या पुढील लेखांत मनुष्यें, देवता, लोक, प्राचीन स्थलें इत्यादिकांच्या नामांपासून निघालेल्या ग्रामनामांची व्युत्पति दिली आहे तीं ग्रामनामें व त्यांची व्युत्पति हीं कोशांत घेतलीं आहेत. यापुढे याच लेखमालेंत निर्जीव सृष्ट पदार्थनामांवरून
निघालेलीं ग्रामनामें दिलीं आहेत. तसेंच मुसुलमानी ग्रामनामें, नद्यांचीं नांवें व पर्वतनामें यांची व्युत्पत्तिही दिली आहे, ती कोशांत घेतली आहे. याशिवाय शक ० पासून शक तेराशें पर्यंतच्या शिलालेखांत, ताम्रपटांत व प्राकृत ग्रंथांत आलेलीं महाराष्ट्री प्राकृत ग्रामनामें. या ग्रामनामांचाही समावेश कोशांत केला आहे. या लेखमालेंतील बाकीचा भाग वसाहतकाल विवेचनात्मक असल्यामुळे विस्तारभयास्तव तो येथें दिला नाहीं. जिज्ञासु वाचकांनीं तो मूळांतूनच वाचणें इष्ट आहे.
(राजवाड्यांचे भाषाशास्त्रीय लेख स्वतंत्र ग्रंथरूपानें यापुढे राजवाडे मंडळाकडून प्रसिद्ध व्हावयाचे आहेत. त्या ग्रंथांत महाराष्ट्राचा वसाहतकाल हा सर्व लेख छापून प्रसिद्ध व्हावयाचा आहे. सबब या कोशांत दिलेल्या शब्दांच्या व्युत्पत्तीला लागू विवेचन तेवढें मात्र येथें घेतलें आहे. )
स्थलनाम-व्युत्पत्ति-कोशाची योजना
या कोशांत कै. राजवाडे यांनीं लिहून ठेवलेल्या कित्येक स्थळांच्या व्युत्पत्तीच्या चिठ्ठया, महाराष्ट्राचा वसाहतकाल या लेखमालेंत आलेल्या स्थळांची व्युत्पत्ति, महाराष्ट्र इतिहास नांवाच्या मासिकांत त्यांनीं दिलेल्या स्थळांच्या व्युत्पत्त्या. ह्या घेतल्या आहेत. तसेंच भारत इतिहास संशोधक मंडळाचीं इतिवृतें, ग्रंथमाला, सरस्वतीमंदिर, संशोधक त्रैमासिक वगैरे ठिकाणीं प्रसिद्ध झालेल्या त्यांनीं दिलेल्या व्युत्पत्या ह्याही घेतल्या आहेत.
महाराष्ट्राचा वसाहतकाल या लेखमालेंत आलेल्या स्थळांच्या व्युत्पत्ति या राजवाड्यांनीं केलेल्या कोणत्या प्रकारांत येतात हें कळण्यासाठीं पुढील योजना ठरविली आहे व तें तें अक्षर त्या त्या स्थळाच्या व्युत्पत्तीपुढें दिलें आहे.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
यांशिवाय इतर जिल्हे व संस्थानें यांतलें स्थळ असल्यास त्या त्या जिल्ह्याचें अगर संस्थानाचें नांव दिलें आहे. एकाच नांवांचीं कित्येक अनेक गांवें आहेत त्या ठिकाणीं राजवाड्यांनीं दिलेला त्या गांवांच्या संख्येचा आंकडा दिला आहे.