पाठाण - प्रात्तायनाः (स)
पाठारे - प्रस्थाहारकाः ( प्रभु )
१ पाताणे ऊर्फ पाठारे परभू ऊर्फ प्रभू हे लोक कोंकणांत कोठून आले, एतत्संबंधानें निश्चित अशी माहिती बिलकूल नाहीं. पाताणे हा शब्द पत्तन ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा असा कित्येकांचा तर्क आहे, परंतु तो साधार नाहीं. पत्तन ह्या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पातन होईल किंवा पातण होईल, परंतु पाताण होणार नाहीं. पट्टण ह्या शब्दापासूनही पाताणे हा मराठी शब्द निघूं शकत नाहीं. पट्टण ह्या संस्कृत शब्दाचा मराठी किंवा गुजराथी अपभ्रंश पाटण होतो, पाताण होत नाहीं. सबब, अन्हिलपट्टण किंवा अनहिलपत्तन या शहरांशीं पाताण्यांचा संबंध जोडतां येण्यास अशी ही भाषिक अडचण येते. शिवाय, इतर ऐतिहासिक पुरावा, पाताणे अनहिलपत्तन शहरीं किंवा प्रांतीं मध्ययुगीन काळीं राहात होते असा, बिलकुल उपलब्ध नाहीं. करितां, पट्टण, पाटण, पतन व अनहिलपट्टण किंवा अनहिलपत्तन या शब्दांशीं पाताणे या मराठी शब्दाचा कांहीं एक संबंध नाहीं हें स्पष्ट झालें.
२ पाठारे या मराठी शब्दाचा तर पट्टण, पट्टन, पतन व अनहिलपट्टण किंवा अनहिलवाट किंवा अनहिलवाड या शब्दांशीं दूरचाहि आपभ्रांशिक संबंध नाहीं. पाताणे या मराठी शब्दांत पत्तन या संस्कृत शब्दांतील प, त, न, या अक्षरांचें समानास्तित्व तरी आहे, फक्त त चा ता कां व कसा झाला, एवढेंच विषमत्व उरतें. परंतु पाठारे ह्या मराठी शब्दांत पत्तन ह्या संस्कृत शब्दांतील प हें एक अक्षर तेवढे समान आहे, बाकी सर्व अक्षरें विषमान आहेत. पट्टन ह्या संस्कृत शब्दांतील पाठारे ह्या मराठी शब्दांत प हें एक अक्षर समान आहे. बाकीचीं सर्व अक्षर विषमान आहेत. सबब, कोणतीही घालमेल केली, तरी पत्तन किंवा पट्टन अथवा पाटण ह्या शब्दापासून पाठारे हा मराठी शब्द निर्वचितां येणें मुष्कील अहे.
३ इतर कोणत्याहि संस्कृत शब्दापासून पाठारे हा मराट शब्द यथायोग्य निर्वचिलेला माझ्या पहाण्यांत नाहीं.
४ पाताणे व पाठारे अशीं दोन नांवें ह्या लोकांचीं प्रसिद्ध आहेत. पाताणे प्रभू व पाठारे प्रभू, किंवा नुसतें पाताणे किंवा पाठारे अशा चार तर्हांनीं ह्या जातीचा निर्देश लौकिकांत होत असलेला आढळतो. प्रस्थपुरवहान्ताच्च (४-२-१२२) ह्या सूत्रावर भाष्य करतांना पतंजलि वाहीक देशांतील एका गांवाचा उल्लेख असा करतो :- पातानप्रस्थ नाम वाहीक ग्रामः । वाहीक देशांत म्हणजे सध्यांच्या पंजाबाच्या पूर्वभागांत पातानप्रस्थ नांवाचें एक गांव आहे, असें पतंजलि म्हणतो. पातानप्रस्थ हें त्या तर्फेतील प्रमुख गांव होतें, हें तदवयवीभूत प्रस्थ ह्या शब्दावरुन उघड आहे. प्रस्थं म्हणजे प्रकर्षेण प्राचुर्येण स्थीयते अत्र इति प्रस्थं. जेथें पुष्कळ लोकांची वस्ती असे त्या मोठ्या गांवांला प्रस्थ म्हणत. अशा मोठ्या गांवावरून त्या गांवाच्या भोवतालील तर्फेला किंवा तालुक्याला नांव पडे. त्या कालीं तर्फेला किंवा तालुक्याला आहार ही एक संज्ञा असे. पातानप्रस्थ ह्या मोठ्या गांवावरून सभोंवतालील तर्फेला पातानप्रस्थाहार असें नांव पडलें. ह्या पातानप्रस्थाहारांत राहाणारे जे लोक त्यांना पातानप्रस्थाहारका: म्हणत. पातानप्रस्थाहारका: ह्या लांबलचक अष्टाक्षरी नांवांतील ' पूर्वोत्तरपदयोर्वा लेपो वाच्यः ” ह्या वार्तिकाप्रमाणें उत्तरपदाचा लोप होऊन पातानका: असा एक संक्षेप होई व पूर्वपदाचा लोप होऊन प्रस्थाहारकाः असा दुसरा संक्षेप होई. अश्या तर्हेनें वाहीक देशांतील पातानप्रस्थाहार प्रांतांत राहाणार्या ह्या लोकांना उच्चारसौलभ्यार्थ पातानक व प्रस्थाहारक अशीं दोन नांवें पडलीं. पैकीं पातानक ह्या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाताणा आणि प्रस्थाहारक ह्या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पठ्ठारा, पाठारा.