खांडवारा - खांडव (अरण्यनाम) - खांडवद्वार:-खा नि
खांडवारें - खांडव ( अरण्यनाम ). खांडवद्वारं. ३ खा नि
खाडरें - खंडीरं (पिवळा मूग) - खंडीरं. खा व
खांडववन - सध्यां हिंदुस्तानच्या पूर्वेकडील देशांत खांड' म्हणून लोक आहेत. त्यांचेंच पूर्वीचें म्हणजे भारतकालीं तरी ' खांडव ' असें नांव असे. ह्या खांडववनांत च सध्यांचें खांडवा हें शहर आहे. भिमाशंकराच्या पायथ्याशीं तळकोंकणांत कर्जतापासून सहा कोसांवर खांड म्हणून गांव आहे. तेथें सध्यां कोळी ऊर्फ कोळ लोक राहतात. ह्या कोळ लोकांच्या प्रदेशाला ' कोळवन ' म्हणतात. कोळांवरून जसें कोळवन तसें गोंडांवरून ' गोंडवन ' कोळवन, गोंडवन व खांडवन अशीं वन शब्दान्त नामें ह्या कोळ, गोंड व खांड लोकांच्या प्रदेशाला फार पुरातन कालापासून असलेलीं दिसतात. वह उत्तरपद लागून खांडववह. त्याचें प्राकृत खांडवा ( ग्रामनाम ). प्रस्थपुरवहन्ताच्च (४-२-१२२). मुंडवा, सैंधवा हीं रूपेंहि अशाच मासल्याचीं होत. (भा. इ. १८३२)
खांडवा - (खांडववन पहा).
खांडवें - खांडव (अरण्यनाम) - खांडवहं. खा नि
खांडसी - खंडशयी (खांडगांवाखालील गांव). मा
खाडापिंपळ - खट्टा (देवताड तृण). खा व
खाडीजामुन - खट्टा (देवताड तृण) - खट्टायामुन. खा व
खातगांव - खात (पुष्करिणी ) - खातग्रामं. २ खा नि
खातुर्खें - खात ( पुष्करिणी ) - खातवृक्षं. खा नि
खांदेरी - स्कंदगिरि = खांदइरि = खांदेरी. (भा. इ. १८३३)
खानदेश - खानदेश व सेउणदेश.
खानदेश हें गांव बर्हाणपुराच्या किंवा अलजपुराच्या नबाबांनीं दिलें असा कित्येक युरोपियनांचा व एतद्देशीयांचा तर्क आहे, आणि खान या शब्दाकडे पहातां सकृद्दर्शनीं हा तर्क खरा असावा असें समजण्याकडे प्रवृत्ती होते. परंतु किंचिंत् सूक्ष्म दृष्टीनें पाहिलें असतां असें दिसून येतें कीं, हा शब्द अगदीं शुद्ध प्राकृत आहे. ह्या प्रांताचें मूळचें नांव कन्हदेश. कन्हदेश म्हणजे कृष्णदेश. देवगिरीच्या यादव कुळांत कृष्ण ऊर्फ कन्ह नांवाचा राजा झाला. त्यानें आपलें नांव ह्या प्रांताला दिलें. कन्हदेश, कान्हदेश, काहनदेश व खानदेश अशा परंपरेनें अपभ्रंश होत होत खानदेश असें नांव प्रचलित झालें. वहरट्ट ऊर्फ वर्हाड व नाशिक ह्यांच्या दरम्यानचा जो पश्चिमेकडील प्रांत त्याला कन्हदेश ऊर्फ खानदेश म्हणत. वर्हाड व नाशिक ह्यांच्या दरम्यानचा जो पूर्वेकडील व गोदेच्या उत्तरेकडील प्रांत तो देवगिरी ऊर्फ देवरी प्रांत होय. आणि देवगिरीच्या दक्षिणेस, नाशकाच्या पूर्वेस व जुन्नराच्या उत्तरेस जो प्रांत आहे त्याला सेउणदेश म्हणत. ह्या सेउणदेशाची राजधानी सेउणनगर ऊर्फ सध्यांचें सिन्नर होय. सेउण हा यादवकुलांतील एक राजा होता. ह्या सेउण देशाचा उल्लेख डॉक्टर भांडारकरांच्या दख्खनच्या इतिहासांत आहे. परंतु सेउणदेश म्हणजे सध्यांचा अमका प्रांत असें त्यांत सांगितलें नाहीं.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)