं आडनांवे प्रांतांवरून पडलेलीं आहेत व ही आडनांवें मूळ चौदा गोत्रांची वस्ती ****** झाल्यावर त्यांच्या वंशजांपैकीं त्या त्या प्रांतांत ज्या कोणीं वस्ती केली त्यांना मिळालेलीं दिसतात. जें चित्पावन कुल करवीर प्रांतांत जाऊन राहिलें त्याला करवीर हें आडनांव पडलें. चित्पावनप्रांतांतून जें कोंकणांत राहिलें त्याला कोकणे हें विशिष्ट उपनाम प्राप्त झालें आणि भोजकट नामक जो देश तापीतीरी विंध्याच्या दक्षिणेस होता त्यांत जो पुरुष चित्पावनप्रांतांतून जाऊन राहिला त्याला भोजकटीय, भोजकटे, भोसकटे, भुसकुटे हें आडनांव ऊर्फ आणणांव मिळालें. मूळ चित्पावनप्रांतांतून गांवोगांव चित्पावनांचा जसजसा प्रसार होत गेला, तसतशीं ग्राम-नामोत्पन्न आडनांवें प्रचलित झालीं. गोंधळेकर, कार्लेकर, कापरेकर, केतकर ह्या आडनांवांत गोंधळी, कार्ले व केतकी या ग्रामनामांचा निर्देश होतो. येथें कर प्रत्यय केर या प्राकृत प्रत्ययाचा मराठी अपभ्रंश आहे. प्रथम ह्या आडनांवांचा उच्चार गोंधळीकेरः, कार्लेकेर:, कापरेकेर: व केतकीकेर: असा होत असे. महाराष्ट्री प्राकृत लुप्त झाल्यावर ह्या आडनांवांतील केर प्रत्ययाचा कर असा उच्चार होऊं लागला. केर हा प्रत्यय तत्संबंधवाचक आहे. केतकर म्हणजे केतकीगांवचा. हा केर प्रत्यय स्मृत्यनुसार जे गोत्रनिर्णायक ग्रंथ झाले त्यांत कर्मारकेराः व वाकिनिकेरा: म्हणून जीं गोत्रनामें येतात त्यांत दृष्टीस पडतो. आतां येथें असा प्रश्न उद्भवतो कीं, केतकी गांवावरून केतकर हें आडनांव पडलें कीं कितवाः ह्या गोत्रनामावरून केतकेराः हें आडनांव निघालें ? कितवकेराः म्हणजे कितवगोत्राचे. कितवगोत्राचे जे ते कितवकेर. कितवकेर=केतकेर, अशी हि परंपरा असूं शकेल. म्हणजे गार्ग्य गोत्रांत म्हणजे कुळांत कोणी कितव नांवाचा पुरुष झाला व कर्तेपणामुळे त्याच्यापासून कितव हें उपनाम सुरू झालें. त्या कितवानें कैत ऊर्फ केत हें नवीन गांव वसविलें व त्या गांवाला आपलें नांव दिलें म्हणजे गेत्रपुरुषनामावरून गांवाचें नांव पडलें, गांवावरून पुरुषाचें नांव पडलें नाहीं, असा अर्थ होतो. आणि हें च जास्त संभवतें. गांवावरून पुरुषाचें व तदुत्पन्न वंशाचें नांव पडलें असें धरल्यास, केत ह्या पुरुषाच्या अगोदर केत हें गांव होतें असें गृहीत धरावें लागतें. अपरान्तांत हें केत गांव केतकरांच्या अगोदर कोणीं वसविलें ? आर्यांच्या पूर्वी अपरान्तांत नागांची वस्ती होती. त्यांनीं हें गांव वसविलें असें म्हणण्यास विशेष कांहीं आधार दिसत नाहीं. तेव्हां, गांवाच्या अगोदर तें गांव स्थापणारा पुरुष होता, हें मान्य करणें हा एक पक्ष रहातो. कितव नांवाचा गोत्रनामप्रवर्तक कोणी एक पुरुष गार्ग्यगोत्रांत झाला. त्याचे जे वंशज त्यांना केतकर व त्यानें जें गांव वसविलें त्याला केत हें नांव पडलें. केत ह्या नांवाला सुबकपणा आणण्याकरितां केतकीप्राम असें त्या गांवाला कोणी कवित्वसंपन्न वंशज म्हणूं लागले. मूळ नांव केतग्राम, केतकीग्राम नव्हे. मूळनाम केतकी असतें तर केतकीकर असें आडनांव प्रचलित असतें. परंतु, आडनांवाचा उच्चार केतकर असा आहे. तेव्हां मूळग्रामनाम केत हें च खरें व तें ग्राम गार्ग्यकुलोत्पन्न कि तव या प्रख्यात व कर्त्या पुरुषानें वसविलें. मेहेंदळी, गोंधळी, हीं हि ग्रामनामें महेंद्र, गोधूलि, ह्या गोत्रप्रवर्तक म्हणजे आडनांवप्रवर्तक पुरुषांपासून निघालेलीं आहेत. हा प्रकार प्राचीन ग्रामनामें व ग्रामनामप्रवर्तक गोत्रपुरुषांसंबंधानें झाला. अर्वाचीनकालीं पुण्यास राहणारा तो पुणेकर व मुंबईस राहणारा तो मुंबईकर, असा प्रघात आहे. पुणें व मुंबई यांच्या स्थापनेशीं या पुणेकराचा किंवा मुंबईकराचा बिलकुल संबंध नाहीं. प्राचीनकाळीं मूळवसाहती च जेथें स्थापावयाच्या होत्या, तेथें मूळ गोत्रप्रवर्तक पुरुषाचें नांव व नंतर त्यानें स्थापिलेल्या गांवाचें नांव, असा प्रघात होता.