करणफाटें - करण (व्रात्यक्षत्रिय). खा म
करणूल ( र) - करण. (कर्णाटक पहा)
करमाळें - क्रमुक (लोध्र). खा व
करलें - करलं (वेळू). खा व
करवंद - करमर्द. २ खा व
करवें - कारवी - कारवं. खा व
कराड - सं. प्रा. करहाटक (करभवाटकं). सातारा. ( शि. ता.)
कराडी - करभ ( उंट) - करभवाटिका. खा इ
कराडें - सं. प्रा. करहाटक ( करभवाटकं ). ठाणें. ( शि. ता.)
कराव - करभ (उंट) - करभवहं. खा इ
करुंज - करंजं (झाडावरून). मा
कर्णाटक - हा देशवाचक शब्द कसा बनला, या संबंधानें कोणीं कोठेंहि विवेचन केलेलें नाही. मनुस्मृतीच्या दशमाध्यायाचा २२ वा श्लोक येणेंप्रमाणें आहे:-
झल्लो मल्लश्च राजन्याद् व्रात्यान् निच्छिविरेव च ।
नटश्च करणाश्चैव खसो द्रविड एव च ॥ २२ ॥
कल्लूकव्याख्या -
क्षत्रियाद् व्रात्यात् सवर्णायां झल्ल - मल्ल -
निच्छिवि - नट - करण - खस द्रविडाख्या
जायन्ते ॥ एतानि अपि एकस्य एव नामानि ।
म्हणजे -
व्रात्याराजन्यापासून सवर्ण स्त्रीचे ठाईं जी प्रजा होते तिला देशपरत्वें झल्ल, मल्ल, निच्छिवि, नट, करण, खस, द्रविड अशीं नांवें आहेत. हीं एकाच संकरजातीचीं निरनिराळीं नांवें आहेत.
येथें एका ऐतिहासिक वृत्ताचा उल्लेख केला पाहिजे. भारतीय आर्यांत चातुर्वर्ण्य सुरू झालें तेव्हां फक्त चार वर्ण होते; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पुढें कालान्तरानें संकर होऊन संकरजाति निर्माण झाल्या. ह्या संकरजातींपैकीं कांहींना समाजांतील निरनिराळीं कारुकर्में ऊर्फ धंदे पिढीजाद नेमून दिले व क्षत्रिय व्रात्योत्पन्न झल्लमल्लादींना आर्यावर्ताच्या आसपासचे प्रदेश नेमून दिले. ज्या प्रदेशांत हे व्रात्यक्षत्रिय राहावयास गेले त्या प्रदेशांना त्यांचीं नांवें मिळालीं.
झल्लांवरून झालरापट्टण, झालगांव, झालवाडी. मल्लांवरून मलठ्ण, मालगांव, मालवाडी, मलवडी.