जातिनामव्युत्पत्तिकोश

माळी - माल: = मलओ = मळा = बागा. ज्याचा धंदा मळ्यांत तो माळी. (नामादिशब्दकोश - माळ २ पहा)

मोराटो, मोराठे ( Moratto ) इ. स. च्या सतराव्या शतकांतील ईस्ट इंडिया कंपनीचे हिंदुस्तानांतील इंग्रज बेपारी व नोकर मराठ्यांना मोराटो म्हणत. हा उच्चार ते बंगाली लोकांपासून पहिल्याप्रथम शिकले. बंगाली लोक अ चा उच्चार र्‍हस्व ओ करतात. त्यामुळे मचा मो करून तत्कालीन बंगाली लोक मराठ्यांना मोराटो म्हणत. मो उच्चार कां झाला तें येथपर्यंत सांगितलें. आतां टो ची परंपरा सांगतों. मराठा म्हणून जो शब्द आहे तो मराठो असा रजपूत, व्रज, मारवाडी व बंगाली भाषांत प्रथमपुरुषाच्या एकवचनीं होत असे. येणें प्रमाणें मोराठो हा उच्चार निष्पन्न झाला. ठो चा टो असा कोमल उच्चार करण्याची बंगाल्यांची लकब आहे. त्यामुळे मोराटो हा उच्चार सिद्ध झाला. तो कलकत्याच्या इंग्रजांच्या परिचयाचा झाला व तो त्यांनीं आपल्या पत्रव्यवहारांत व इतिहासांत नमूद करून ठेवला. हा दिसण्याला वेडाबागडा उच्चार इंग्रजांनीं आपल्या टांकसाळींतून स्वयंस्फूर्तीनें पाडला नाहीं. त्यांनीं फक्त बंगाली लोकांचें अंधपरंपरा न्यायानें अनुकरण केलें व आधुनिक मराठ्यांच्या थट्टेस आपणास नाहक्क पात्र करून घेतलें. (भा. इ. १८३३)

लाडसक्के - शक = सक. ठसकेदार उच्चार सक्क, (पु.) सक्का, (पु. अनेकवचन ) सक्के. लाडसक्का म्हणजे लाट देशांतील शक लोक. (महाराष्ट्रांचा वसाहतकाल पृ. १३८ )

लोणार - लवणाकरः = लोणार.

वंजारी - १ वनदारक किंवा वाणिज्यहारी
(महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ. १३६)
-२ ( बिंजारी पहा)

वडार - वध्र ( लोकनाम )

वाघरी - वागुरिक ( snake-keepers ) = वागरी = वाघरी ही एक जात गुजराथेंत आहे.

वाणी - पाणिक merchant = वाणी.

वारली - वारुडकि = वारुलइ = वारुली = वारली. दुबळा शूद्र आहे. वरुड ही एक अनार्य जात होती. तिच्यापासून वारुडकि जात झाली. (महिकावतीची बखर पृ. ८३)

वेसकर - (महार शब्द पहा ) - जे श्वपाक यालाच महार हें लौकिक नांव आहे तस्य मृतानां गोगर्दभशुनां ग्रामाद् वहिर्निर्हरणं वृत्तिः नगरादबहि: वासश्च । ह्याला वेसकर, येसकर, ही संज्ञा खेड्यांतून असलेली दृष्टीस पडते. वेशीपाशीं नगराबाहेर राहणारा जो तो वेसकर किंवा एसकर अगर येसकर. यांनीं गवादींचें कातडें काढून वारावरांना म्हणजे चांभारांना द्यावें. ( राजवाडे लेख संग्रह भा. २ अंत्यजोद्धार पृ. १३३ )