Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

(३) सध्यांच्या संस्कृत रामायणांत शबरीचा उल्लेख आहे. त्या वरून एवढें च सिद्ध होतें कीं, आर्यांना दक्षिणेंत शबरांची ओळख झाल्यावर रामायणाची रचना झाली. गोंड,खोंड, कातकरी, ठाकूर, कोळी, यांचा उल्लेख रामायणांत नाहीं. भारतांत, तर, मला वाटतें, गोंड, खोंड वगैरे शब्द नाहींत च नाहींत. रामायणांत व भारतांत पांड्यादि दक्षिणेंतील लोकांचीं नांवें येतात, त्या वरून हे दोन्ही ग्रंथ पांड्यादींच्या राज्यांची दक्षिणेंत स्थापना झालेली माहीत झाल्या नंतर लिहिले गेले एवढें सिद्ध होतें. हे दोन्ही ग्रंथ सापेक्षतः बरे च अर्वाचीन आहेत असें सर्व शोधक म्हणतात, तें साधार दिसतें. आतां भिल्‍ल, शबर, ह्यांचा उल्लेख रामायणांत आहे, या वरून दक्षिणेंत आर्यांच्या अगेदर शबरांची व भिल्‍लांची वसती झालेली होती, असें च केवळ म्हणतां येत नाहीं. अगस्त्यादि आर्य ऋषि व भिल्लशबरादि अनार्य लोक समकालीं दंडकारण्यांत आले असण्याचा. संभव आहे. इतकें च नव्हे, तर आर्यांनीं अल्पस्वल्प जंगल साफ केल्या नंतर हि भिल्लादि अनार्य दंडकारगाण्यांत येऊन राहूं लागले असण्याचा संभव आहे. तात्पर्य, दंडकारण्यांत आर्य आधीं आले कीं अनार्य आधीं आले, हा प्रश्न रामायण व भारत ह्या ग्रंथांतील उल्लेखां वरून निभ्रांत सुटण्या सारखा नाहीं. तत्पश्चात्क संस्कृत ग्रंथांची तर, ह्या शोधांत कांहीं च मातब्बरी नाहीं.

(४) आपण आर्य लोक व ज्यांना आपण प्रस्तुतकालीं अनार्य म्हणण्याचा प्रघात पाडला आहे ते मूतिबपुलिंदशबरादि लोक जेव्हां विध्योत्तर एका च प्रदेशांत रहात होते, तेव्हां मूतिबादींना आपण लावतों त्या अर्थी अनार्य हि संज्ञा लाविली जात नसे, असें ह्यणण्याला पुरावा आहे. विश्वामित्राचे शंभर पुत्र होते, पैकीं कांहीं अधर्म्य आचरण करूं लागले, सबब पतित झाले. ते हे पतित विश्वामित्रपुत्र मूतिबादि लेक होत, असा वैदिक इतिहास आहे. ह्याचा अर्थ असा होतो कीं, आर्य ऋषि व मूतिबादी लेक मूलतः एकवंशीय असून, अधर्म्य आचरणा स्तव पतित होऊन निराळे गणिले जाऊं लागले, अशी समजूत ब्राह्मण कालीन विचारवंतांची होती. समजूत कशी असो, एवढें सिद्ध आहे की, मूतबादि लोक आर्यसंघांतून निघून निराळे झाले, म्हणजे मूतिबादि लोक आर्यांची विंध्योत्तरप्रदेशांत वसती झाल्यानंतर अस्तित्वांत आले, असा इतिहास ब्राह्मणकालीं प्रचलित होता. मूतिब, पुलिंद, शबर, भिल्‍ल, कातकरी, ठाकूर गोंड, खोंड, कोळी, इत्यादि लोक विंध्योत्तर व विंध्यदक्षिण प्रदेशांतील मूळचे स्वयंभू लोक आहेत व ते आर्यांच्या फार पूर्वी पासून ह्या प्रदेशांत रहात आहेत, अशी जी यूरोपीयन तदनुयायी हिंदू शोधकांची समजूत ती उपरिनिर्दिष्ट ऐतरेयब्राह्मणान्तर्गत परंपरित इतिहासाच्या विरुद्ध आहे. उत्तरदक्षिण हिंदुस्थानांत आर्यांच्या अगोदर ह्या अनार्यांची वसती होती, हें यूरोपीयन शोधकांचें मत साधार आहे, असें वरील प्रपंचा वरून, ह्मणतां येण्यास बरा च प्रतिबंध होतो.

(५) शोधाच्या ह्या प्रश्ना संबंधानें अशी अनिश्चित स्थिति आहे. दंडकारण्यांत भिल्लादि अगोदर वसूं लागले कीं ब्राह्मणादि अगोदर वसूं लागले, ह्या बाबीचा निर्णय अद्याप निश्चयात्मक झाला नाही, असें माझें ह्मणणें आहे. यूरोपीयन लोकांची ह्या बाबीच्या निर्णयांत जी चूक झाली आहे ती अशी. सामान्यतः कोणत्या हि प्रदेशांत रानटी लोक जे आढळतात ते सुधारलेल्या लोकांहून पुरातन असतात, असा समज यूरोपीयन शोधकांच्या तर्कसरणींत गर्भित असतो. हा गर्भित समज सर्वत्र खरा नाहीं. यूनायटेड् स्टेट्स् मध्यें कमजास्त रानटी असे नीग्रो लोक तीनशें वर्षांपूर्वी गो-या लोकांनी आणिले. ते गो-यांच्या आगमनाच्या पश्चात्क आहेत. तसें च भिल्लादि कमजास्त रानटी लोक दक्षिणेंत आर्यांच्या पश्चात्क असण्याचा संभव आहे. हा संभव कितपत साधार आहे, तें पारखण्या करितां, सध्यां एक साधन मज जवळ सिद्ध होऊं पहात आहे. तें साधन म्हणजे महाराष्ट्रांतील गांवांच्या प्रस्तुतकालीन नांवांचा अभ्यास. ह्या अभ्यासा पासून प्रस्तुत प्रश्नाचा निर्णय होण्यास मदत व्हावी असें वाटतें. ती अभ्यासपद्धति एणें प्रमाणें:-