६ पुनगांव, पुनखेडें, हे शब्द पूर्णक नांवाच्या पक्ष्या वरून निघालेले आहेत. पूर्णक म्हणजे स्वर्णचूडपक्षी. हें पूर्णक पक्षिनाम पुणेकरांना विशेष लक्ष्य आहे. पुणें या शब्दाचें पूनक असें रूप ताम्रपटांत आढळतें. पूनक याचें संस्कृत रूप पूर्णकं. पूर्णकं म्हणजे तें गांव कीं ज्यांत स्वर्णचूड़पक्षि वसाहतवाल्यांना प्रथम वैपुल्यानें किंवा वैशिष्टयाने भेटले.म.पा.३५
७ सितोड व चितोड असे दोन उच्चार एका च गांवाच्या नांवाचे खानदेशांत ऐकू येतात. स चा च व च चा स होतो. चित्रक, चित्र या पशुनामा पासून चित्रकूट पासून चितोड व चितोड पासून सितोड. अथवा सीता या शब्दा पासून हि सितोड, चितोड शब्द निघूं शकतील.
८ घांगुरलें हें नांव घर्घुर्घा (रात्राकिडा ) या संस्कृत शब्दा पासून निघालेलें आहे. घर्घुर्घा (रात्रकिडा ) हा शब्द कोशांत आढळतो. परंतु, तो लोकांत कधीं प्रचारांत होता कीं काय, हें कळण्यास चांगलासा मार्ग नव्हता. कारण, कालिदासादींचें जें संस्कृत विदग्ध वाङमय त्यांत हा शब्द आढळणें दूरापास्त. हा शब्द पुरातनकालीं लोकांच्या घरगुती बोलण्यांत रात्रंदिवस यावयाचा, किंवा प्राणिशास्त्राच्या ग्रंथांत नमूद व्हावयाचा. पैकीं संस्कृतांत प्राणिशास्त्राचे ग्रंथ नाहींत व घरींदारीं संस्कृत बोलणारे लोक हि अस्तंगत होऊन दोन हजारां वर वर्षे गेली. फक्त घांगुरलें या ग्रामनामांत घर्घुर्घा हा शब्द आतां उरला आहे. अवि, खिंखिर, बप्पीह, ( ज्ञानेश्वरी, बापु ) घृणि, तंडक, दात्यूह, इत्यादि शेंकडों शब्दांच्या बाबतींत हि हा च न्याय लागू पडेल. हीं ग्रामनामें जर उपलब्ध नसतीं, तर संस्कृतभाषेत शाब्दिकांनीं स्वकपोलकल्पनेनें हीं नांवें गोवून तर दिलीं नसतील, अशी शंका घेणाराचें तोंड बंद करण्यास औषध राहिलें नसतें.
९ अंगूष या संस्कृत शब्दा पासून मराठी मुंगूस शब्द निघाला आहे. अंगूष = ओंगूस = ओंगुस = मोंगुस = मुंगूस हा अंगूष शब्द मुंगसें या ग्रामनामांत आढळतो. नकुल या
शब्दा पासून निघालेला अपभ्रंश नकुल = नउल = नवल अशा परंपरेनें नवल, नवलगांव, इत्यादि ग्रामनामांत कायम आहे, परंतु बोलण्याच्या मराठी भाषेत सध्यां प्रचलित नाही. वैदिक, संस्कृत, महाराष्ट्री, अपभ्रंश, मराठी अशा पांच रूपान्तरांतून जातांना अर्वाचीन मराठी पर्यंत पोहोचतां पोहोचतां किती हजारों शब्द गळून गेले. त्यां पैकीं कांहीं थोड्यांचा मागमूस ह्या ग्रामनामांत लागतो.
१० ह्या १७६ प्राणिनामांत व ६८५ ग्रामनामांत भिल्लादींचा बिलकुल पता नाहीं. अवि, अंगूप, करभ, ढेंक, जकूट, खिंखिर, कीर, चीरि, चिल्ल, धोड, भोलि वगैरे शब्द मूळचे संस्कृत नाहीत, ते मूळचे एथील भिल्लादि रानटी मनुष्यांच्या भाषेतील आहेत, अशी शंका काढून, संशयाचा फायदा भिल्लादींना देण्याचा सकृद्दर्शनीं मोह पडण्या सारखा आहे. परंतु, निश्चयाच्या तीराला पोहोंचण्यास ह्या मोहाचा कांहीं एक उपयोग नाहीं. कारण भिल्लादि लोक सध्यां ज्या भाषा बोलतात, त्या मराठी, गुजराथी, रजपुतानी, वगैरेंनीं इतक्या भरून गेल्या आहेत कीं दोन तीन हजार वर्षांपूर्वीचे त्यांच्या भाषेतील शब्द कोणते, हें ओळखण्याला सध्यां साधन उपलब्ध नाहीं. सातपुड्याच्या व विंध्याच्या व अरवलीच्या कुहरांत अत्यन्त रानटी स्थितींत जे थोडे भिल्लादि सध्यां जीवमान आहेत त्यांच्यांत कोणी भाषाशास्त्रज्ञ राहून त्यांच्या भाषेचा दोन तीन हजार वर्षांचा इतिहास तो जेव्हां सिद्ध करील, तेव्हां ह्या शंकेचा व संशयाचा परिहार होईल. तों पर्यंत वनस्पतींचीं व प्राण्यांचीं जीं संस्कृत नांवें कोशांत आढळतात तीं मूळचीं संस्कृत आहेत, असें च धरून चालणें युक्त आहे.