उपनामव्युत्पत्तिकोश

२ मूळ आठ ऋषि. अर्थात् ह्या मूळ ऋषींना गोत्रनामें नव्हती. ह्यांना पुढें प्रजा झाली. ह्या प्रजेला हि प्रप्रजा झाली व वंशविस्तार होऊन, वंशांत कित्येक प्रख्यात पुरुष उदयास आले. त्यांचे नातू वगैरे त्या त्या प्रख्यात पुरुषाचें नांव आपल्या व्यक्तिनामापुढें लावूं लागले. त्यामुळें असंख्य गोत्रें उत्पन्न झालीं. गोत्रें यद्यपि असंख्य झालीं, तत्रापि कोणत्या गोत्राचे कोण कोण पूर्वज यांची ओळख त्या त्या गोत्राला होती. ह्याचें कारण असें कीं, नित्यनैमित्तिक कर्मांत यजमानाला आर्षाचें प्रवरण अग्नीला उद्देशून करावें लागे. आर्ष म्हणजे अष्ट ऋषींचें अपत्य. त्या अपत्यांचें जें क्रमानें नामसंकीर्तन त्यांचें नांव प्रवरण. अमुतोऽर्वाञ्चो होता ॥ अमुतो मूलभूतादृषेरारभ्यार्वाञ्चोऽर्वाग्जातान्मंत्रदृशः क्रमेण तदपत्यसंबंधेन प्रार्थयते तमग्निम् । मूळ ऋषींपासून पुढें झालेले जे मंत्रद्रष्ट् त्यांचें अग्नीकरितां जें नामसंकीर्तन तें प्रवरण. हें प्रवरण अग्रीसंबंधानें करावें लागल्यामुळे व अग्नीचें आराधन हें भारतीय आर्यांचें मुख्य कर्म पडल्यामुळे आर्ष प्रवरांची ओळख भारतीय आर्यांना रोज होत असे व आहे. गोत्रें जेव्हां असंख्य झालीं तेव्हां कोणाचे कोण हें ओळखण्याकरितां प्रवरांची मोजणी करावी लागली. ती सुमारें ४९ भरली. द्वामुष्यायण घेतले तर दोन चार प्रवर अधिक होतील. कित्येक दहा पांच प्रवर आधक हि मानीत; परंतु, बौधायनकालीं ४९ प्रवर मानण्याची चाल पडली. तात्पर्य, असंख्य गोत्रें, ४९ प्रवर व ८ ऋषी अशी परंपरा उत्पन्न झाली.

३ गोत्रांचें हें वर्गीकरण दुसर्‍या एका प्रयोजनास्तव हि करणें प्राप्त होतें. भारतीय आर्यांत बहिणभावांचे विवाह इष्ट नाहीत; दैत्यासुरांत आहेत. एका च ऋषीपासून, एकाच पूर्वजापासून जी स्त्रीपुरुषें निपजलीं त्यांचे शरीरसंबंध अशास्त्र समजण्याची चाल भारतीय आर्यात फार पुरातनकालापासूनची आहे. गोत्रें जेव्हां असंख्य झालीं, तेव्हां कोण कुल कोणत्या दुसर्‍या कुलांचें सगोत्र आहे व सार्ष ऊर्फ सप्रवर आहे, हें निश्चित मापन करणें जरूर पडलें. कारण समानगोत्र व समानार्ष कुळांत शरीरसंबंध झाला असतां तो व्यभिचार होतो, अशी दृढ समजूत व शास्त्र असे. शास्त्रें व पुस्तकें व ग्रंथ झाल्यावर, हा प्रघात दृढ झाला असें मात्र बिलकुल समजूं नये. प्रघात शास्त्रांच्या व ग्रंथांच्या फार पूर्वीपासूनचा आहे. प्रत्येक ब्राह्मणाला अग्नीचें उपासन करावें लागे. तेव्हां प्रवरांचें संख्यापन आपोआप च होई. समजा कीं कोणी ब्राह्मण जामदग्न्य-वत्स-गोत्री आहे. तर त्याचे पंचार्षेय भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य हे होत; व तो जमदग्मीप्रमाणें, उर्वाप्रमाणें, अप्रवानाप्रमाणें, च्यवनाप्रमाणें व मृगूप्रमाणें अग्नीची प्रार्थना म्हणजे वरण करी. जामदग्न्या वत्सास्तेषां पंचार्षेयो भार्गवच्यावनाप्रवानौर्वजामदग्न्येति जमदग्निवदुर्ववदप्नवानवच्च्यवनवद्भृगुवदिति बौधायनः । यजमानादूर्घ्वान् मंत्रदृग्भिरव्यवहितानां मूलभूतान् दृष्टक्रमेण संकीर्त्य तद्वत्तद्वदिति सादृश्यसंबंधेन अग्निं वृणीते प्रार्थयत इत्यर्थः । गोपीनाथदीक्षित ओक. होता अनुलोम संकीर्तन करी व अध्वर्यु प्रतिलोम संकीर्तन करी. तेव्हां अर्थातच मूळ गोत्रप्रवर्तक व प्रवरप्रवर्तक यांचे संकीर्तन नित्य होई. अर्थात् आपले आर्ष कोण हें प्रत्येक ब्राह्मणाला माहीत असे. हा गोत्रोच्चरणाचा व प्रवरसंकीर्तनाचा प्रघात आज हजारों वर्षे ह्या भरतखंडांत अव्याहत चालला आहे. एका कुळाचे गोत्रप्रवर दुसर्‍या कुळानें घेऊं नये असा निर्बंध होता व आहे. यो वा अन्यः सन् अन्यस्य आर्षेयं वृणीते स व अस्य तदृषिः इष्टं वीतं वृंक्ते । अशी स्थिति व निर्बंध असल्यामुळें एक ब्राह्मण दुसर्‍या ब्राह्मणाचे प्रवर घेत नसे. मग अनार्य ते घेतील व आपल्याला ब्राह्मण म्हणवितील ही शंका हि यावयास नको. हें गोत्रप्रवरसंकीर्तन नित्य होई त्यामुळें त्यांचें सरसहा विस्मरण होणें कालत्रयीं हि संभाव्य नसे, मग शक्य कोठून होणार ?