Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

उपनामव्युत्पत्तिकोश

७ भारतवर्षांत इतरत्र गोत्रपरंपरा अद्यापपर्यंत किती राहिली आहे तें सूक्ष्मपणें सांगण्यास जशीं साधनें उपलब्ध व्हावीं तशीं झालेलीं नाहींत. तेव्हां महाराष्ट्रांतील गोत्रपरंपरा तेवढी येथें देतों, सुमारें चारशें गोत्रनामें प्राकृत भाषेंत अपभ्रष्ट झाललीं मीं जुळविलेलीं आहेत तीं देतों. त्यांवरून दिसेल कीं सध्यां देशस्थांत, कर्‍हाड्यांत व कोंकणस्थांत जीं कित्येक आडनांवें आहेत तीं पूर्वीचीं गोत्रनामें आहेत. तात्पर्य गोत्रनामें म्हणजे आडनांवें; दुसरें कांहीं नाहीं. संस्कृत गोत्रनामें व मराठी आडनांवें यांची यादी:-  (यापुढें दिलेल्या ३९१ आडनांवांचा कोशांत समावेश केला आहे.)

८ वरील यादींत देशस्थ, कर्‍हाडे व कोंकणस्थ, मराठे व प्रभू यांचीं आडनांवें ऊर्फ गोत्रनामें दिलीं आहेत. जयवन्त हें आडनांव प्रभंत आहे. हें आडनांव येणेंप्रमाणें साधलें आहे.

                                                               द्रोणपर्वतजीवन्तादन्यतरस्याम् ( ४-१-१०३ )
                                                               एभ्यो गोत्रे फग् वा । जैवंतायनः जैवन्तिः वा ।

जीवन्त नामक मूळ गोत्रोत्पादक पुरुषापासून जे उत्पन्न झाले ते जैवन्तायन किंवा जैवन्ति. जैवन्ति शब्दाचा मराठी अपभ्रंश जैवन्त किंवा जयवन्त. जय (जिंकणें) या शब्दाशीं जयवंत, जैवंत या प्रभुआडनांवाचा कांहीं एक संबंध नाहीं. तसेंच, गुप्ते हें प्रभुआडनांव गौप्तेय ह्या गोत्रनामापासून आलेलें आहे. शालिवाहनाच्या चौथ्या शतकांतील गुप्त सम्राटाशीं या आडनांवाचा संबंध दिसत नाहीं. चित्रे व चौवळ हीं प्रभुआडनांवें चैत्रेयाः व चौवला: या गोत्रनामांपासून निघालेलीं आहेत. अधिकारी, अधकारी, अदकारी हें हि प्रभु आडनांव अधिकारि या गोत्रनामापासून निघालेलें स्पष्ट दिसतें. तात्पर्य, सध्यांच्या प्रभुलोकांत निरनिराळीं गोत्रनामें ऊर्फ आडनांवें आहेत. प्रभू तेवढे सर्व दाल्म्यगोत्री, हें मत इतिहासानभिज्ञ भटांचें व तदनुयायी प्रभूंचें आहे. ब्राह्मण व प्रभू दोघे हि खर्‍या इतिहासाला पारखे होऊन, वृथा वाद माजवून राहिलेले आहेत. जैवन्त, गुप्ते, चौबळ हीं अडनांवें जैवन्ति, गौप्तेय, चौबळ या गोत्रनामांपासून ज्याअर्थी निघालेलीं आहेत, त्याअर्थी एके काळीं हीं तिन्हीं आडनांवें ऊर्फ गोत्रें ब्राह्मणांत होतीं हें निर्विवाद आहे. ब्राह्मणांत हीं गोत्रें ऊर्फ कुळें सध्यां लुप्त झालेलीं दिसतात; फक्त प्रभूंत मात्र तीं हयात आहेत.

अवटे, घोल्ये, मांडे, काळे, पांढरे, कुटे, बाबर, भोर वगैरे आडनांवें अवट्याः, गौहल्या:, मांड्याः, कालेयाः, पाण्डाराः, कौटाः, बाभ्रव्याः, भौराः, या गोत्रनामांवरून प्राकृतांत आलीं हें उघड आहे. पोरे हें शिंपी लोकांत आडनांव आहे व तें पौरेयाः या गोत्रनामापासून निघालेलें आहे, हें कोणी हि कबूल करील. ह्या व्युत्पत्तीचा अर्थ काय ? ह्याचा अर्थ इतकाच कीं पूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व संकर ह्या सर्वांचीं समान गोत्रें असत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व ह्या तिन्हींचे अनुलोम व प्रतिलोम संकर मिळून एक कुळ होई व त्या कुळांतील सर्व व्यक्तींचा त्या कुळाच्या गोत्रनामावर हक्क असे. पैकीं ब्राह्मणादि वर्णांचा क्षय झाला असतां, प्रभू, शिंपी वगैरे जातींत हीं गोत्रनामें ऊर्फ आडनांवें अद्याप हयात असलेलीं आढळतात. ह्या दृष्टीनें महाराष्ट्रांतील अठरापगड जातींतील सर्व आडनांवें गोळा केलीं असतां आर्यवंशाच्या इतिहासावर फार प्रकाश पडेल. कोटीवरी गोत्रें होतीं म्हणून बौधायन सांगतो. त्यांपैकीं गोत्रप्रवरग्रंथांत व पुराणांत सुमारें ५००० पांच हजार सांपडतात. बाकीचीं लक्ष्यावधि गोत्रे गेलीं कोठे ? असा अंदाज आहे कीं, ब्राह्मणांत लुप्त झालेलीं हीं हजारों गोत्रें इतर जातींच्या आडनांवांत बरींच सांपडतील.