Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
( या विषयावर लिहिलेला पुढच्या अंकांतील मजकूर)
१ दुस-या अंकांत पुणें प्रांतांतील मावळतालुक्याच्या नाणेतर्फेतील गांवांच्या नांवां वरून वसाहतकालीन हालचालींचा निर्णय करण्याचा प्रयत्न केला. त्यांत असा निष्कर्ष निघाला की भिल्ल, पोल, कातकरी, वारली, वगैरे रानटी जातींचा पत्ता ह्या ग्रामनामांत बिलकुल लागत नाही. जो काय थोडा फार पत्ता लागतेी तो राक्षस, नाग, पारद, निष, अभीर व आर्य इत्यादि लोकांचा लागतो. त्यांत हि लक्ष्यांत बाळगण्या सारखी बाब ही कीं राक्षसनागपारदप्रमृतिकांच्या गांवांना हि आर्यांनीं च आपल्या संस्कृत भाषेंतील शब्दांनीं प्रख्या आणिली. राक्षसवाटिका, नागस्थली, अभीरपल्ली इत्यादि ग्रामनामांतील वाटिका, स्थली व पल्ली हे ग्रामवाचक शब्द आर्यांनीं स्वभाषेतले दिले, राक्षसादींच्या भाषेतले घेतले नाहींत. नाणेमावळांत राक्षसांचीं फक्त दोन गांवें होतीं, सबब त्यांच्या भाषेतील ग्रामवाचक शब्दांची डाळ बहुतमवस्तीच्या आर्यलोकांच्या भाषे पुढे शिजली नाहीं, असें एक वेळ म्हणतां येईल. परंतु, नागांच्या संबंधानें हें म्हणणें टिकणार नाहीं. ज्यांना सध्यां मराठे म्हणतात त्या लोकांत नागवंश सध्यां आहे व पुरातनकालीं होता. भारतांतील बहुतेक सर्व नागकुलनामें मराठ्यांत सध्यां आडनांवें झालीं आहेत, तसें च, महारांची जात नागवंशीय आहे, ह्या दोन बाबीं वरून दिसतें कीं, नागांच्या भाषेतील ग्रामनामें नाणेमावळांतील ग्रामपंक्तींत यावींत. पण, परीक्षणान्तीं दिसून आलें कीं, नाणेतफेंतील सर्व ग्रामनामें संस्कृतोत्पन्न आहेत. ह्या दृश्याचे दोन अर्थ संभवतात:-(१) नागलोकांत ग्रामनामें नव्हतीं, इतके ते रानटी होते; अथवा (२) आर्यांना अनार्य ऊर्फ म्लेच्छ शब्द खपत नसत इतके हे असहिष्णु होते. पैकीं, प्रथम पक्ष वास्तविक नाहीं. इंद्राचा सारथी जो मातली तो आपल्या अपत्याचा शरीरसंबंध नागांशीं करण्या करितां पाताळांत म्हणजे कोंकणपट्टीत गेला, असा भारतीय उल्लेख आहे. नागकन्यांशीं अर्जुनादिकांचे विवाह झालेले आहेत. सबब नागांना रानटीकोटींत ढकलणें ऐतिह्य नाहीं. अर्थात, दुसरा पक्ष जो आर्याच्या अस्पष्टोच्चारासहिष्णुतेचा तो उरती. तो पक्ष स्वीकारला म्हणजे १६८ नांवां पैकीं सारी चीं सारीं नावें संस्कृत कां, त्याचा उलगडा खास होतो. आर्य ज्या ज्या प्रदेशांत गेले त्या त्या प्रदेशांत मूळचीं म्लेच्छनामें एकीकड सारून, आपलीं प्रेष्ठ जीं संस्कृत ग्रामनामें तीं त्यांनीं अनपवाद प्रचलित केलीं, असा ह्या उलगड्याचा अर्थ होतो. आतां, एवढें खरें कीं, ही म्लेच्छभाषाऽसहिष्णुतेची फक्किका फक्त एका क्षुद्र तर्फेतील शें दोन शें ग्रामनामां वरून समर्थणें न्याय्य नव्हे. फक्किकेस सिद्धान्तत्व येण्यास दहा पांच हजार गांवें ज्या विस्तीर्ण टापूंत असतील तो टापू अभ्यासार्थ घेऊन, काय सिद्धि होत्ये तें पाहिलें पाहिजे; शिवाय, शोधकामें हें हि विसरतां कामा नये कीं, सद्यस्क मराठी ग्रामनामांचें संस्कृतभाषेत विपरिणमन करतांना, मोठा थोरला एक प्रमाद होण्याचा संभव आहे. एक च मराठी ग्रामनाम दहा पांच संस्कृत ग्राननामांचा अपभ्रंश असणे संभाव्य असतें. इतकेंच नव्हे तर, वृक्षादींच्या ज्या संस्कृत नामशब्दां वरून मराठी ग्रामनामशब्द साधावयाचे ते संत्कृत वनस्पत्यादि वाचक शब्द अगदीं मूळचे संस्कृत किंवा वैदिक आहेत च अशी हमी कशी घ्यावी ! संस्कृतांत किंवा वैदिकभाषेत वृक्षादिवाचक जे शब्द येतात ते च मुळी त्या त्या टापूंतील म्लेच्छ ऊर्फ अनार्य लोकांच्या भाषेंतील नसतील कशा वरून? व्युत्पादन करतांना ह्या दोन प्रकारच्या अडचणी डोळ्या आड होऊं देतां नये. दहा पांच संस्कृत शब्दां वरून जेथें एकच मराठी शब्द साधला असलेला स्पष्ट दिसतो, तेथें अमूकच संस्कृत ग्रामनाम प्रकरणाला योग्य आहे, हें ठरविण्यास एक मार्ग आहे. तो हा कीं, त्या किंवा इतर प्रदशांतील ताम्रपट्ट, शिलापट्ट, व्याकरणें, काव्यें व इतर संस्कृत ग्रंथ, ह्यांत तें ग्रामनाम प्राकृत किंवा संस्कृत रूपांत आढळल्यास पहाणें. पण पहाणीचा हा प्रदेश फार संकुचित आहे. ताम्रपट्टादिलेखांत फारच थोड्या ग्रामनामांचा उल्लेख येतो. सबंद भारतवर्षांत लाखा वर गांवें आहेत. आणि सा-या संस्कृत वाङमयांत दोन अडीच हजार ग्रामनामें आलीं असतील नसतील. तशांत, ह्या वाड्यांतील अर्धी अधिक नांवें कानडी आहेत. एवंच मराठी ग्रामनामांच्या पडताळ्या करितां राहिलीं हजार पांचा शें. तेवढ्यां वर महाराष्ट्रांतील वीस पंचवीस हजार ग्रामनामांच्या व्युत्पत्तीचा निर्वाह लागणें दुर्घट आहे.