कापरी - कर्पूरिका. खा न
कापसी - कर्पास - कार्पासिका. खा व
कापूसवाडी - कर्पासवाटिका. खा व
कांबरें - कम्रपुरं (चांगलें सुंदर गांव) मा
कांबरें नाणे - कम्रपुरं ज्ञानकं. मा
कामथवाडी - कर्मस्थ (कुळकरणी, कायस्थ) - कर्मस्थवाटिका. ३ खा म
कामपुर - काम्ये (सुंदर) - कम्यकपुरं. खा नि
कामोद - कुमुदं. खा व
कारली - सं. प्रा. कारेल्लिका. रत्नागिरी, कुलाबा, खानदेश. ( शि. ता.)
कारलें - सं. प्रा. कारोल्लिका. पुणें, कुलाबा, बेळगांव. ( शि. ता.)
कारस्कर - इतिहास मंडळाच्या शके १८३४ च्या इतिवृतांत मीं असें विधान केलें होतें कीं कारस्कर हा देश व वृक्ष व लोक पाणिनीला माहीत असावे व हा देश नर्मदेच्या दक्षिणेस असावा. ह्या विधानाला वनस्पतिशास्त्रांतून एक दुजोरा मिळाला आहे. कारस्कर हा शब्द निघण्टूंत कुचल्याचा म्हणजे Nux vomica चा वाचक आहे. कुचला सह्याद्रींत नाशकापासून गोंवा मलबार पर्यंत सांपडतो असें वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणतात. कुचल्याची मूळ-भूमि सह्याद्रीचा हा प्रांत असावा. कुचला हें औषध व वनस्पति नर्मदेच्या उत्तरेकडील आर्यांना जेव्हां कळली, तेव्हा ही विषारी व औषधी बी ती ज्या देशांतून येई त्या देशाच्या नांवानें ते ओळखूं लागले. मूळ देशाचें व लोकांचें नांव कारस्कर होतें व कारस्कर देशांतून येणार्या ह्या अपूर्व व तेजस्वी वनस्पतीचें नांव हि उतरेकडील पाणिनीय कालीन आर्यानीं कारस्कर असें च ठेविलें. तात्पर्य, कारस्कर हा दक्षिणेकडील देश आहे, असें निःसंशयपणें म्हणण्यास आतां हें एक आणीक प्रमाण मिळालें आहे व पाणिनीला नर्मदेच्या खालील कुचला ज्या प्रांतांत होत असे तो प्रांत नांवानें तरी चांगला माहात होता असें कबूल करणें भाग पडतें. कारस्कर हा मूळचा संस्कृत शब्द नाही. हा सह्याद्रींत राहणार्या नागा लोकांच्या भाषेंतील शब्द असावा. तो नागसंसर्गानें आर्यांनीं संस्कृतांत रूढ केला आणि कालान्तरानें तो अत्यन्त रूढ झाल्यावर त्याची व्युत्पति पाणिनीसारख्या सूक्ष्मदृष्टि वैय्याकरणाला करावी लागली. प्रायः परभाषेंतून घेतलेले शब्द स्वभाषेच्या स्वभावाप्रमाणें व नियमांना धरून व्युत्पादण्याचा प्रयत्न थोडासा हास्यास्पदच आहे. परंतु पाणिनीनें ज्या अर्थी तो संस्कृत शब्द म्हणून व्युत्पादण्याचा प्रयत्न केला आहे, त्या अर्थी पाणिनीच्या आधीं कित्येक शतकें हा शब्द संस्कृतांत इतका रूढ होऊन बसला होता कीं, तो मूळ संस्कृत आहे कीं नागभाषेंतील आहे, या बाबीची आठवणसुद्धां पाणिनीच्या कालीं बुजाली होती. अशी स्थिति असल्यामुळें कारस्कर शब्दाची कृत्रिम व्युत्पत्ति करण्यास पाणिनि प्रवृत्त झाला व कार व कर या दोन संस्कृत शब्दांचा समास होतांना सुडागम मध्यें येतो असें सूत्र त्यानें साहजिक च ठेवून दिलें. सिंधप्रदेशांत ज्याला पारकर प्रांत म्हणतात त्याला पाणिनि पारस्कर म्हणे व तेथें हि सुडागमाचा च उपयोग पाणिनीनें केला आहे. प्रायः पारस्कर हा शब्द सिंधप्रांतांत आर्यांच्या अगेदर जे कोणी लोक राहात असतील त्यांच्या भाषेंतील मूळचा आहे, असा माझा तर्क आहे. (भा. इ. १८३४)