९ एणें प्रमाणें ३८०० पैकीं १४०० ग्रामनामांचा निकाल लागला. बाकीच्या २४०० ग्रामनामां पासून काय निष्पति होत्ये, ती पुढील दोन तीन लेखांत कळून येईल.
१ खानदेशांतील वनस्पतिनामजन्य ग्रामनामांचें संस्करण एथ पर्यंत झालें. त्यांत सुमारें १५०० गांवांचा हिशोब विल्हेस लागला. अवशिष्ट राहिलेल्या २३०० किंवा २४०० ग्रामनामांच्या संस्करणाचे खालील चार भाग केले आहेत. [ १ ] मनुष्येतरप्राणिनामजन्य ग्रामनामें, ( २) मनुष्यें, देवता, जाति, लोक, यांच्या नांवां वरून निघालेलीं ग्रामनामें, [ ३ ] निजाँव सृष्ट पदार्था पासून निघालेलीं ग्रामनामें, आणि [४] मुसुलमानी ग्रामनामें. ह्या चार भागां शिवाय [ १ ] नद्या व (२) डोंगर आणि डोंगरबा-या असे आणीक दोन शुद्र भाग केले आहेत.
२ यापुढे दिलेलीं मनुष्येतर प्राणिनामजन्य ग्रामनामें कोशांत घेतलीं आहेत.
३ यादींत एकंदर ग्रामनामें ६८५ व प्राणिनामें १७६. त्यांत सिंह, हत्ती, घोडा, सर्प, उंदीर, माकड, कोल्हा, उंट, चित्ता, वाघ, मोर, भुंगा, विंचू, ससा, बोकड, हरिण, इत्यादि पशुपक्ष्यांचीं नांवें आहेत. सिंहादींच्या नांवा वरून सहज च अनुमान होतें कीं वसाहतकालीं ह्या प्रांतांत सिंहादि पशुपक्षी होते. हत्तींच्या कळपांचें खानदेशांत अस्तित्व मुसुलमान तवारिखकारांनीं उल्लेखिलेलें आहे. कळंभेर, ग्रामनाम सिंहवाचक जी करभीर शब्द त्या पासून हि व्युत्पादितां येतें. नखिन, करभीर व सिंह हीं तीन नांवें कोशांत सिंहवाचक आढळतात. तीं वसाहतकालीं लोकप्रचारांत शेती, केवळ कोशकारांनीं कल्पिलेलीं नव्हत, असें तदुत्पन्न ग्रामनामां वरून स्पष्ट सिद्ध होतें. खरु, खेट, घेोटक, पीथि, वारु, भूकल, हीं सहा घोडयांचीं नांवें; गो व महा हीं दोन गाईचीं नांवें; शापठिक, मयूर, बर्हि, सिखावल, व साधृत [ मोरांचा कळप ], हीं पांच मोराचीं नांवें; बंभर, भ्रमर, भंभ, मृंग, मधुकर, मधुप, हीं सहा भुंग्याचीं नांवें; कुंजर, पृष्टहायन, भद्र, मनाका, विक्क, हस्तिन, हीं हत्तीचीं नांवें; किखि, बाहुक, मर्कट, वानर हीं वानराचीं नांवें; ग्रामनामावलींत पाहिलीं म्हणजे निःसंशय खात्री होत्ये कीं कोशांत ह्या प्राण्यांना जीं अनेक नांवें दिलेलों असतात तीं लोकप्रचारांत एके कालीं होतीं. Steed, horse, bay, arab, वगैरे, अनेक नांवें जशी इंग्रजीत घोड्याचीं वाचक लोकप्रचारांत आहेत, त्यांतला च मासला उपरिनिर्दिष्ट संस्कृत नांवांचा आहे. निरनिराळ्या नांवांनीं एकाच प्राणिजातीचे अनेक भेद त्या कालीं दर्शविले जात होते.
४ पिप्पका हें पक्षिनाम वैदिक आहे. तें पिपी या ग्रामनामाचें मूळ. त्या वरून अनुमानतां येतें कीं वसाहतवाल्यांत कांहीं वैदिक शब्द प्रचलित असतांना, पिपी या गांवाची वसती झाली असावी.
५ मामलदें या नांवाचें मूळ मामलपद्रं. पैकीं मामल या शब्दाचें मूळ महाभल्ल. महाभल्ल म्हणजे मोठं अस्वल. ह्या महाभल्ल शब्दा पासून च मामलमावळ शब्द निघालेला आहे. मावळ म्हणजे मोठी अस्वलें. सह्याद्रींत ज्या भागांत वसाहतवाल्यांना वैशिष्ट्यानें प्रथम दिसलीं तो भाग. सूर्य मावळत्या दिशेस जो प्रदेश तो मावळ अशी व्युत्पति कोठें कोठें केलेली आढळते; पण, महाभल्ल शब्दावरून हा शब्द व्युत्पादिणें प्रशस्त दिसतें. महाबळेश्वर ह्या शब्दाचें मूळ (१) महाभल्लेश्वर असें प्रथम होतें. नंतर त्याचा अपभ्रंश मामलेसर झाला. त्याचें पुनः संस्करण महाबलेश्वर झालें. मामलेसर, मामलेस्वर, असा उच्चार जुन्या मराठी लेखांत लिहिलेला आढळतो.