Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

उपनामव्युत्पत्तिकोश

९ उपरिष्ट गोत्रमालिकेंत बरींच आडनांवें ऊर्फ गोत्रनामें देशस्थांचीं आहेत. पिंगळे, वाघ, गर्गे, भारदे, व्यास, भार्गव, भवैते, पर्वते, अत्रे, कोशे, धुमे, गांडे, मांडे, मोगल, हरकारे, गायधनी, पराशरे, आसकोरे, उसणारे, देव, आथर्वण, हंस, दुर्गे, पिटके, पारधी, पारखी, पिंपळे, मध्वे, कवी, नंदे, धोत्रे, भोळे, तिखे, मुंजे, तोरो, वगैरे शेंकडों आडनांवें ऊर्फ गोत्रनामें देशस्थांत आढळतात. महाराष्ट्रांतील जे देशस्थ लोक त्या सर्वांचीं जुनीं आडनांवें जमविण्याचा उद्योग मीं चालविला आहे. त्यावरून असें दिसतें कीं, शेंकडों गोत्रनामें आडनांवें झालेलीं ह्या लोकांत आढळतील. जोशी, कुळकर्णी, देशपांडे, देशमुख, पाटील, मुश्रीम, पेशवे, मुजुमदार वगैरे धंद्यावरून पडलेलीं आडनांवें व गांवावरून करप्रत्ययान्त आडनांवें देशस्थ लोकांत बरीच आहेत. तीं वगळलीं असतां, बाकीचीं जीं आडनांवें रहातात तीं सर्व गोत्रनामांवरून निघालेलीं आहेत. देशस्थांत गोत्रें शेकडों आहेत. त्याहून कर्‍हाड्यांत व कोंकणस्थांत गोत्रें अगदींच कमी-कर्‍हाड्यांत २४ चोवीस गोत्रें आहेत व कोंकणस्थांत १४ चौदा गोत्रें आहेत.

१० पैकीं गोत्रनामांवरून कर्‍हाड्यांत जीं आडनांवें आलेलीं मला ओळखवलीं त्यांची यादी येथें देतों. ( यापुढें ७३ आडनांवांची यादी दिली आहे. त्या यादींतील आडनांवांचा कोशांत समावेश केला आहे. )
शोधिले तर आणीक हि दहावीस अपभ्रंश निघतील. गोत्रनामांचे अपभ्रंश होऊन जीं हीं पाऊणशें आडनांवें निघालीं आहेत त्यांहून बाकीचीं आडनांवें गांवावरून किंवा धंद्यावरून पडलेली आहेत. अंबार्डेकर, मणेरकर, हिंगणकर, फणसळकर, वगैरे करप्रत्ययान्त नांवें
ग्रामनामांवरून तत्रस्थ ह्या अर्थी पडलेलीं आहेत. सबनीस, शेखदार, सरदेसाई, पतकी, जोशी, पटवर्धन, दक्षित, हुजूरबाजार वगैरे फारशी व हिंदी नांवें धंद्यावरून पडलेली आहेत.

११. कर्‍हाड्यांच्या प्रमाणें च कोंकणस्थांच्या आडनांवांची त्रिविध स्थिति आहे. कांहीं आडनांवें धंद्यांवरून, कांहीं गांवांवरून व बाकीचीं गोत्रांचे अपभ्रंश होऊन पडलेलीं आहेत. पैकीं गोत्रोत्पन्न आडनांवें ओळखवलीं तेवढीं नमूद करितों. (येथें त्यांनीं १३१ आडनांवें दिलीं आहेत त्यांचा समावेश कोशांत केला आहे. )

गोत्रनामांपासून निष्पन्न झालेलीं आणीक हि दहा पांच आडनांवें देतां येतील. ह्यां व्यतिरिक्त बाकीचीं आडनांवे गांवावरून किंवा धंद्यावरून पडलेली आहेत-पळणिटकर, पाटणकर, नगरकर, पिटकर, भुस्कुटे, मंगरूरकर, माखलकर चिपळोणकर वगैरे कर किंवा इये, ए प्रत्ययान्त आडनांवें ग्रामनामावरून निघालेलीं आहेत. मंडलिक, वर्तक, पटवर्धन, भट, पुराणिक, पोतनीस, पेशवे, फडणीस, मुजुमदार, जोशी, राजवाडे, दीक्षित, देशमुख वगैरे आडनांवें धंद्यावरून पडलेलीं आहेत. देशस्थ-कर्‍हाड्यांच्याप्रमाणेंच कोंकणस्थांचा हि प्रघात असलेला दिसतो.

मूळ कोंकणस्थांचीं १४ गोत्रें :- १ कश्यप, २ शांडिल्य, ३ वासिष्ठ, ४ विष्णुवर्धन, ५ कौंडिन्य, ६ अत्रि, ७ कौशिक, ८ भारद्वाज, ९ गार्ग्य, १० कपि, ११ जामदग्न्य, १२ वत्स, १३ नितुंदिन, १४ बाभ्रव्य. पैकीं जामदग्न्य व वत्स; भारद्वाज, कपि व गार्ग्य; कौशिक व बाभ्रव्य; वासिष्ठ व कुंडिन; काश्यप व शांडिल्य; आणि विष्णुवर्धन व नितुंदिन; हीं समानप्रवर म्हणजे एकाच मूळ ऋषीपासून उत्पन्न झालेलीं आहेत. जामदग्न्य वत्स हीं भृगूपासून; भारद्वाज, कपि व गार्ग्य हीं भरद्वाजापासून - कौशिक व बाभ्रव्य हीं विश्वामित्रापासून; वासिष्ठ व कुंडिन हीं वसिष्ठापासून; काश्यप व शांडिल्य हीं कश्यपापासून; विष्णुवर्धन व नितुंदन हीं अंगिरसापासून जन्म पविलीं, अशी परंपरागत समजूत आहे. अत्रिगोत्र अत्रिऋषीपासून उद्भवलें. अगस्तीपासून जन्मलेलें एक हि गोत्र कोंकणस्थांत नाहीं.