Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

१ मागील लेखांत वनस्पतींचीं एकंदर १३३ संस्कृतनामें, ५९९ ग्रामनामें व सुमार १०३७ ग्रामें अकारविल्ह्यानें नमूद केली. ह्या १३३ पैकीं बहुतेक सर्व वनस्पति सर्वप्रसिद्ध अश्या आहेत. आतां ह्या अंकांत इतर वनस्पतिनामजन्य ग्रामनामें देऊन शिवाय उरलींसुरलीं सर्व प्रसिद्ध वनस्पतिनामजन्य ग्रामनामेंहि देतों.
यापुढें दिलेलीं वनस्पतिजन्य गांवें कोशांत घेतली आहेत.

२ खानदेशांत एकंदर गांवें ३८९३. पैकीं वनस्पतिनामां पासून निघालेलीं ग्रामनामें सुमार १४५०. म्हणजे शेकडा ३७ ग्रामनामें वनस्पतिनामजन्य. त्या त्या स्थलीं वसति प्रथम करतांना चित्ताला ज्या वनस्पतीनें उत्कट चमत्कृति झाली त्या वनस्पतींच्या नांवा वरून वसतीचें नांव वसाहतवाल्यांना सुचलें. १४५० ग्रामनामें ३३५ वनस्पतिनामां वरून सुचलीं. पांचव्या लेखांकांत ज्या प्रत्ययांचे अडाखे दिले त्यां हून बरे च ज्यास्त प्रत्यय खानदेशांतील ग्रामनामांत आढळले. तेव्हां आतां पर्यंत आढळेलेल्या एकोनएक प्रत्ययांची व त्यांच्या संस्कृत मूळांची यादी पुन्हां एकदां देतों.
(यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(अ) ह्या १९७ प्रत्ययांतून कांहीं प्रत्ययां संबंधानें चार शब्द सांगण्या सारखे आहेत. वटवृक्षाच्या नांवा खालीं वडनेर व वडनगर अशीं दोन ग्रामनामें येतात. येथें असा प्रश्न उद्भवती कीं, वडनेर हें नांव वडनगर ह्या नांवाचा अपरपर्याय आहे की काय ? डॉ. भांडारकर यांनीं जुन्नर शब्दाची व्युत्पत्ति जूर्णनगर अशी करून, नर, नेर हा शब्द नगर शब्दा पासून निघालेला आहे, असें प्रतिपादन केलेलें आहे. नगर-नयर-नर किंवा नेर. जुन्नर ग्रामनामाचा तत्प्रांतस्थ लोक जुनेर असा उच्चार करतात. आतां नेर प्रल्यय नगर शब्दा पासून निघालेला आह कीं काय हें नक्‍की करण्यास, नेर-प्रत्ययान्त इतर पांचपंचवीस नांवें घेतों १ घोडनेर, २ भीमनेर, ३ अकोळनेर, ४ संगमनेर, ५ पारनेर, ६ जामनेर, ७ थाळनेर, ८ भामनेर, ९ अंमळनेर, १० चिंचणेर ११ पळसनेर, १२ पिंपळनेर, १३ सिन्नेर, १४ इष्टनेर, १५ चंपानेर, १६ बडनेर, इत्यादि शेकडों नेरप्रत्ययान्त ग्रामनामें आहेत. शिवाय नेरी, नेरें, अशीं हि नामें आहेत. येथें नगर शब्द मूळ धरावा कीं काय हा प्रश्न. नेर हा शब्द १ नीर, २ नीहार, ३ नहर, ४ नगर, ह्या चार शब्दांचा अपभ्रंश असू शकतो. पैकीं नहर शब्द फारसी आहे. फारसी शब्द प्रचारांत येण्या पूर्वी वरील नेरप्रत्ययान्त ग्रामनामें शेकडों वर्ष प्रचलित होतीं, सबब नहर शब्द वगळून टाकूं. नीहार म्हणजे बर्फ, धुकें. वरील १६ नेरां पैकीं एकांत हि बर्फाचें किंवा धुक्याचें प्राबल्य नाहीं. तेव्हां नीहार शब्द हि गळून पडतो. वरील १६ नेरां पैकीं निम्यां हून अधिक नगरें म्हणजे लहानमीठों शहरें हि नाहींत. कित्येक तर निव्वळ खेडीं आहेत. तेव्हां नगर शब्दा पासून नेर शब्दाची व्युत्पत्ति करणें सररद्दा प्रशस्त दिसत नाहीं. नीर म्हणजे पाणी हा शब्द हि सर्वत्र लागू पडेल च असा प्रकार नाही. पळस, चांपा, पिंपळ, चिंच, वड, जांबुळ, इत्यादि झाडांच्या संबंधानें पाण्याचें वैपुल्य हि प्रकरणबाह्य भासतें. सबब, नेर शब्दाचीं व्युत्पत्ति करण्यास नीर, नीहार, नहर व नगर हे चार हि शब्द समर्पक दिसत नाहीत. वसाहतवाले प्रथम जेव्हां वसती करण्यास आले तेव्हां वसती करण्यास योग्य अश्या जागा व स्थलें व प्रदेश ते पहात व योग्य प्रदेशांना नीवर असें नांव ते देत. नीवर या संस्कृत शब्दाचा अर्थ, वसती करण्यास योग्य प्रदेश, असा आहे. निवा-याचें ठिकाण, जागा, असा मराठींत सध्यां प्रयोग होती, त्यांत निवारा हा शब्द नीवर शब्दाचा अपभ्रंश स्पष्ट दिसतो. ह्या नीवर शब्दा पासून मराठी नेर शब्द झालेला आहे. नेर म्हणजे वसाहत करण्यास योग्य प्रदेश. मुख्य प्रदेश व त्या प्रदेशांतील मुख्य पहिलें गांव यांना नेर शब्दानें वसाहतवाले संबोधू लागले.