जातिनामव्युत्पत्तिकोश

अधिकारी - ( प्रभू पहा )

अरब - वाजिवाहार्वगंधर्वहयसैंधवसप्तयः (अमर - द्वितीय कांड - क्षत्रियवर्ग ४५) येथें अर्वन् शब्द घोडा या अर्थी आलेला आहे. क्षीरस्वामी अर्वति याति इति अर्वा अशी व्युत्पत्ति करतो. व्युत्पत्ति हटानें वाटेल तशी होते. माझ्या मतें अर्वन् शब्द देशवाचक आहे. ज्यांना सध्यां अरब म्हणतात त्यांचें मूळ नांव अर्वन् व त्यांच्या देशाचें हि नांव अर्वन्. अर्व देशांतील घोडा तो अर्वन्. हा देशवाचक अर्व शब्द ऋग्वेदांत येतो.
(भा. इ. १८३४)

ओस्वाल १ - ऊर्जस्वल = ओस्वाल (माधवचंपू) (जातिविशेष )
-२ अश्वपालः = ओस्वाल (ब्राह्मणाची एक जात )

काठी [ कांथिक: = कांठी, काठी ] काठेवाडांतील लोकांना काठी म्हणतात.

कातकरी [ कातवडी पहा ]

कातवडी [ कृत्तिपट्टिन्= कातवडी ] कातवडी, काथोडी, कोठोडी व कातकरी हीं एकाच जातीचीं नांवें आहेत. कृत्ति म्हणजे कातडें व पट्ट म्हणजे वस्त्र. कातड्याचें वस्त्र पांघरणारा तो कुत्तपट्टिन्. (महिकावतीची बखर पृ. ८४)

कायस्थ १ - कायस्थ, कायथ, काइत, काइथ हा शब्द काय व स्थ या शब्दांच्या संहितेपासून निघाला आहे. क्षत्रियात् शुद्रायां जातः कायस्थः । काय म्हणजे मूळ धन. त्यावर उपजीविका करणारा जो तो कायस्थ. काये, कायेन वा तिष्ठति य: स कायस्थः । ह्याचा मूळ धंदा व्याजबट्टा करण्याचा दिसतो नंतर लेखन, चित्रकर्म हीं कामें ह्याला नेमून दिलीं, असें दिसतें.

-२ अथवा बोटांचीं शेवटें म्हणजे काय. त्याच्या साह्यानें उपजीविका करणारा जो तो कायस्थ. हाताच्या बोटाच्या शेवटांनीं लेखन, चित्रकर्म साधावयाचें. तेव्हां लेखन चित्रकर्म हा मूळ धंदा. त्यानंतर इतर धंदे.

या दोन व्युत्पत्त्या दिल्या आहेत. पैकीं दुसरी व्युत्पत्ति बरी दिसते. कारण, धर्मशान्त्रांतर्गत जातिविवेकप्रकरणांत दिलेल्या लेखनकर्माशीं ह्या दुसर्‍या व्युत्पत्तीचा मेळ चांगला बसतो. मनुसंहिता, याज्ञवल्क्य, मुद्राराक्षस व मृच्छकटिक यांत हा शब्द येतो. कायस्थ इति लघ्वी मात्रा ( मु. १; मृ. ९; या. १-३३६) (भा. इ. सं. मं. अहवाल १८३२ पान १६)