Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

२ वसाहतकालीन इतिहासाच्या ग्रामनामीय शोधमार्गात ह्या अश्या ठेंचा आहेत. त्या सर्व संभाळून, माग लावावयाचा आहे. नाणेमावळ हा प्रांत फार लहान, व ह्या चिमुकल्या प्रदेशांतील शें दोन शें ग्रामनामां वरून कोणता च सिद्धान्त करतां येत नाहीं, हा आक्षेप टळावा, एतदर्थ दंडकारण्यांतील असा एकादा विस्तीर्ण प्रदेश अभ्यासार्थ घेतों कीं, त्यांत पांच चार हजार गांवें असावींत. नाणेंमावळांतल्या प्रमाणें च ह्या हि विस्तीर्ण प्रदेशांत तो च अनुभव येऊं लागल्यास, उपरिनिर्दिष्ट फक्किकांना जास्त बळकटी येईल आणि त्या फक्किका सिद्धान्ताच्या जवळ जवळ ठेंपू लागतील. विस्तीर्ण प्रदेशांत पांच चार हजार गांवें असून, तो प्रदेश हवा, पाणी, सोई, वनस्पति, पक्षुपक्षी, भूमि, नद्या, पर्वत, भाषा, इत्यादि लक्षणांनीं एकजिनसी असावा. असे प्रदेश सध्यांच्या महाराष्ट्रांत अकरा आहेत:- नागपूर, बैतुल, व-हाड, खानदेश, गोदातीर, भीमथड, कृष्णाकाठ, उत्तर कोंकण, दक्षिण कोंकण, सह्याद्रीचीं खोरीं ऊर्फ कुहरें व डांग. ह्या अकरा भागांत आणीक हि पोटभाग करतां येतात. परंतु, हवा, पाणी, भाषा, वगैरे लक्षणांनीं हा एकेक भाग अनन्यसदृश आहे. पैकीं, प्रस्तुत विवेचनांत खानदेश ह्या विस्तीर्ण प्रांतांतील ग्रामनामांचें निर्वचन करतों. पश्चिमेस खांडवा व पूर्वेस खांडबारी आणि उत्तरेस नर्मदा व दक्षिणेस नाशिक एवढा प्रदेश म्हणजे खानदेश असें मी ह्मणतों. ह्या प्रदेशांत सध्यांचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश हे दोन जिल्हे येऊन, शिवाय बागलाण व मालेगांव हे दोन सध्यांच्या नाशिक जिल्ह्यांतील तालुके हि येतात. हा टापू हवा,पाणी, भाषा इत्यादि लक्षणांनीं एकजिनसी आहे. टापूत एकंदर म्रामसंख्या ३८९३ असून, इसवी सन १८६५ त, १०६५ गांवें पडीत होतीं. मुसुलमानी अंमलांत ही गांवें पडीत झाली. हीं ३८९३ ग्रामनामें शक १२०० तील आहेत, असें समजण्यास हरकत नाहीं. इसवी सन १८६५ सालीं एका मराठी कारकुनानें हीं नांवें त्याच्या काना वर जशीं पडलीं तशीं उतरून घेतलेलीं आहेत. Survey व Topographical नकाशांत व Local Rules and Orders made under Enactments applying to Bombay, Vols. I & II, ह्यांत ग्रामनामांच्या ज्या इंग्रजी उच्चारवटिका दिलेल्या आहेत त्या अनेक ठिकाणीं अपभ्रष्ट आढळल्या. त व ट, न व ण, र व ड, ल व ळ, आ व ऍ, हे उच्चार वरील नकाशांत व पुस्तकांत नीट दर्शविलेले नाहींत. सबब निरुक्तकाराच्या उपयोगाचे व्हावेत तितके होणें शक्य नाहींत, ग्रामसंख्या जवळ जवळ चार हजार आहे. तेव्हां टापू चांगला असावा तितका विस्तीर्ण आहे. ह्या चार हजार ग्रामनामांचें संस्करण करून पहातां असें दिसतें कीं, कांहीं नांवें वनस्पतीं वरून, कांहीं प्राण्यां वरून व कांहीं इतरत: पडलेली आहेत. सोई करितां प्रथम अतिप्रसिद्ध वनस्पतिजन्य नामें अकारविल्ह्यानें प्रथम देतों. एका च नांवाचीं अनेक गांवें जेथें आहेत, तेथें ग्रामनामा पुढे संख्येचे आंकडे दिले आहेत. क्वचित वनस्पतीचें संस्कृत नांव जेथें ओळखतां आलें नाही, तेथें तिचें मराठी नांव तेवढे दिलें आहे.

(यापुढें वनस्पतिजन्य ग्रामनामांच्या नांवांची व्युत्पति दिली आहे. तीं गांवें व त्यांची व्युत्पति कोशांत घेतली आहे)