४ कोणत्या हि गोत्राचा ब्राह्मण वेदाची कोणती हि शाखा स्वीकारी. प्रायः बापाची शाखा मुलगा स्वीकारी परंतु अन्य शाखा स्वीकारण्यास प्रत्यवाय नसे व नाहीं. एक काश्यप गोत्र आहे तर त्यांत आश्वलायन, आपस्तंब, हिरण्यकेशी, माध्यंदिन, काण्व, वगैरे सर्व शाखा आहेत. चरणाचा हि स्वीकार स्वेच्छेवर अवलंबून असे. चरण व शाखा ह्यांचें महत्व गोत्र व प्रवर यांच्या इतकें विवाहादिसंस्कारांत विशेष नाही. अर्थात् शरीरसंबंधीं किंवा अग्न्युपासनसंबंधीं कार्यात शास्त्रकारांनीं चरण व शाखा ह्यांचा निर्देश बिलकुल केलेला नाहीं.
५ पाणिनि, बौधायन, आश्वलायन, आपस्तंव, शौनक, कात्यायन, पतंजलि, हीं गोत्रनामें आहेत, व्याक्तिनामें नाहींत. गार्ग्यनारायण, लौगक्षिभास्कर, वगैरे जोड नांवांतील गार्ग्य व लौगाक्षि हे शब्द गोत्रवाचक आहेत. गोत्रवाचक्र आहेत म्हणजे आधुनिक परिभाषेत बोलावयाचें झाल्यास आडनांवें ऊर्फ उपनामें आहेत. गार्ग्यश्चासौ नारायणः, लौगाक्षिश्चासौ भास्कर: , नारायण कोण तर गार्ग्य; व भास्कर कोण तर लौगाक्षि. पांच सातशें वर्षांपूर्वी भारतांत आडनांवें नव्हतीं असें म्हणणार्यांनीं हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे कीं गोत्र हीं आडनांवें म्हणुन ज्यांना म्हणतात किंवा कुलनामें म्हणून ज्यांना म्हणतात तीं च होत. ताम्रशिलापट्टांत ब्राह्मणांचीं व्यक्तिनामें व गोत्रनामें दिलेलीं आढळतात. पैकीं गोत्रनामें जीं दिलीं असतात तीं आडनांवें च होत. व्यक्तिनामें व आडनांवें सारखींच असल्यास किंवा इतर कारणास्तव वैशिष्टीकरणार्थ ग्रामनामें हि व्यक्तिगोत्रनामांना जोडीत. कशीं जोडीत तें पहावयाचें असल्यास ते ते ताम्रशिलापट्ट पहावेत. विस्तारभयास्तव व सहजोपलब्धिस्तव त्यांचें संकीर्तन करून व्यर्थ जागा आडवीत नाहीं.
६ बौधायनाच्या कालीं गोत्रसंख्या असंख्य झाली होती. तो म्हणतोः--
गोत्राणां तु सहस्राणि प्रयुतान्यर्वुदानि च ।
ऊनपंचाशदेवैषां प्रवरा ऋषिदर्शनात् ॥
गणसूत्रांत पाणिनि गोत्रनामें देतो तीं सुमारें तीन साडेतीन शें व्हावीं. बौधायनाच्या कालीं गोत्रें अर्बुद झालीं होतीं. अर्थात् पाणिनि व बौधायन ह्यांच्यांत अंतर कित्येक शेंकडों वर्षांचें असलें पाहिजे. सूत्रांतून जीं गोत्रनामें दिलेलीं आढळतात - बौधायन, कात्यायन, आश्वलायन इत्यादि-तीं फार तर शंभर दोनशें भरतील. परंतु, स्मृत्यनुसार जीं गोत्रनामें दिलेलीं आहेत त्यांची संख्या सुमारें ५००० पांच हजार भरते. निरनिराळे ग्रंथ पाहून मीं जीं गोत्रनामें जुळविलीं आहेत त्यांची एकंदर संख्या सुमारें ५००० भरते. पैकीं कांहीं नामें नीट कळलीं नाहींत. नक्कल करणार्यांच्या हलगर्जीपणामुळे व गाढ अज्ञानामुळे अनेकांचे उच्चार व अक्षरविन्यास अशुद्ध पडलेले आहेत. नाना ग्रंथांच्या तुलनेनें, श्रौतगृह्यसूत्रें, पाणिनि, पंतजलि संहिता, ब्राह्मणें, आरण्यकें, पुराणें व इतर धर्मशास्त्रग्रंथ पाहून गोत्रांचे शुद्ध पाठ तयार केले पाहिजेत. ते पाठ तयार करून मग त्यांची तुलना देशस्थांच्या गोत्रांची तोंडी याद तयार करून तिच्याशीं केली पाहिजे. ताम्रशिलापट्टांतून कित्येक अशीं गोत्रनामें आढळतात.
त्यांचा उल्लेख उपलब्ध गोत्रप्रवरांच्या यादींत सांपडत नाहीं. शिवाय भारतवर्षात जेवढा म्हणून ब्राह्मण आहे त्या सर्वांचीं गोत्रें जुळविलीं पाहिजेत. म्हणजे जो मोठा गोत्रोदधि तयार होईल, त्यावरून ब्राह्मणवंशावर, वेदाच्या लुप्त शाखांवर व गोत्रप्रवरांवर मोठा जाज्वल्य प्रकाश पडेल. भारतीय वंशशास्त्राचा ह्या पद्धतीनें अभ्यास करणें फार उपयोगाचें असून अगत्याचें झालें आहे. ब्राह्मणांच्या वंशांत अनार्य लोकांचा भ्रष्ट समावेश पूर्वी कधींतरी, कसातरी, व कोठेंतरी झाला असावा, असा शुष्क व सांशयिक तर्क कित्येक उत्कट कापालिकांनी केलेला आहे. परंतु, विवाहादि संस्कारांत गोत्रप्रवरादिबाबींनीं ब्राह्मणांनीं आपल्या कुलांना इतकें सूक्ष्म बांधून घेतलें आहे कीं ऐतिहासिक कालांत अनार्यांचा ब्राह्मणवंशांत समावेश होणें परम दुर्घट नव्हे तर बिलकुल संभाव्य व शक्य नाही. कापालिकांच्या उपरिष्ट विधानाचा ह्याहून स्पष्टतर निषेध करण्याची आवश्यकता नाहीं.