वर्तक, जोशी, देशमुख, भट, पटवर्धन, हीं कोकणस्थांची आडनांवें धंद्याचीं दर्शक आहेत. पैकीं पट्टवर्धन ह्या कुलाचें नांव प्राचीन ताम्रपटांतून येतें. एका प्राचीन ताम्रपटांत एक नायकीण पट्टवर्धन कुलांत जन्मली म्हणून उल्लेख असल्याचें आठवतें. संदर्भ पुस्तकें जवळ नाहींत म्हणून संदर्भ दिला नाही. पट्टवर्धनाचें काम ताम्रपट्ट कापुण्याचें व तयार करण्याचे असावें. हें कुलनाम होतें त्या अर्थी त्या कालीं हा ताम्रपट्ट तयार करण्याचा धंदा पिढीजाद होऊन बसला होता, हें उघड आहे. तसें च पट्टवर्धन ब्राह्मण च होते असें दिसत नाहीं, ब्राह्मणेतर हि होते. कालान्तरानें धंद्याचा लोप होऊन, हें केवळ कुलनाम ऊर्फ आडनांव झालें.
रानड्ये हें गोत्रनाम आहे. मूळ गोत्र अरण्यवाटा; त्याचा अपभ्रंश रण्णवाड. त्याचें प्राचीन मराठी राणवडे. त्याचें अर्वाचीन मराठी रानडे. रानडे यांच्या वंशांत उत्पन्न झाले ते रानड्ये. वाटाः हें गोत्रनाम प्रसिद्ध आहे. परंतु, अरण्यवाटा : हें प्रसिद्ध नाहीं, म्हणजे गोत्रप्रवरग्रंथांत नाहीं. लक्षावधि जीं गोत्रें होतीं त्यांत हें गोत्रनाम असावें. मनोहर, मधुमत्ते, भैरव, भोगले, फफे, पघे, नवांके, फाळके, फडके वगैरे हि अप्रसिद्ध गोत्रनामें असावीं. ह्या लक्षावधि अप्रसिद्ध गोत्रांचा निर्देश गोत्रप्रवरग्रंथांत, करणारा पुरुष प्राचीन काळीं कोणीं निपजला नाहीं, हें मोठे दुर्भाग्य होय. तत्रापि अशीं गोत्रें होतीं, हें अर्वाचीन कालांत उपलब्ध होणार्या मराठी आडनांवांवरून निःसंदेह ताडतां येतें.
राजवाडे हें आडनांव दोन तर्हांनीं व्युत्पादितां येईल. राजवाटा: असें गोत्र असावें. किंवा राजवाड्यांतील अधिकारी अशी दुसरी व्युत्पत्ति होईल. पैकीं दुसरी व्युत्पत्ति दिनकरराव राजवाडे यांच्या चरित्रांत दिली आहे.
शिवाजीच्या राजवाड्यांत राजवाड्यांच्या कोण्या एका पूर्वजाला कांहीं एक अधिकार होता, त्यावरून त्याच्या सर्व वंशजांनीं राजवाडे हें आडनांव पिढीजाद लावून घेतलें. राजवाड्यांचें मूळ आडनांव जोशी. हे शांडिल्यगोत्री जोशी मूळचे राहणार निवें म्हणून गांव रत्नागिरीजवळ आहे तेथचे.
अगस्तीसह एकंदर ऋषि आठ व प्रवर एकूणपन्नास. ह्या एकूणपन्नास प्रवरांखालीं लक्षावधि गोत्रें पडतात. एक भागवित्ति किंवा भागवित्तायन गोत्र घेतलें तर तें गार्ग्य, कपि, जामदग्नि व कौशिक ह्या चार मुख्य गोत्रांखालीं पडतें. म्हणजे भागवित्ति ऊर्फ भागवत जसे गार्ग्यगोत्री आहेत, तसेच ते कपिगोत्री, जामदग्निगोत्री व कौशिकगोत्री हि आहेत. कर्हाड्यांत भागवत काश्यपगोत्री व भारद्वाजगोत्री हि आहेत. म्हणजे एकंदर भागवत सहा निरनिराळ्या गोत्रांचे आहेत. ह्या सहा गोत्रांप्रमाणें भागवित्ति ऊर्फ भागवत हें हि गोत्रनाम च आहे. इतकेंच कीं कोंकणस्थांत व कर्हाड्यांत तें आडनांव झालें आहे. गोत्रप्रवरग्रंथांत सांगितलेलीं दोन हजार गोत्रें त्या दोन हजार गोत्रांपैकीं प्रत्येकाखालीं पडतील. ह्याचा अर्थ इतका च कीं, हीं गोत्रनामें संस्कृत भाषा जेव्हां सररहा प्रचलित होती त्या कालीं ऋषिनामें ऊर्फ व्यक्तिनामें होती व तीं पुढें प्रजा जशी वाढत चालली तशीं कांहीं प्रत्यय लागून गोत्रनामें ऊर्फ आडनांवें झालीं. हीं आडनांवें सध्यां हि प्राकृत रूपानें महाराष्ट्रांत चालू आहेत. भाटे हें आडनांव शांडिल्य, कपि, गार्ग्य, जामदग्नि, अत्रि, भार्गव व गौतम, इतक्या गोत्रांत आहे. भाटे म्हणजे भ्राष्ट्रेयाः. गोडशे, गोरे, खुळे, आचार्ये फणशे, मुळ्ये वगैरे अनेक आडनांवें अशीं अनेकगोत्री आहेत. खुद्द गोत्रप्रवरग्रंथांत तीं च तीं गोत्रनामें निरनिराळ्या गणांत येतात. ती च प्रकार सध्यां हि दृष्टीस पडतो. ह्यावरून एक गोष्ट निष्पन्न होते, ती ही कीं, पांच हजार गोत्रांपैकीं प्रत्येक गोत्राखालीं जर सारीं च पडू शकतात, तर एकंदर गोत्रें ५००० × ५०००= २५०००००० दोन कोट पन्नास लाख होतात. बौधायन तर म्हणतो की गोत्रें अर्बुद आहेत. वरील गणित पहातां बौधायनाचें म्हणणें साधार दिसतें व बौधायनकालीं ब्राह्मणसंख्या किती मोठी होती याचा स्थूल अंदाज होतो.