जातिनामव्युत्पत्तिकोश

बढई, बढवई, बढाई [ वर्धकिन् = बढ्ढइणो = बढई, बढाई, बढवई ] बढई = सुतारकम करणारी एक जात. (स. मं.)

बिंजारी - विंध्याधरिन् = विंज्झ्याहरी = विंझारी = बिंजारी = वंजारी. (भा. इ. १८३२)
बुरूड [ वरुड: ( अंत्यज विशेष) = बरूड = बुरूड ]

बेरड १ [वैराष्ट्रिक = बेरट्ट = बेरड ] (राधामाधवविलासचंपू पृ. १६० )
-२ [ वेरट ( a low caste man ) = बेरड ]

वेलदार [ बिलदारक = बेलदार] दगडांचें बीळ उकरणारा, खाण उकरणारा.

भंडारी - मंडहारक = मंडहारिकः = भंडारी.
मंडं अच्छसुरां हरति मंडहारक:
मंडहारक म्हणजे ताडी करणारा.

भांडारी - ( १ ) कोकणांत भांडारी नामक दर्यावर्दी लोकांची जात आहे. ह्या लोकांत मायनाक, रामनाक, वगैरे नाकप्रत्ययान्त नांवें असतात. नाक हा नाग ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. उघड आहे की, हे भंडारी लोक नागवंशीय आहेत. ह्यांचा पिढीजात धंदा दर्यावर्दीपणाचा आहे. संस्कृतांत भांड म्हणजे गलबत. गलबतांनीं समुद्रावर हालचाल करणारे जे ते भांडाहार.

भांडाहार = भांडार
भांडार ते च भांडारी

(२) महारांच्या हि नांवांपुढें नाक, नाग हे शब्द लागतात. तेव्हां महार हि नागवंशीय होत.
(३) भारतांत नागांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यापैकीं बहुतेक सर्व वंश सध्यांच्या मराठा क्षत्रियांत आढळतात. इतिहाससंग्रहाच्या दुसर्‍या वर्षांच्या चवथ्या अंकांत नागांविषयीं मीं एक विस्तृत लेख लिहिलेला आहे. त्यांत नागवंशीय मराठा क्षत्रियांच्या आडनांवांचा ऊहापोह केला आहे.
(४) तात्पर्य, प्राचीन नागलोकांत क्षत्रिय, नावाडी व अतिशूद्र अशा तीन जाति असाव्या किंवा होत्या, हें नि:संशय आहे. (भा. इ. १८३५)

भावीण - भामिनी = भाविणी = भावीण (स्त्रीविशेष. जातिनाम ). (भा. इ. १८३३, ३७)

मण्यारी [ मणिकार = मणिआर = मण्यार = मण्यारी ] (भा. इ. १८३२ )

महार - गाईला संस्कृत शब्द महा. ह्या गोवाचक महा शब्दावरून गवादींचें गांवाबाहेर निर्हरण करणार्‍या जातीला महाकार अशी संज्ञा असे. महाकार शब्दाचें महाराष्ट्री रूप महाआर व महाआर ह्या महाराष्ट्री शब्दाचें मराठी रूप महार. ( राजवाडे लेख संग्रह भा. २- अंत्यजोद्धार पृ. १३३)

महुमद - [ केशव Mahamedan ह्याला महुमद शब्द योजतो ] (भा. इ. १८३२)

मांगेल - मांग + इल या दोन शब्दांचा समास आहे. पैकीं मांग हा शब्द मातंग ह्या शब्दाचा अपभ्रंश समजणें युक्त नाहीं. कारण मांगेल लोक अस्पृश्य नाहींत, पूर्ण स्पृश्य आहेत. तेव्हां मांगेल या संयुक्त शब्दांतील मांग ह्या शब्दाचें मूळ अन्यत्र शोधिलें पाहिजे. या मांगेल किंवा मांगेले लोकांचा धंदा मच्छीमारीचा असून ते उंबरगांवापासून मुंबईपर्यंतच्या टापूंत समुद्रकिनार्‍यापासून मैल अर्ध मैलाच्या आंत वस्ती करून राहिलेले आहेत. (महिकावतीची वखर पृ. ८०)