गाणे, चित्रिणे, नाचणे व मूर्तिकरणे, किंवा काव्य, सचित्र ग्रंथ, नाटक व स्थापत्य हा आठही कलांत अंतःकरण जे मन व मनाचा मालक जो मनुष्य त्याची कर्तबगारी प्रधान असते. मनुष्याची कर्तबगारी व लुडबूड ज्यात अप्रधान असते अशाही चार बिना ध्वन्यादींच्या पायावर मनुष्याला पैदा करता आल्या. प्रायः बाह्यसाधनावर विशेष मदार ठेवून ह्या बिना मनुष्याने बनविल्या. कातडी, बांबू , धातू, केश, तारा इत्यादींच्यावर आघात केला असता ध्वनी निघतो व तो ध्वनी योग्य त-हेने वळविला तर त्याच्या पासून सुस्वर उत्पन्न होतात. बाह्य पदार्थांपासून सुस्वर काढण्याच्या ह्या कलेला वादन म्हणतात. वस्तूंची हाताने चित्रे काढण्यापेक्षा प्रकाशाच्या द्वारा ती काढून घेण्याची प्रकाशलेखनकला महशूर आहे. नटांची मातब्बरी सफा काढून टाकून केवळ बाहुल्यांच्याकडून अभिनय व नर्तन करविण्याची कळसूत्राची कला अत्यन्त पुरातन आहे. मूर्तीच्या आंगलटीत व मुखचर्येत विचार व विकास साठविण्यापेक्षा वृक्ष, वेली, उपवने, उद्याने, मैदाने व टेकड्या यांच्या विशिष्ट रचनेने विचार व विकार चेतविण्याची भूमिरचनेची कला भरतखंडात फार जुनी आहे. वाद्यात फोनोग्राफ, चित्रणात प्रकाशलेखन व कळसूत्रात सिनेमा ही रूपे आधुनिकशास्त्रज्ञानोत्पन्न अतएव सद्यस्क आहेत. ह्या तिहींखेरीज बाकींची सर्व रूपे आपल्या ह्या महाराष्ट्रात प्राचीन कालापासून उमद्या स्थितीत असलेली आढळतात. ह्या बाह्य कलांचा जोड पूर्वीच्या आठ कलांना दिला असता नकाशा व परंपरा अशी बनते--
