भारतीय आर्यवंश
गोत्रें ब्राह्मणादींचीं
१ अपत्यं पौत्रप्रभृति गोत्रं ( ४-१-१६२) असें गोत्राचें लक्षण पाणिनीनें केलें आहे. सूत्रांतील प्रवराध्यायप्रसिद्ध जीं गोत्रें व प्रवराध्यायाप्रसिद्ध जीं गोत्रें त्या दोन्हींचा अंतर्भाव ह्या पाणिनिप्रोक्त गोत्रशब्दांत होतो असें म्हणतात. नातू आदिकरून जें अपत्य तें गोत्र होय. पुत्रादि जें अनंतरापत्य तें पाणिनीयमतें गोत्र नव्हे. उदाहरणार्थ कुंज हें ऋषिनाम घेतलें, तर अनन्तरापत्यार्थी कौंजि असा तद्धितशब्द साधतो; परंतु पौत्रादि गोत्रार्थक कौंजायन असा तद्धितशब्द होतो. कौंजि हा पुत्र व कौंजायन हे नातवापासून पुढले सर्व वंश्य. एको गोत्रे (४-१-९३ ) गोत्र विवक्षित असतां अपत्यप्रत्यय एकच होतो. मग शंभर पिढ्या कां होत ना. नाहीं तर फक् व इञ् ह्या प्रत्ययांची परंपरा सुरू होऊन ९९ प्रत्यय होऊं लागतील व अव्यवस्थाप्रसंग गुदरेल, म्हणजे कुंज हें ऋषिनाम घेतलें तर नातवापासून पुढे शंभर दोनशें पिढ्यांपर्यंत जेवढें म्हणून अपत्य होईल तेवढें सर्व गोत्रार्थी कौंजायनसंज्ञक होईल, अशी व्यवस्था पाणिनिकालीं असे. पुत्रार्थक रूपें निराळीं व गोत्रार्थकरूपें निराळी. आश्वलायन, बौधायन वगैरे जा सूत्रकार झाले त्यांनीं गोत्राचें लक्षण असें केलं आहे :-
विश्वामित्रो जमदग्नि र्भरद्वाजोऽय गोतमः अत्रिर्वसिष्टः कश्यप इत्येते सप्त ऋषयः । सप्तानामृषीणां अगस्त्याष्टमानां यदपत्यं तद्गोत्रमित्याचक्षते । इति बौधायनः । म्हणजे अगस्त्यासह आठ ऋषींचें जे अपत्य तें गोत्र होय असें बोधायन म्हणतो. बौधायन ऋषींच्या पुत्रादि सर्व अपत्याला गोत्र ही संज्ञा लावतो; स्वतः ऋषींना गोत्र ही संज्ञा लावीत नाही, किंवा पुत्राला वगळून नातवापासूनच तेवढें गोत्र सुरू होतें असें म्हणत नाही. हा शेवटला प्रपंच पाणिनि करतो. पाणिनि सप्तर्षीचें अपत्य कीं कोणाचें अपत्य याचा निर्बंध करीत नाहीं. बौधायन सप्तर्षीचें अपत्य म्हणून निर्बंध करतो. बौधायनादींचें हें लक्षण केवळ सामान्य असून सैल आहे. उदाहरणार्थ, खुद्द बौधायन हा शब्द गोत्रार्थक आहे. मूळपुरुष बुध-त्याचें अनन्तरापत्य बौधिः व गोत्रापत्य म्हणजे पौत्रादि अपत्य बौधायन. अशी बोलण्याची रीति वौधायनाच्या वेळीं होती. परंतु, शास्त्रीय लक्षण करतांना ती रीति लक्षांत न घेऊन, आठ ऋषींचें जें अपत्य तें गोत्रसंज्ञक होय असें सैल, अव्याप्त व अतिव्याप्त लक्षण बौधायनानें केलें आहे.