Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

जातिनामव्युत्पत्तिकोश

निच्छिवि, लिच्छिवि ऊर्फ लिच्छवि व्रात्यक्षत्रियांचें नेपाळांत शक ५५७ च्या सुमारास राज्य सुरू झालें.
ह्या लिच्छवि जातीचें नांव गौतमबुद्धाच्या चरित्रांत अति येतें.
(भा. इ. अहवाल १८३२ प्रभू पहा).

नायर [ नाग + केर (संबंधार्थक प्राकृत प्रत्यय) = नागकेर = नाआएर = नाएर = नायर ]
(रा. मा. वि. चंपू पृ. १८९)

परदेशी [ पारदेशिक = परदेशी ]

परभू- ( प्रभू पहा )

परेया - मद्रास वगैरे प्रांतांत अतिशूद्राहूनही एका पतित जातींतील लोकांस परेया म्हणतात. परेता:=परेया=मेलेले = मृत. जुन्या काळीं पिशाच्च म्हणून जे येथील मूळचे लोक होते, त्यांना, जिंकून जमीनदोस्त केल्यावर परेता:, परेया, असें अपनाम आर्यांनीं दिलें. ( सरस्वतीमंदिर)

पिंजारी - पंजिकार: = पिंजारी
पिशाच - पिशिताशनः = पिशाचः = पिशादः

पिशं अत्ति = पिशाचः, पिशाचs i.e. the original people of पेशावर were canibals.

पुंड - पुंड्र = पुंड = पुंड. पुंड्रक हा शब्द जातिवाचक असून ऐतरेय ब्राह्मणांत आला आहे. (भा. इ. १८३२ ) पेंढार, पेंढारी - पिंडार = पेंडार = पेंढार, पेंढारी. पिंडार (गाईम्हशींचे कळप घेऊन जाणारे आहीर वगैरे.)
(भा. इ. १८३२)

प्रभू - ( प्रभू, परभू, अधिकारी ) - देशावर जसे देशमुख, देसाई वगैरे पांचपन्नास, किंबहुना दोनचारशें खेड्यांवरील आधिकारी सातआठशें वर्षांपूर्वी असत व सध्यां आहेत, त्याप्रमाणेंच दक्षिण कोंकणांत प्रभू ह्या नांवाचे अधिकारी असत, व आहेत. हे अधिकारी, ब्राह्मण, शेणवी, कायथ व मराठे ह्यांपैकी वाटेल त्या जातीचे असत. जसे इंग्लंडांत लॉर्ड लोक त्या त्या परगण्याचे अधिकारी असत, तसेच हे प्रभू लोक कोंकणांतील पांचपन्नास गांवांचे अधिकारी असत. ब्राह्मण, शेणवी व मराठे ह्या तीन जातींचे जे प्रभू होते ते यद्यपि प्रभूपणा करीत तत्रपि त्यांनीं प्रभूपणाची एक निराळी जात केली नाहीं. कारणा, पेशा जरी प्रभूपणाचा असला तत्रापि आपल्या जातींत त्यांचा समावेश होत असे. कारण ब्राह्मण, शेणवी व मराठे ह्याच देशांतले राहणारे होते व आपण जींत आहों तीहून उच्च जातींत जाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा साहजिकच नव्हती. परंतु कायथांची तशी स्थिति नव्हती. ते ब्राह्मण, शेणवी किंवा मराठे ह्यांपैकीं कोणत्याही एका जातींतील नसून कायथ म्हणून अक्षरचणकांची जी एक जात आर्यसमाजांत प्रसिद्ध आहे तींतील होते. ह्या कायथ लोकांचा धंदा लिहिण्याचा, चित्रे काढण्याचा वगैरे असे. ह्या कायथांतील कित्येक लोक कोकणांत व मावळांत प्रभू झाले; तें प्रभूपण त्यांनीं दहापांच पिढ्या केलें; व प्रभू या आडनांवानें च ते आपल्याला मोजूं लागले. लोकांनीं ' तुम्ही कोण ' म्हणून विचारिलें म्हणजे ह्यांनीं 'प्रभू' म्हणून सांगावें, ' कायथ ' म्हणून सांगू नये. ह्यांच्यापैकीं कित्येक अशिक्षित लोक प्रभू शब्दाचा उच्चार परभू करीत. इतर ब्राह्मणादि जातींतील कुटाळ लोकांना एवढेच पुरें होऊन प्रभू शब्दाचा परभू असा अपभ्रष्ट उच्चार ते मुद्दाम करीत. अशा रीतीनें परभू हा शब्द निष्पन्न झाला आहे. खरा शब्द प्रभू असाच आहे. ब्राह्मण, शेणवी, मराठे, प्रभू यांपासून भेद दाखविण्याकरितां हे आपल्याला कायथ प्रभू म्हणत. पाताणे प्रभू यांपासून भेद दाखविण्याकरितां चांद्रसेनीय हें विशेषण हे लेक जोडतात. कायथ हा शब्दही धंद्याचाच वाचक आहे. ह्या चांद्रसेनीय कायथ प्रभूंची मूळ जात कोण हें जातिनिर्णायक ग्रंथांवरून ऐतिहासिक परीक्षेनें कळण्यासारखे आहे. चित्रे = चित्रें काढणारे, गुप्ते = खजिन्यावरचे कारकून. चिटणीस, कारखानीस, वगैरे जीं आडनांवें ह्या लोकांत प्रचलित आहेत त्या सर्वाचा लेखणीशीं कांहींना कांहीतरी संबंध आहे. ही जात महाराष्ट्रांत बरीच पुरातन आहे. ( सरस्वती मंदिर श्रावण शके १८२६)