देवरुखे, पळशे, सवाशे, शेणवई, तिर्गूळ, गोळक, वगैरेंच्या आडनांवांची हि वरीलप्रमाणें च व्यवस्था असलेली दिसेल, ह्यांचीं गोत्रें मीं अद्याप जमविलीं नाहींत.
क्षत्रिय दोन प्रकारचे, सार्ष व अनार्ष. पुरोहितप्रवरो राज्ञां असें आश्वलायन श्रौतसूत्रांत म्हटलेलें आहे. तत्रापि, शुंग, मौर्य गुप्त, शालिवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, बाण, इंद्र, चालुक्य, चौलुक्य, गुहिल, गांग, गुप्त, सिंद, वगैरे आडनांवें गोत्रमामें असलेलीं स्पष्ट दिसतात. ताम्रशिलापट्टांत हारीत, आंगिरसहारीत, काश्यप, कौंडिन्य, मानव्य, वगैरे गोत्रें क्षत्रियांचीं दिलेलीं आढळतात. वासिष्ठीपुत्र, गौतमीपुत्र, माठरीपुत्र, वगैरे नांवें जशीं शातवाहनवंशांत सांपडतात तशीं ब्राह्मणांतील आचार्यवंशपरंपरेत हि सांपडतात. काळे, पांढरे, गोरे, गोळे, गाढवे, साठे, वगैरे गोत्रनामोत्पन्न आडनांवें मराठ्यांत अद्याप आहेत. त्यावरून असें दिसतें कीं, मराठ्यांत ऊर्फ क्षत्रियांत ब्राह्मणांच्या प्रमाणें च गोत्रें आहेत. परंतु, इतकें खरें कीं, क्षत्रियांचीं गोत्रें व प्रवर त्यांना तोंडपाठ असण्यापेक्षां त्यांच्या पुरोहितांना जास्त तोंडपाठ असत. उघड च आहे, इतर विवंचनेपुढें गोत्रांकडे लक्ष्य देण्यास त्यांना वेळ नसे. ब्राह्मणानां राजार्पितानां राज्ञां वा ब्राह्मणार्पितानां, असें सूत्रवचन आहे. राजाला अर्पण केलेल्या ब्राह्मणाचें गोत्र जें राजाचें तें, व ब्राह्मणाला अर्पण केलेल्या राजाचें गोत्र जें ब्राह्मणाचें तें, असा प्रघात असे. वैश्यांची हि हीच तर्हा. जैन लोकांत गोत्रें आहेत. तीं हि गोत्रांचा अभ्यास करणार्याला जुळविणें मोठं फलप्रद होईल यांत संशय नाहीं.
गाणगारि वगैरे तांडिन आचार्य सर्ववर्ण एकार्षेय मानीत. सर्ववर्णांचें आर्ष ' मानव ' असें तें म्हणत. त्याला आधार, मानव्यो हि प्रजा इति हि ब्राह्मणं । हा देत. परंतु, हें एकप्रवराचें व एकगोत्राचें मत श्रौतकर्मवरणांत मान्य करीत, विवाहादिसंस्कारांत मान्य करीत नसत. कारण, तसें केल्यास समानप्रवर्यांचा विवाह होऊं लागेल अशी अडचण येई व समानप्रवरांचा विवाह आर्यांना केव्हां हि मान्य नसे. तात्पर्य, एकप्रवरत्वाचें हें मत सर्वसंमत होण्यासारखें नव्हतें. तत्त्वतः सर्व प्रजा मनूपासून निघाली असें मानीत. परंतु व्यवहारांत असंख्य गोत्रें व असमानप्रवरविवाह चालू असत.
१२ येणेंप्रमाणें कर्हाडे, कोंकणस्थ व देशस्थ यांच्या गोत्रांची परंपरा आहे. सप्तर्षीपर्यंत यांचीं गोत्रें जातात व तेथपासून आतांपर्यंत व आपल्यापर्यंत वंश आणून भिडवितां येतो. अशा ह्या वंशांत अहिंदूचा समावेश होण्याचा बिलकुल संभव व शक्यता नाहीं. अगस्तीसह आठ ऋषि, ४९ प्रवर व अर्बुद गोत्रे, नंतर प्राकृत गोत्रें व नंतर मराठी आडनांवें, अशी अव्याहत परंपरा आहे. भारतीय आर्यांचा वंश येणेंप्रमाणें महाराष्ट्रांत बिनतूट व अस्खखित चालत आलेला आहे. वंशेतिहासाचीं आपल्या इकडे जितकीं साधनें आहेत तितकीं विपुल साधनें अन्य देशांत व अन्य समाजांत क्वचित् च सांपडतील.